गुरुदेव - बोधकथा
एका गुरूकडे एक शिष्य रोज यायचा आणि म्हणायचा मला गुरुपदेश द्या. त्यावेळी गुरु म्हणायचा, ‘उद्या ये.’ तो उद्या आला की म्हणायचा, ‘उद्या ये.’ असे दहा दिवस झाल्यावर शिष्य म्हणाला, ‘द्या ना गुरुपदेश !’ त्यावेळी ते म्हणाले, ‘एकटा येरे, किती जणांना बरोबर आणतोस?’ तेव्हा तो चपापला. कारण कोणीच नसायचे बरोबर. दुसऱ्या दिवशी तेच ! तिसऱ्या दिवशी तेच! शेवटी त्याने धाडस करून विचारले, ‘महाराज, मी तर एकटाच येतो, किती जणांना बरोबर आणतोस असे का म्हणता?’ ते म्हणाले, ‘अरे, मनामध्ये काय आहे? काम आहे, क्रोध आहे, लोभ आहे, मोह आहे, मद आहे, मत्सर आहे, दंभ आहे !’ समर्थांनी तर प्रपंचालाच सहावा रिपू मानला आहे. आता काय करायचे? ज्या प्रपंचाला आम्ही कवटाळून बसतो, तो सहावा रिपू म्हणतात समर्थ ! मग त्याला कळले की अरे हे सगळे काढले पाहिजे चित्तातून ! त्यावेळी गुरुपदेश मिळेल. *तात्पर्य* :- आपले चित्त हे शुद्ध व्हायला पाहिजे. चित्तशुद्धीनंतर धर्माचरणाचा, सदाचाराचा खरा अर्थ कळतो आणि धर्माधिष्टीत अर्थ-काम सेवन केल्यावर मोक्षाचा लाभही अपरिहार्य ठरतो. 🍀🍀🍀🍀🍀🍀🍀