स्वतंत्रता - बोधकथा
प्रतापरावांच घरी एक पोपट होता. प्रतापराव जे जे शिकवतील तसे तो बोलायचा. स्वातंत्रच्या सुवर्ण महोत्सवी वर्षात प्रतापरावांनी त्याला नवा शब्द शिकविला होता. ‘स्वतंत्रता, स्वतंत्रता, स्वतंत्रता.’ पोपटाने ते शब्द चांगलेच आत्मसात केले होते. तेव्हापासून तो तसे बोलतही होता. एकदा प्रतापरावांकडे क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या प्रतिसरकारमधील स्वातंत्र्यसैनिक पाहुणे म्हणून आले होते. त्यांनी त्या पोपटाचे आक्रंदन ऐकले. त्यांना झोपच लागेना. कारण त्यांनी बेचाळीसच्या लढय़ात कारावास भोगला होता आणि त्यांना ‘स्वतंत्रता’ या शब्दाचे मोल माहीत होते. अखेर रात्री ते उठले. हळूच पिंजरा उघडून तंनी पोपटाला धरले. बाहेर ओढण्याचा प्रयत्न केला. परंतु तो पोपट एका पायाने पिंजरा घट्ट धरून होता. शेवटी कसेतरी त्यांनी त्या पोपटाला बाहेर काढले आणि मोकळ्या हवेत सोडले. त्या रात्री त्यांना शांत झोप लागली. सकाळी उठून पाहातात तर पिंजर्याचे दार उघडे होते. पण आत पोपट होता. आणि बोलत होता, ‘स्वतंत्रता, स्वतंत्रता, स्वतंत्रता.’ तात्पर्य : जे सत्य स्वत:ला गवसलेले नसते त्याचा जीवनाला काडीमात्र उपयोग नसत