परिस्थितीशी संघर्ष - बोधकथा
एका गावात एक शेतकरी देवावर खूप नाराज झाला. नाराजीचे कारणही तसेच होते कारण कधी पाऊस जास्त पडत असे तर कधी पूर्ण दुष्काळ, कधी ऊन जास्त तर कधी ढगाळ वातावरण, कधी गारा पडून पीकाचे नुकसान होई तर कधी वा-याने उभे पीक आडवे होत असे. एक दिवस वैतागून त्याने देवाला साद घातली व देवास सांगितले,''तुम्ही सर्वव्यापी प्रभू परमेश्वर असाल इतर सर्व गोष्टीतले तुम्हाला कळत असेल पण माझ्यामते तरी तुम्हाला शेतीतले काहीच कळत नाही. एक प्रार्थना तुम्हाला मी करतो तुम्ही फक्त एक वर्षभर निसर्ग माझ्या ताब्यात द्या मग बघा शेती कशी फुलते ते. घरोघरी मी धान्यांच्या राशी घालतो ते पहाच तुम्ही.'' देव हसला आणि म्हणाला,''तथास्तू, तुझ्या म्हणण्याप्रमाणे आज,आतापासून मी निसर्गाचा लहरीपणा बंद करून तो तुझ्या ताब्यात मी देत आहे. तू तुला जसा पाहिजे तसा ऋतु बनवून घे व शेती कर'' इतके बोलून देव निघून गेला. शेतक-याने या वरदानाचा फायदा घेण्यासाठी गहू पेरले, जेव्हा त्याला जेवढे ऊन पाहिजे होते तेव्हा त्याने ऊन पाडले, जेव्हा त्याला पाणी द्यायचे होते तेव्हा त्याने पावसाचा वर्षाव केल