Posts

Showing posts with the label घडवणूक माणसाची - बोधकथा

घडवणूक माणसाची - बोधकथा

एका गुरूकडे एक अभ्यागत बसले होते. काही शास्त्रचर्चा सुरू होती. एक शिष्य आत आला. दार लावलं. पादत्राणं काढून ठेवली. गुरूंच्या समोर येऊन बसला. गुरू थोडा वेळ शांत राहिले. मग अगदी मृदू स्वरात म्हणाले, बेटा ;  जा, दाराची आणि जोड्यांची माफी मागून ये. शिष्य उठला, दारापाशी गेला, माफी मागितली, जोड्यांचीही माफी मागितली. पाहुणे अचंबित झाले. म्हणाले, हा काय प्रकार ? दाराची आणि जोड्यांची माफी? गुरू म्हणाले, तो आला तेव्हा घुश्शात होता, त्याने दार जोराने आपटलं आणि जोडे रागाने भिरकावले होते. पाहुणे म्हणाले, पण म्हणून निर्जीव वस्तूंची माफी मागायची? गुरू म्हणाले, निर्जीव वस्तूंवर राग काढता येतो, तर त्यांची माफी का नाही मागायची? पाहुणे म्हणाले, पण, याच्या रागाचा किंवा माफीचा दरवाजावर किंवा जोड्यांवर काय परिणाम होणार? गुरू म्हणाले ; पण , मी कुठे दरवाजा किंवा जोडे घडवतोय? मी तर याचा गुरू आहे, *मी माणूस घडवतोय.*.