◾संघर्ष कथा :- एका आदिवासी जमातीतील कलेक्टर डॉ. राजेंद्र भारूडची ही संघर्ष कथा एकदा नक्की वाचा,खरचं प्रेरणा मिळेल ...

नमस्कार 

मी आहे नंदुरबार जिल्ह्याचा कलेक्टर

              (डॉ, राजेंद्र भारुड)_       ___


माझा जन्म कोणाच्या घरात आणि कोणत्या समाजात व्हावा हे माझ्या हातात नव्हतं. मी साक्री तालुक्यातील सामोडे गावात  भिल्ल जमातीत जन्म घेतला आणि माझं जगणं सुरू झालं.  जगताना पावलो पावली संघर्ष होता, अडचणी होत्या. परिस्थिती  प्रतिकूल होती; पण त्याचा बाऊच करत राहिलो असतो तर आज ही आयएएस ऑफिसर पर्यंतची मजल गाठता आलीच नसती.

अभिनेता अमीर खान आणि मी 

मला माझ्या आयुष्यात कोणतीच गोष्ट सहज मिळाली नाही, किंबहुना मिळालीच नाही. अभावाच्या या जगण्याला निसर्गाची भक्कम सोबत होती. निसर्गाचा सहवास होता म्हणून लढायला ताकद मिळाली. उसाच्या पालाची झोपडी म्हणजे माझं घर. मी मायच्या पोटात होतो तेव्हाच वडील वारले. घरची एवढी गरिबी की वडिलांचा साधा फोटो काढायलाही पैसे नव्हते. माझे वडील कसे होते हे मला कधीच कळलं नाही. आमच्याकडे ना जमीन होती ना शेती.

पण आमचं शिकणं इतर कोणाला महत्त्वाचं वाटण्याचं कारणंच नव्हतं. आमचा जन्म म्हणजे सांगितलेली कामं करण्यासाठीच. एकदा परीक्षा होती. ओटय़ावर बसून अभ्यास करत होतो. दारू प्यायला आलेल्या एकानं मला चकना आणून देण्यास सांगितलं; पण परीक्षेमुळे मी सरळ नाही सांगितलं. समोरचा चिडला आणि शिकून असा कोणचा डॉक्टर - इंजिनिअर होणार असं म्हणून मला हिणवलं. मायला ते शब्द खूप लागले. आणि होईल माझं पोर डॉक्टर- इंजिनिअर असं ठामपणे म्हणून गेली.

त्या माणसाच्या हिणवण्यानं मला खूप वाईट वाटलं. आपली परिस्थिती आपल्याच बळावर बदलण्याचाही आपल्याला हक्क नाही का, असा विचार आला. पण क्षणभरच. मायनं माझ्यावर दाखवलेला विश्वास मोठा होता. हा विश्वास खरा करायचं ठरवलं. 

पुढे अक्कलकुवा तालुक्यातल्या नवोदय विद्यालयात सीबीएसई अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळाला. गावापासून 150 किमी दूर होती शाळा. माय आली होती सोडवायला. मायपासून दूर कसं राहायचं या विचारानंच रडायला आलं. मायही खूप रडत  होती; पण मायपासून दूर राहून शिकणं भाग होतं. मायची पाठ फिरल्यानंतर मी ठरवून टाकलं ही संधी अशी वाया जाऊ द्यायची नाही.

एम.बी.बी.एस.च्या  शेवटच्या वर्षाला होतो. एकीकडे इण्टर्नशिप चालू होती आणि दुसरीकडे यूपीएससीचा अभ्यास. मायचे कष्ट हीच माझी प्रेरणा होती. बाकी माझ्या मायला माझ्या शिकण्याचा काहीच गंध नव्हता. मायला तर मी फक्त डॉक्टरकीच करतो आहे असं वाटत होतं. यूपीएससीची परीक्षा काय असते? कशासाठी असते? कलेक्टर होण्यासाठी काय करायचं असतं हेच तिला माहीत नव्हतं. तिनं तर तोर्पयत तिच्या आयुष्यात गावात कधी प्रांत आणि तहसीलदारही आलेला बघितला नव्हता. आणि मी आयएएस ऑफिसरची तयारी करत होतो. वर्ष संपलं. आणि माझ्या एका हातात एम.बी.बी.एस.ची पदवी आणि दुसर्‍या हातात यूपीएससी क्रॅक केल्याचा निकाल होता. 


घरी मोठी मोठी मंडळी माझ्या अभिनंदनासाठी येत होती. कलेक्टर, तहसीलदार, पुढारी. मायला काही कळतच नव्हतं की इतकी लोकं का येताहेत. मी मायला सांगितलं की मी डॉक्टरकी पास झालो. मायला खूप आनंद झाला; पण मी लगेच सांगितलं की मी डॉक्टरकी सोडली.

माझी पोस्टिंग कलेक्टर म्हणून नंदुरबार जिल्ह्यात झाली आहे. 2012 पासून माझी माय आता माझ्या सोबत आहे. इथे मला करण्यासारखं खूप आहे. नंदुरबार म्हणजे पूर्ण आदिवासी जिल्हा. शिक्षण, रस्ते, सार्वजनिक आरोग्य व्यवस्था सर्वच बाबतीत कामाची, सुधारणांची नितांत गरज आहे. आणि ते करण्यासाठीच मी या पदावर आहे.  

माझ्या जीवनावर आधारित पुस्तक
आज मला अनेकजण विचारतात की माझं अख्खं बालपण, तरुणपण परिस्थितीशी दोन हात करता करता संपलं. या अवस्थेतलं जगणं मला अनुभवताच आलं नाही. पण मी म्हणतो की संघर्ष करत होतो म्हणूनच माझ्यात ताकद येत होती. अख्खं बालपण उघडय़ा आकाशाखाली निसर्गाच्या सोबतीनं गेलं.

 छान वाटत होतं. गरिबीतपण आनंद वाटत होता. 

पण मुंबईला शिकायला गेलो. आणि पहिल्यांदा गरिबीची जाणीव झाली. पण कोणाबद्दल मत्सर वाटला नाही आणि स्वतःच्या परिस्थितीचं दुख मानलं नाही. पहाटे साडेचारला उठायचो. योग करायचो, अभ्यासाला बसायचो. कॉलेज, काम, यूपीएससीचा अभ्यास अशीच दिनचर्या संपूर्ण कॉलेज काळात होती. हातातल्या मोबाइलमध्ये डोकं खुपसून बसण्यासाठी वेळच नव्हता. तेव्हा जर फेसबुकवर पोस्ट्स लिहित राहिलो असतो, आपल्या वाटय़ाला आलेल्या संघर्षाची दुःखद कथा उगाळत राहिलो असतो तर इथवर पोहोचलोच नसतो.

वयाच्या 31व्या वर्षी मी कलेक्टर झालो आहे. कष्ट केले नसते, आयुष्यात आलेल्या छोटय़ा संधीचं बोट धरलं नसतं तर या वयात इतरांसारखी नोकरीच शोधत बसलो असतो. इथे पोहोचेपर्यंत मी काय गमावलं यापेक्षा माझ्या संघर्षानं मला आज काय दिलं हे मी महत्त्वाचं मानतो. 


आज 31 व्या वर्षी माझ्याकडे काय नाही?

 जगण्याचे हरप्रकारचे अनुभव घेतले आहेत. पोटाला पीळ पाडणारी भूक अनुभवली आहे. आणि हे सगळं अनुभवणारा राजेंद्र भारूड नावाचा भिल्लं समाजातला तरुण जेव्हा आयएएस ऑफिसर होतो, भिल्ल समाजातला पहिलाच कलेक्टर होतो तेव्हा मग आजूबाजूच्या लोकांना जाग येते. इथंही काहीतरी बदलतंय, घडतंय याची जाणीव होते. 

लढायचं ठरवलं तर काहीच अशक्य नसतं हे एवढं जरी माझ्या तरुण मित्रांनी या भिल्लाच्या पोराकडे पाहून ठरवलं तरी खूप आहे.


( जिल्हाधिकारी, नंदुरबार)

( मुलाखत आणि शब्दांकन  :-  माधुरी पेठकर )


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

प्रेरणा ©







Comments

Popular posts from this blog

देतो तो देव - बोधकथा

हिरव्या हिरव्या श्रावणात ... | मराठी कविता | संजय धनगव्हळ

कविता :- 📝 पत्र शेवटचं लिहितो आहे ...

◼️हास्य कविता :- दारूड्याची नशा ...

◾ललित लेख :- स्ञी

◾विशेष लेख :- विक्रम साराभाई यांचा एक सत्य किस्सा अवश्य वाचा !

◼️ बोधकथा :- अति तेथे माती

◼️ ललित लेख :- शेवटी काय सोबत घेऊन गेला तो भिकारी ...