◼️ बोधकथा :- पाण्यामध्ये मासा झोप घेतो कसा जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे...
★★★★★★★★★★★★★★★★★★
सखाराम व लक्ष्मी हे दोघे पती-पत्नी हे एका गावामध्ये त्यांच्या 9 वर्षाच्या मुलासोबत राहत असतात. त्यांचा मुलगा श्रेयस हा अभ्यासात खूप हुशार होता पण तितकाच खोडकर ही होता. तो आईचे कधीच ऐकत नसे. पण तो आपल्या वडिलांचे मात्र ऐकत असे.
श्रेयसला नवनवीन गोष्टी शिकायला खूप आवडतं असे. श्रेयस एकुलता एक असल्यामुळे त्याला दोघेसुद्धा काहीही बोलत नसत. तो लाडात वाढला होता.
त्या गावामध्येच त्याच्या वडिलांचे एक छोटेसे इस्त्रीचे दुकान होते. ते नेहमी आपल्या घरचं काम आटपले की आपल्या दुकानात नियमित जात असत.
जेव्हा श्रेयसच्या शाळेला सुट्टी असायची तेव्हा तो वडिलांच्या बरोबर दुकानात जाऊन बसत असे. वडील काय करतात याचे निरीक्षण करत असे. त्याला सारखे वाटत असे की आपणास आपल्या वडिलांसारखे कपड्यांना इस्त्री करण्यास जमेल का ? तो जेव्हा जेव्हा दुकानात जाई, तेव्हा तेव्हा त्याच्या मनात सारखा हाच प्रश्न येत असे.
एके दिवशी सुट्टीच्या दिवशी श्रेयस आपल्या वडिलांच्या दुकानात गेला. वडिलांचे कपड्यांना इस्त्री करण्याचे काम चालु होते. तो नेहमीप्रमाणे वडिलांच्या कामाचे निरीक्षण करत बसला. काम करत असताना सखाराम ना त्यांच्या एका गिऱ्हाईका चा फोन आला. फोनवर आवाज अस्पष्ट येत असल्याने ते दुकानाच्या बाहेर फोनवर बोलण्यासाठी जात होते. पण दुकाना बाहेर जाताना श्रेयस ला सांगायला ते अजीबात विसरले नाहीत की इस्त्री गरम आहे. त्याला तू हात लावू नकोस. मी फोनवर बोलून लगेच येतो. श्रेयसने त्यांच्याकडे पाहून होकारार्थी मान डोलावली.
पण कित्येक दिवसापासून त्याच्या मनात असलेले ते विचार त्याला गप्प बसू देत नव्हते. त्याच्या मनातील इच्छा त्याला पूर्ण करण्यास मिळत असल्याने त्यांने वडिलांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले आणि वडील बाहेर गेल्या क्षणी तो त्या इस्त्रीकडे धावला. जणू तो याक्षणाचीच वाट पहात होता. इस्त्री कशी काय गरम होते? याचे काम कसे चालते ? म्हणून त्याने इस्त्रीला हात लावला आणि बघताक्षणी त्याचा हात भाजला. तो जोरजोराने ओरडायला लागला व रडायला लागला. त्याच्या रडण्याचा आवाज ऐकताच दुकानाच्या बाहेर असलेले त्याचे वडील पळत पळत आत दुकानातआले. पाहतात तर काय श्रेयस चा हात भाजलेला, हात लालभडक झालेला.
वडिलांनी त्याला कित्येक वेळा बजावून सांगुन ही त्याने त्यांचे ऐकले नव्हते व जे करायचे तेच केले होते आणि स्वतःचे हात भाजून घेतले होते.
तात्पर्य :- _कोणत्याही गोष्टीचा अनुभव घेतल्याशिवाय शहाणपण येत नाही (हे श्रेयस च्या वागण्यावरून दिसून येते.)_
लेखिका :- सौ. अश्विनी निलेश कसबेकर, राहणार कोल्हापूर
Comments
Post a Comment
Did you like this blog