एक छिद्र उरलेलं - बोधकथा
"एक छिद्र उरलेलं" महाभारतातील ही गोष्ट तुम्हाला माहीत आहे का? एक गरीब म्हातारा हस्तिनापूरला गेला. काहीतरी दान मिळेल या आशेनं तो धर्मराजाला भेटला. परंतु, तोपर्यंत सूर्यास्त झाला होता. त्यानं धर्मराजाला काहीतरी दान द्यावं अशी विनंती केली. तेव्हा धर्मराज त्याला म्हणाले, 'आता सूर्यास्त झाला आहे. त्यामुळे मी आता दान देवू शकत नाही. तू उद्या सूर्योदयानंतर केव्हाही ये. मी तुला निराश करणार नाही.' तो गरीब म्हातारा नाराज होवून परत फिरला. या दोघांमधला संवाद बाजूला बसलेले भीमसेन ऐकत होते. तो गरीब म्हातारा निघून गेल्यानंतर भीमसेन धर्मराजाला म्हणाले, 'दादा, तुम्ही त्या याचकाला उद्या सकाळी दान देण्याचं वचन दिलं आहे. पण, एक विचारू? माणसाला दुसऱ्या दिवशीच्या आयुष्याची खात्री देता येते?' धर्मराजाला स्वतःची चूक कळली. त्यांनी लगेच त्या गरीब म्हाताऱ्याला बोलावलं आणि भरपूर दान दिलं. गोष्ट इथं संपली.... पण, भीमानं विचारलेला हा प्रश्न छोटासा असला तरी, अस्वस्थ करणारा आहे. आणि हा प्रश्न जो स्वतःला विचारतो, त्याला आयुष्याचं खरं महत्त्व कळतं. 'तो काल मला भेटला होता, आज तो नाहीये'...