एक छिद्र उरलेलं - बोधकथा

"एक छिद्र उरलेलं"

महाभारतातील ही गोष्ट तुम्हाला माहीत आहे का?


एक गरीब म्हातारा हस्तिनापूरला गेला.

काहीतरी दान मिळेल या आशेनं तो धर्मराजाला भेटला.

परंतु, तोपर्यंत सूर्यास्त झाला होता.

त्यानं धर्मराजाला काहीतरी दान द्यावं अशी विनंती केली.

तेव्हा धर्मराज त्याला म्हणाले,

'आता सूर्यास्त झाला आहे. त्यामुळे मी आता दान देवू शकत नाही. तू उद्या सूर्योदयानंतर केव्हाही ये. मी तुला निराश करणार नाही.'

तो गरीब म्हातारा नाराज होवून परत फिरला.

या दोघांमधला संवाद बाजूला बसलेले भीमसेन ऐकत होते.

तो गरीब म्हातारा निघून गेल्यानंतर भीमसेन धर्मराजाला म्हणाले,

'दादा, तुम्ही त्या याचकाला उद्या सकाळी दान देण्याचं वचन दिलं आहे. पण, एक विचारू? माणसाला दुसऱ्या दिवशीच्या आयुष्याची खात्री देता येते?'

धर्मराजाला स्वतःची चूक कळली.

त्यांनी लगेच त्या गरीब म्हाताऱ्याला बोलावलं आणि भरपूर दान दिलं.

गोष्ट इथं संपली....

पण, भीमानं विचारलेला हा प्रश्न छोटासा असला तरी, अस्वस्थ करणारा आहे.

आणि हा प्रश्न जो स्वतःला विचारतो, त्याला आयुष्याचं खरं महत्त्व कळतं.

'तो काल मला भेटला होता, आज तो नाहीये',

'तो मघाशी माझ्याशी फोनवर बोलला होता, आत्ता तो नाहीये.'

असे अनेक प्रसंग आपल्या आजूबाजूला नेहमी घडत असतात.

हा क्षण माझा आहे.

पुढचा क्षण माझा नाही, हे एकदा का आपण आपल्या मनात रूजवले की, संताप, चीड, द्वेष, मत्सर या सगळ्या भावना आपोआप गळून पडतात आणि हातात राहते ते सूर ताल, लय, ठेका घेवून आलेलं आयुष्याचं रंगीबेरंगी गाणं!

जी मोठी माणसं किंवा नेते मंडळी असतात, ते गेल्यानंतरही त्यांचे चौकात पुतळे होतात.
जे शास्त्रज्ञ, विचारवंत असतात, त्यांचे विचार आपल्याला ते गेल्यानंतरही पुस्तकातून भेटतात.

जे कलावंत, गायक, खेळाडू असतात, ते गेल्यानंतरही ते त्यांच्या कलेतून, कृतीतून आपल्याला आठवतात.

पण आपल्यासारख्या सामान्य माणसाचं काय?

शरीरातून जीव गेल्यानंतर कुठे असतो आपण?

कुठल्या रूपात मागे उरतो आपण?

माझ्या घरात आज मी आहे.

उद्या मी नसेन.

माझ्या जागी एक मिणमिणता दिवा असेल.

दहा दिवसांनी तो दिवा विझेल.

मग, त्या जागी माझा एक फोटो असेल.

लाकडी चौकट, कोरीव नक्षीकाम, हसरा फोटो.

काही दिवसांनी माझ्या लटकलेल्या फोटोवर साचलेली धूळ असेल किंवा त्या फोटोची पातळ काच वेडीवाकडी तडकलेली असेल.

काही वर्षांनी माझा तो हसरा फोटो भिंतीवरच्या छिद्रातून खिळ्यासकट निखळलेला असेल...

आणि मग त्यानंतर पिढ्यान् पिढ्या, माझ्याच घरात, माझ्या नावाचं फक्त उरलेलं एक छिद्र असेल !

आपलं रूपांतर अशा छिद्रात होण्यापूर्वी आपल्याला दानात मिळालेल्या ह्या श्वासांच रूपांतर आपण 'उत्सवात'  करायचं का?...                                                    
इतिहास सांगतो काल सुखी होतो.

भविष्य सांगतं उद्या सुखी असशील.

पण...

तुमचे मन आणि विचार चांगले असेल, तर रोजच सुख आहे... नाही का ?

तर, मग, जगा, आनंदाने.....!!!
....

Comments

Popular posts from this blog

◾संघर्ष कथा :- एका आदिवासी जमातीतील कलेक्टर डॉ. राजेंद्र भारूडची ही संघर्ष कथा एकदा नक्की वाचा,खरचं प्रेरणा मिळेल ...

देतो तो देव - बोधकथा

हिरव्या हिरव्या श्रावणात ... | मराठी कविता | संजय धनगव्हळ

कविता :- 📝 पत्र शेवटचं लिहितो आहे ...

◼️हास्य कविता :- दारूड्याची नशा ...

◾ललित लेख :- स्ञी

◼️ बोधकथा :- अति तेथे माती

◼️ ललित लेख :- शेवटी काय सोबत घेऊन गेला तो भिकारी ...

◾विशेष लेख :- विक्रम साराभाई यांचा एक सत्य किस्सा अवश्य वाचा !