◼️ ललित लेख :- शेवटी काय सोबत घेऊन गेला तो भिकारी ...


   काही दिवसांपूर्वी एक बातमी वाचनात आली : चेन्नईचा एक भिकारी रस्त्यावर मरून पडला. त्याचा पंचनामा करताना रस्त्याकडेच्या त्याच्या झोपडीत पैशांनी भरलेली काही पोती सापडली. पोत्यांत भरलेले पैसे पोलिसांनी मोजले तर ती रक्कम एक कोटी ८६ लाख आणि काही हजार इतकी होती. एवढी संपत्ती गोळा करून बिचारा भिकारी रस्त्यावर बेवारशी मरून पडला. 

      या बातमीने विचारचक्र सुरू झालं: भिकार्‍याने आपल्या भिकारीच्या व्यवसायातून स्वेच्छानिवृत्ती घेतली असती तर? (व्यवसाय हा शब्द इथं मुद्दाम वापरला आहे.) साचवलेल्या पैशांत तो मरेपर्यंत चांगलं खाऊन (पिऊन नव्हे) जगला असता.  किती छान वाटलं असतं त्याला भिकारीपणातून बाहेर येऊन. अनेक नवोदित भिकार्‍यांना तो भीकही देऊ शकला असता.  

     पण नाही. ते त्याला जमलं नाही. याचं कारण असुरक्षितता, सवय आणि भीती. आपण जमवलेले पैसे नक्की किती, हेच त्याला स्वत:ला माहीत नसावं. आपण भीक मागणं बंद केलं तर आपण जमवलेले पैसे आपल्या आयुष्याच्या शेवटपर्यंत नक्की पुरतील की नाही याची भीती त्याच्या मनात असावी. समजा जमवलेले पैसे खर्च करून आपण चैन करायला लागलो आणि हौस मौज करता करता आपले पैसे संपले तर पुढं काय करायचं? पुन्हा भीक मागायचं काम आपल्याला जमेल का? अशा पध्दतीचा खोल नसला तरी वरवरचा विचार करून आपली भिकार्‍याचा व्यवसाय  त्याने सुरू ठेवला असावा. आणि जमा करून ठेवलेली एवढी मोठी रक्कम एक दिवस वार्‍यावर सोडून बिचारा रस्त्यावर सहज मरून पडला. त्याचं नाव गाव कोणालाही माहीत नाही. एक भिकारी इतकीच त्याची ओळख. एवढी मोठी रक्कम देशाला अर्पण करून त्याने मरणोत्तर सामाजिक काम केलं, हे खरं असलं तरी ते सकारात्मक सामाजिक काम म्हणता येणार नाही. अनायासे नाईलाजास्तव- इच्‍छेविरूध्द ते सामाजिक काम ठरतं.   

       उलट जमवलेल्या पैशांचा योग्य तो विनियोग त्याने त्याच्या हयातीत- त्याच्या हातून केला असता तर त्याची समाजाप्रती प्रतिमा उजळून निघाली असती. 

     पण या भिकार्‍याला नावं ठेऊन चालणार नाही. आपणही कायम तेच करत असतो. स्वत: काटकसर करत दुसऱ्यांसाठी जगत राहतो. समाजासाठी जगत नसलो तरी स्वतःच्या कुटुंबासाठी-  लायक/ नालायक मुलांसाठी खस्ता खात राहतो- कमवतो. परवडण्याइतका खर्च करतो. मरेपर्यंत कायम कमवतच राहतो. आणि एक दिवस सर्व काही मागे टाकून गुपचूप कोपर्‍यात मरून पडतो. कुठं थांबावं हे माणसाला शेवटपर्यंत कळत नाही.   

      कोणत्याही क्षेत्रात स्वेच्छानिवृत्ती घेता आली पाहिजे आणि आपण कुठं रमतो त्या छंदात उर्वरीत आयुष्य व्यतीत करावं. कमवलेली संपत्ती (खूप नसली तरी) योग्य मार्गाने खर्च करता आली पाहिजे. गरजवंताला मदत करता आली, तर जगण्याला खरा अर्थ प्राप्त होतो.  

     खूप हाव सुटल्यासारखं शेवटपर्यंत कमवत राहायचं. पोटाला टाचे देत कमवलेलं बाजूला साचवत रहायचं. 


 स्वतः मनासारखं  जगायचं नाही, आणि मुलांनाही त्यांच्या मनासारख जगु द्यायचं नाही. याचा अर्थ, आपण या भिकाऱ्यासारखंच जगत राहतो. आणि कमवलेलं सगळं इथं टाकून एक दिवस स्वतःला आणि  मुलांना  न समजता  हे जग सोडुन जातो. अनामिकासारखं😊

 एक टिप : इतकं कमवून काय  सोबत  नेलं त्या भिका-याने काहिच नाही ना...



➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

तुमचे मत काय आहे ते कमेंट मध्ये नक्की कळवा ! 

--{ हा लेख जर आवडला तर नक्की शेअर करा }--


Comments

Popular posts from this blog

◾संघर्ष कथा :- एका आदिवासी जमातीतील कलेक्टर डॉ. राजेंद्र भारूडची ही संघर्ष कथा एकदा नक्की वाचा,खरचं प्रेरणा मिळेल ...

देतो तो देव - बोधकथा

हिरव्या हिरव्या श्रावणात ... | मराठी कविता | संजय धनगव्हळ

कविता :- 📝 पत्र शेवटचं लिहितो आहे ...

◼️हास्य कविता :- दारूड्याची नशा ...

◾ललित लेख :- स्ञी

◾विशेष लेख :- विक्रम साराभाई यांचा एक सत्य किस्सा अवश्य वाचा !

◼️ बोधकथा :- अति तेथे माती