चांगले आचरण - बोधकथा
दोन तरुण साधू उंच डोंगरावर असणार्या आपल्या मठाकडे निघाले होते. रस्त्यामध्ये एक ओढा होता. त्या ओढय़ाच्या काठी एक तरुण युवती बसलेली होती. त्या तरुणीलाही तो ओढा पार करून गावात जायचे होते. पण ओढय़ाला असणार्या पाण्यामुळे ती तो ओढा पार करू शकत नव्हती. तरुणीला तर ओढा पार करून पलीकडे जाणे गरजेचे होते. दोन साधूंपैकी एका साधूने हे पाहिले व त्याने त्या तरुणीला विश्वासपूर्वक दोन गोष्टी सांगितल्या व त्या तरुणीला आपल्या खांद्यावर बसवले आणि त्या तिघांनी मिळून तो ओढा पार केला. तरुणीने तो ओढा पार होताच साधूचे आभार मानले व ती आपल्या गावात निघून गेली. दोन्ही साधू आपल्या आश्रमाकडे निघाले. ज्या साधूने तरुणीला खांद्यावर घेतले होते त्याच्याशी दुसरा साधू बराच वेळ काहीच बोलला नाही.
त्या साधूने दुसर्या साधूच्या मनातील चलबिचल ओळखली व तो त्याला म्हणाला, मित्रा! बराच वेळ मी पाहतो आहे पण तुला काही तरी खुपते आहे. तेव्हा विना संकोच तू मनातील गोष्ट मला सांग. तो दुसरा साधू म्हणाला, हे मित्रा, आपल्या संप्रदायामध्ये स्त्रीस्पर्श सुद्धा वज्र्य आहे. तरी तू त्या स्त्रीला खांद्यावर बसवून ओढा पार केलास हे काही मला आवडले नाही. त्यावर तो मदत करणारा साधू म्हणाला, मित्रा, ती स्त्री जेव्हा माझ्या खांद्यावरून उतरली तेव्हाच मी तिला सोडले, मात्र तू अजूनही तिला मनात बाळगून आहेस. मी तिला मदत करण्याच्या दृष्टीने स्पर्श केला पण तू अजूनही मनातून तिला वारंवार स्पर्श करत आहेस. संन्यास याचा अर्थ कुणाचीही सेवा न करता अलिप्त राहणे असा न होता मनातील वासना आणि विकारांवर ताबा मिळवणे असा होतो.
तात्पर्य- माणसाच्या मनातून चांगले आचरण असल्यास बाहेरील आचरण हे चांगलेच होते. मनात पाप ठेवून चांगले बनत नाही.
Comments
Post a Comment
Did you like this blog