विश्वासात - बोधकथा
एका धनगराचा आपल्या कुत्र्यावर फार विश्वास होता. जेव्हा त्याला कोठे तरी बाहेर जायचे असे, तेव्हा आपली मेंढरे तो कुत्र्याच्या स्वाधीन करत असे. कुत्र्याने आपली चाकरी इमानाने आणि मन लावून करावी म्हणून तो नेहमी त्याला लोणी-भाकरी खाऊ घालत असे, पण त्याचा कुत्रा इतक्या विश्वासास पात्र नव्हता. त्याचा मालक त्याला इतक्या चांगल्यारीतीने वागवीत असूनही केव्हा तरी एखादी मेंढी खाण्यास तो कमी करत नसे. ही त्याची लबाडी एके दिवशी धनगराने पाहिली तेव्हा तो त्याला ठार मारू लागला, त्यावेळी कुत्रा त्याला म्हणाला, 'साहेब,
माझ्याकडून चुकून एक वेळ अपराध घडला, तेवढय़ासाठी अशा निर्दयपणाने माझा जीव घेऊ नका. मला मारण्यापेक्षा जो लांडगा तुमच्या मेंढय़ा मारून खातो, त्याचा जीव तुम्ही का घेत नाही?' धनगर त्यावर म्हणाला, 'अरे लबाडा, लांडग्यापेक्षा तुझा दुष्टपणा अधिक भयंकर आहे. कारण लांडगा हा माझा शत्रूच आहे. त्याच्यापासून मला अपकार व्हायचाच, हे मला पक्के ठाऊक असल्यामुळे त्याच्यासंबंधीने योग्य ती खबरदारी मी ठेवत असतोच, परंतु तू माझा विश्वासू नोकर असताना अन् मी तुला इतक्या चांगल्यारीतीने वागवत असताना तू ज्या
अर्थी असा कृतघ्नपणा करायला प्रवृत्त झालास त्याअर्धी तू क्षमेला मुळीच पात्र नाहीस.' इतके बोलून त्याने त्याला एका जवळच्या झाडाला टांगून मारून टाकले.
तात्पर्य :- विश्वासघातकी माणसासारखा भयंकर माणूस दुसरा कोणी नाही व एकदा त्याचा विश्वासघातकीपणा उघडकीस आल्यावर लोकांनी जर त्याला यथायोग्य शासन केले, तर ते योग्यच झाले, असे म्हटले पाहिजे.
Comments
Post a Comment
Did you like this blog