◼️ वैचारिक लेख :- घरात मोठं कुणीतरी पाहिजे हो...!
घरात मोठं कुणीतरी पाहिजे हो...!
उद्या ह्याच पायरीवर तुम्ही असणार आहात...!
पूर्वी घरांत उंबरठे आणि मोठी माणसं असायची. त्यामुळे घराचा कारभार मर्यादेत आणि धाकात चालायचा...!
कुठल्याही कार्याचा श्रीगणेशा करण्याआधी घरातील जेष्ठ मंडळीचा सल्ला घेतला जायचा. त्यांच्या अनुभवाचे सर्व विचार करायचे. त्यामुळे घरातील देवघरा नंतर महत्वाचे स्थान म्हणजे घरातील वयस्करांचे होते...
आताची वास्तविकता पार वेगळी आहे. काळानुसार घरात गुळगुळीत फरश्या बसल्या आणि घरातील सदस्य घराच्या मर्यादा आपआपल्या सोयीने ठरवू लागले.
मोठी माणसं नाहीशी होत आहेत त्यामुळे धाक नावाची गोष्ट सुद्धा लोप पावत चालली आहे. मर्यादा, धाक , शिस्त , संस्कृती इत्यादि प्रकारच्या या गोष्टी हल्ली व्हॉट्स ऍप वर सकाळी सकाळी वाचण्यापुरत्या राहिल्या आहेत...
पूर्वी ह्याच गोष्टी, चालीरीती घरातील मोठी माणसे सांगायची. म्हणून घरात मोठी वयस्कर माणसे पाहिजेत. संध्याकाळी दिवे लावणीला शुभंकरोति - रामरक्षा- आरतीचे स्वर कानावर पडायलाच पाहीजेत. रात्री घरी उशिरा आल्यानंतर काळजीपोटी प्रश्नोउत्तरे झालीच पाहिजेत...!
रात्रीचं उरलेलं अन्न टाकून देण्याऐवजी त्याला फोडणी -तडका देऊन आणखी चविष्ट व चटपटीत बनवून सकाळच्या न्याहरीत वाढणारं कुणीतरी पाहिजे...मोजून-मापून खर्च कसा करायचा याचे धडे शिकवणारं...
चुकलं तिथे रागवायला व कधीतरी तोंड भरून कौतुक करायला...! घरात कुणीतरी मोठं पाहिजे हो.!
एकाच छताखाली सर्वांना एकत्र पद्धतीत बांधून ठेवणारं, टिव्ही बंद ठेवून सर्वांनी सोबत जेवण कां करावं यामागचं कारण उत्तमरित्या पटवून देणारं, घराबाहेर पडतांना देवापुढचा अंगारा कपाळावर लावणारं, आनंदाच्या वेळी पटकन देवापुढे साखर ठेवणारं, तर संकटाच्या वेळी आपल्यासाठी देवाला पाण्यात ठेवून माळ जपत प्रार्थना करणारं...
खरंच घरात कुणीतरी मोठ पाहिजेच..!
पिकलेले पांढरे केस असू देत की अंधुक झालेली नजर.. आशीर्वाद देताना थरथरणारे हाथ असू देत की सुरकुत्या पडलेलं शरीर.. लिंबू-मिरचीला मानणारे विचार असू देत की कावळ्याच्या शापाला घाबरणारे मन.. एक गोष्ट चार-चार वेळा सांगणारं बडबडं मुख असू दे की कमी ऐकू येणारे कान.. कसं कां असेना पण सांगसवर करणारं ... घरात कुणीतरी मोठं पाहिजेच...!
ज्या झाडाला फळं-फुलं येत नाही त्या झाड़ाला आपण बिनकामी झाड म्हणतो. परंतु ते झाड़ फळ-फुलं जरी देत नसलं तरी निदान सावली तरी देतं.. त्या सावलीसारखीच घरातील मोठी-वयस्कर माणसं असतात...!
त्यांच्या असण्यानेच आपल्याला नकळत खूप आधार होतो. त्यांचे अस्तित्व आपल्यासाठी खुप मोलाचे असते. घरातून बाहेर पडतांना डोकं ठेवून नमस्कार करण्यासाठी घरात ते अनुभवी पाय पाहिजेतंच...!
घरात मोठं कुणीतरी पाहिजेच हो...!..
🌸💐🌸💐🌸💐🌸💐🌸💐🌸💐🌸💐
Comments
Post a Comment
Did you like this blog