◾विशेष लेख :- शुभ दुपार... एक लेख अवश्य वाचा | prayerna Blog
रोजच्यासारखा अलार्म १५ मिनिटं स्नुझ केला आणि कूस बदलली. बघते, तर समोर खुर्चीत हा बसलेला. पिटुकला, गोजीरा. गोड हसून म्हणाला, 'सुप्रभात. ओळ्खलस का मला?' मी गोंधळलेलीच. तोच म्हणाला, 'दिवसरात्र माझा उद्धार करत असतेस आणि मला ओळखलं नाहीस? मी कोरोना.'
मला हसायलाच आलं. 'तोंड पाहिलंयस आरश्यात? तो कोरोना किती भयंकर दिसतो! अक्राळ विक्राळ चेहरा, आग ओकणारे डोळे. ईई. पाहिलंय मी न्युज चॅनल्स वर'...
'तुझा अजून ह्या चॅनेल्सवर विश्वास आहे???' त्याने इतकं ठासून विचारलं की मी वरमलेच. दुसऱ्या क्षणी तंतरली ना माझी. 'बापरे! माझा मास्क कुठाय.... स.. स.. सॅनिटायझर???'
'किती हायपर होत्येस? इतक्या वेळात काही केलं का मी तुला? सोशल डिस्टन्स ठेवून बसलोय ना? ऐक, मला कौंसेलिंग हवंय. खूप डिप्रेशनमध्ये आहे मी.'
फेकू नकोस.तुला कसलं डोंबलाच डिप्रेशन?'
'सगळे राग राग करतात माझा. नकोसा झालोय मी सगळ्यांना. सारखं गो कोरोना गो. माझ्या मित्रांनी पण टाकलंय मला!!'😢 'तूझे मित्र??'
'मग! Falsifarum, vivax , h1n1 ,HIV, ebola, ecoli... कुणीही बोलत नाहीत माझ्याशी. मी त्यांचा TRP कमी केला ना!' 'TRP??' 'एका चॅनेल अँकरच्या शरीरात होतो. त्याच्याकडून शिकलो हा शब्द. मला बॉस म्हणाला होता, माणसांच्या सहवासात जातोयस, माणसं खूप हुशार आहेत ,जमेल तेवढं शिकून घे!!'
'तुला बॉस आहे??'
' हो मग! आधी खूप घाबरलो होतो आम्ही. माणूस एवढा बुद्धिमान, सामर्थ्यवान! आमचा कसा टिकाव लागणार? पण बॉस म्हणाला, माणसाच्या बुद्धीवर अहंकाराचा पडदा पडलाय, शिवाय माणूसच माणसाचा सगळ्यात मोठा शत्रू आहे, तो तुम्हाला मदतच करेल. तसंच झालं आणि!!'
'म्हणजे तू माणसावर खापर फोडतोयस. अरे लाखो लोकांना जीवे मारलायस तू. थोडी लाज बाळग' 'माणसे मेली त्याला मी कारणीभूत ठरलो मला मान्य आहे. पण मला माणसांना मारायचं नव्हतं ,मी फक्त राहायला जागा शोधत होतो. No motive of murder.. एका पोलीस काका कडून ऐकला हा शब्द ☺️☺️. ' 'उगाच शाईन मारू नकोस. दुष्ट कुठला!'
'मी नाहीये ग दुष्ट. पण मला जगायला माणसाचं शरीर लागतं त्याला काय करू? आणि तुला वाटतं इतकं सोप्प नाहीये ते. आम्हाला पण माणसाच्या पॉवरफुल आर्मीचा सामना करावा लागतो, तुमची इम्युनिटी. पण बॉस म्हणाला, की ती आळशी झालीये. काही कामच नाही तिला. तुम्ही लहानपणीच कितीतरी लशी टोचून घेता, आणि शिल्लक राहिलेल्या जंतूंना तुमचे ते 99.9% वाले बाहेरच खतम करतात. पाणी बिस्लरी नाहीतर फिल्टरचं. जंतू जातच नाहीत शरीरात. पेशींना सवयच नाही राहिल्ये लढायची. म्हणजे बघ, चीनची आर्मी कितीतरी स्ट्रॉंग आहे, पण त्यांना युद्धाची सवयच नाही, इंडियन आर्मी सतत लढतेच आहे, त्यामुळे ते एकदम तयार आहेत, तसं काहीसं.. एका रिटायर्ड कर्नल कडून शिकलो बरं का हे सगळ! ' 'तू एका सैनिकाला मारलस???'
'छे!उलट मीच जेमतेम जीव वाचवून निसटलोय. नुसतं आत शिरायचा प्रयत्न केला तर तुटून पडल्या सगळ्या पेशी माझ्यावर. कसाबसा वाचलो मी. काका अजून रोज व्यायाम करतात ,५ किमी चालतात ,आहार एकदम सकस, योगा करतात, लाफटर क्लबला जातात. त्यांच्यापुढे काय माझी डाळ शिजणार. म्हटलं, असं रँडम कुठेही जाऊन नाही चालणार. मग थोडा रिसर्च केला, आणि कळलं ,काही काही माणसांची आर्मी त्यांच्या विरोधात जाते आणि त्यांच्यावरच हल्ला करते. तिची आम्हालाच मदत होते. पानिपतात मराठे अशाच फितुरांमुळे हरले ना?'
'इतिहासाचा प्राध्यापक वाटतं?'
'हो ग. त्याला होता असा आजार. ऑटो इम्युन का काय ते. एकदम आरामात एन्ट्री मिळाली मला. पण मग तो खूप आजारी पडला आणि गेला. इतकं वाईट वाटलं मला. पण बॉस म्हणाला, ह्यात तुझा काही दोष नाही. ही अस्तित्वाची लढाई आहे, कधी तू वरचढ ठरशील तर कधी माणूस. तरीपण मी नाईलाज झाल्याशिवाय आजारी माणसाच्या वाटेला जात नाही. एकतर तो वारला तर परत दुसरी जागा शोधावी लागते, आणि मनापासून सांगतो,खरच मला अपराधी वाटतं. त्यापेक्षा घाबरट माणूस पकडावा! भितीमुळे त्याचा स्ट्रेस वाढतो, मग कॉर्टिसोल वाढत ,शरीरात असंतुलन होतं ,सगळी ताकद स्नायूंकडे जाते आणि हृदय, किडनी ,फुफुस दुबळे होतात. आमचं काम सोप्प होतं मग!!'
' हम्म, हे ज्ञान कुणी दिलं??' '
तूच नाही का परवा तुझ्या वर्कशॉप मध्ये सांगितलंस. खरं ठरलं यार ते. म्हणून बॉसने तुझ्याचकडे पाठवलं मदतीसाठी.'
मी कपाळावर हात मारून घेतला. 'मला कितीही हरभऱ्याच्या झाडावर चढवलस तरी तुझं पाप कमी होणार नाही कळलं. बरबाद केलस तू माणसाला.'
'ठिकाय, माझंही चुकतं कधी कधी पण माणसाचा काहीच दोष नाही? दोन टोकाचं वागतोय माणूस. एकतर इतका घाबरतो की कडी कुलपात बंद करून घेतलय स्वतः ला. हवा नाही, सूर्यप्रकाश नाही. इतकी साफसफाई की त्याच्या शरीराला आवश्यक असलेले बॅक्टेरिया पण मरतायत. एक शिंक आली की लगेच सतरा चाचण्या, हॉस्पिटलमध्ये ऍडमिट व्हायचं. ह्यापायी लॅब्स आणि वैद्यकीय सेवेवर उगाच ताण येतो आणि ज्यांना गरज आहे त्यांना वेळेवर इलाज मिळत नाहीत. दुसरं टोक म्हणजे अगदी बेजबाबदार वागायचं. स्वच्छता, सोशल डिस्टन्स पाळायचं नाही, उगाच गर्दी करायची, दाढीसारखा हनुवटीवर मास्क लावतात. काय फायदा. रस्त्यात थुंकतात, खोकताना तोंडावर रुमाल धरावा एव्हढाही विचार करत नाहीत. आणि रोग पसरला की मला शिव्या घालतात.
'इतकी अक्कल पाजळतोयस तर आता ह्या सगळ्यावरचा उपाय पण सांग की'
'छे ग, मी नुसता रट्टू पोपट, खरच उपाय हवा असेल तर माझ्या बॉसला भेट. Genius! सगळ्या प्रश्नांची उत्तरं असतात त्याच्याकडे. त्याला म्हटलं कसकाय जमावतोस हे ,तर नुसतं हसतो आणि म्हणतो, elementary my friend, elementary. म्हणजे काय कोण जाणे !!'
'शेरलॉक बॉस आहे तुझा ???'
'काहीही काय? तुला कळलं नाही का अजून? आमचा बॉस, गुरू, एकमेव... निसर्ग. माणसाने त्याला शरण जावं. सगळे प्रश्न सुटतील तुमचे 😊😊.
' तू माझ्याकडे मदतीसाठी आलास आणि माझच कौंसेलिंग केलंस की'
तो परत गोड हसला. 'मी काही तुमचा शत्रू नाहीं ग. शेवटी आपण सगळे निसर्गाचे घटक. एकमेकाला धरून राहायला हवंय. आनंदी रहा, घाबरू नका, इम्युनिटी वाढवा. ताजी हवा, सूर्यप्रकाश ह्यामुळे निम्मे आजार पळतात. आहाराकडे लक्ष द्या. काळजी करू नका,पण काळजी घ्या मात्र. इतरांना पण मदत करा. म्हणजे तुम्हाला माझ्यापासून धोका नाही. आपण अगदी एकत्र राहू शकतो. आणि काही बिघडलं तर धोक्याची घंटा देतोच मी. त्यावर लक्ष ठेवा फक्त. चल पळतो आता. लाकडावर फार काळ जगू शकत नाही मी. बाय.....'
इतक्यात जोरात बेल वाजली. धोक्याची की काय ह्या भीतीने दचकून उठले मी. तर शेजारी स्नुझ केलेला अलार्म वाजत होता. 'आई उठ. कितीवेळ वाजतोय तुझा अलार्म'. माझी मुलगी म्हणाली. मी उठले. तिला म्हटलं, तू म्हणत असतेस ना सारखी, वॉकला जाऊया म्हणून, चल जाऊ. फक्त नीट मास्क लाव, आणि घरी आल्यावर स्वच्छ हात पाय धुवायचे, आंघोळ करायची, कळलं? आणि गरम लिंबूपाणी देईन ते प्यायचं मुकाट्याने!!'
'आई, काय झालं तुला अचानक? कालपर्यंत बाहेर जाऊया म्हटलं की नुसती हायपर होत होतीस. एका रात्रीत हृदयपरिवर्तन???'
मी हसून तिला नुसतच थोपटत म्हटलं, elimentary my friend ,elimentary!!!!😊😊
Comments
Post a Comment
Did you like this blog