◼️ कविता :- माझ्या मामाचे गाव

________________________

मांगीतुंगीच्या पायथ्याशी 
हिरव्या शालूनं नटलेलं
माझ्या मामाचं गाव आहे
पंचक्रोशीत गाजलेलं..

वळणा वळणाची वाट
डोंगर रांगांचा तो थाट
शेलबारीचा लागे घाट
तिथे पक्ष्यांचा किलबिलाट

आजी आजोबांची छाया
मामा मामीची प्रेमळ माया
एका पंगतीत बसवती
दुध तूप लोणी खाया..

शेते मामाची बहरलेली
पक्षी आम्हां साद घाली
सूर पारंब्यांचे चाले डाव
वडपिंपळाच्या पाराखाली

मोसम नदीच्या किनारी
पानाफुलांत रमायचो.
आंबे चिंचा बोरं आम्ही
चोरून तिथं खायचो..

किर्तन हरिपाठाचा गजर
आपुलकीचा मनी भाव..
असे डेरेदार आणि भारदार
आहे माझ्या मामाचे गाव..

सौ.सविता पाटील ठाकरे
सिलवासा,दादरा नगर हवेली
©️प्रशासक,मराठीचे शिलेदार समूह

🚂🌳🚂🌳🚂🌳🚂🌳🚂🌳🚂
*अजिंक्यतारा पायथ्याशी*
*गाजले जगी नाव*
*सप्ततारा भव्य सातारा*
*माझ्या मामाचे गाव...||१||*

*उंच सप्त डोंगरांमध्ये*
*शहर टुमदार*
*इतिहास घडविलेले*
*खड्ग धारदार...||२||*

*कला साहित्य नि शिक्षण*
*परिपूर्ण सा-यांनी*  
*बदलली दिशा अवघी*
*वाहणाऱ्या वा-यांनी...||३||*

*राजधानी ही स्वराज्याची*
*भूमी शूर वीरांची*
*इथेच सदा निर्मियेली*
*काव्ये थोर संतांची...||४||*

*माहेरघर संस्कारांचे*
*देशात आहे छान*
*कार्यकर्तृत्वाचाही ठसा*
*विश्वात बहुमान...||५||*

✒ श्रीगणेश शेंडे , भुईंज , सातारा.
© सदस्य , मराठीचे शिलेदार समूह.

🚂🌳🚂🌳🚂🌳🚂🌳🚂🌳🚂
मामाचा गाव आहे छोटा
गावात मामा लई मोठा
दारी गायम्हैशींचा गोठा
दुधदुभत्यांचा नाही तोटा

गावात तालीम आहे भारी
घरात आहे मामी कारभारी
ठेवते भाच्च्यांची खुशमस्करी
लुगडे नेसते पहा जरतारी

दारात नारळ पोफळी
गुलाबाला खुलली कळी
निसर्गाचे गावाला वरदान
थंड हवा जणू माथेरान

शंकराच्या मंदिराचे शिखर
देव्हार्यात गणपतीला मखर
दिवाळीला होते आतिशबाजी
लाडू करंजी खुसखुशीत भजी

पारावर रंगतात मस्त गप्पा
मामाला गाव सारं म्हणत अप्पा
शाळेचे पटांगण भलतेच मोठे
दारात सर्वांच्या बसायला ओटे 

तुम्ही पण आता चला 
आमच्या मामाच्या गावाला
जांभळं करवंद मिळतील खायला
गावात मोठी विहिर आहे पोहायला

श्रीकांत दीक्षित, शाहूनगर, पुणे.
सदस्य,© मराठीचे शिलेदार समूह.

🚂🌳🚂🌳🚂🌳🚂🌳🚂🌳🚂
किती सांगावी महती
त्याची तुम्हाला राव
वात्सल्यप्रिय ते
माझ्या मामाचे गाव

लहान - थोरांचा तेथे
सारे राखतात मान
तंटामुक्त म्हणून गावाची
पंचक्रोशीत शान

सणासुदीला मिळून गाव
घाली जेवणाचा घाट
एकोप्याने राहण्याचा
पाहावा त्यांचा थाट

आळसाला नाही थारा
आहे कामाला भाव
कष्टप्रिय आहे ते
माझ्या मामाचे गाव

अस्वच्छतेचा करून नायनाट
केला स्वच्छतेचा स्विकार
माझ्या मामाच्या गावाला
मिळाला निर्मलग्राम पुरस्कार

देशसेवेसाठी नेहमी पुढे
गावाचे त्या नाव
आदर्शवत आहे ते
माझ्या मामाचे गाव

श्रीम. आशा नरवडे
माणगाव, रायगड
©️सदस्या मराठीचे शिलेदार समूह

🚂🌳🚂🌳🚂🌳🚂🌳🚂🌳🚂
माझ्या मामाचे गाव कोकणात वसलेलं
लाल मातीनं हो घर मामाचं बांधलेलं....

मामाच्या घराभोवती झाडांचे कोंदण
आंबा,फणस ,सुपारी झाडांचे रिंगण...

आदित्य डोईवरी सूर्यकिरण तेजाळतो 
घरातला देव्हाराही सूर्यकिरणांनी चमकतो...

घर मामाचं डोंगर रांगांच्या हो कुशीत
सर्व आम्ही भाचे आहोत फारच खुशीत....

मामाच्या घराभोवती फुले खूप कर्दळ
आहे बागेत मग काय सर्वांचीच वर्दळ....

घर मामाचं सर्व माणसं हो माझीच
जपतात मामाकडे माणूसपण आधीच...

वसुधा नाईक,पुणे*
सदस्या मराठीचे शिलेदार समूह

🚂🌳🚂🌳🚂🌳🚂🌳🚂🌳🚂
स्वप्नात माझ्या आले
माझ्या मामाचे गाव
सांगू का तुम्हाला
कोकण त्याचे नाव

मामाच्या गावचा 
काय वर्णावा थाट
वळणाची वाट नि
वाटेवर झाडे घनदाट

मामाच्या गावचा 
गोडवा न्यारा
वसले असे टुमदार
भोवती डोंगराचा पहारा

आंब्याची वाडी
नारळाची गोडी
बकुळीची फुले अन
गर्द कर्दळीची झाडी

फेसळणारा सागर
खाऊन जातो भाव
काजू फणसाच्या बागेनी
नटला मामाचा गाव

गोड गोड आठवांचा
मन घेत ठाव
जेंव्हा आठवे मला
माझ्या मामाचे गाव

सौ संगीता म्हस्के पुणे
©️सदस्य मराठीचे शिलेदार समूह

🚂🌳🚂🌳🚂🌳🚂🌳🚂🌳🚂

माझ्या मामाच्या गावी
आंबा-फणसांचा मळा
आजी-आजोबांच्या प्रेमाचा
खरा लागतोय लळा

मामा दिलदार मोठा
मामी सुगरण भारी
पुरे जिभेचे चोचले
होते मेजवानी खरी

आजी प्रेमळ मनाची
आजा फणसाची गर
ऊब पदरांत त्यांच्या
नाही येते कशा सर

गोठा गायीनं भरला
दूध भरुन सांडते
माझ्या मामाच्या रे गावी
कष्ट दु:खाला भांडते

मामेभाऊ-बहिण ते
लावी किती लाडीगोडी
येता लाडात कौतुके
काढी जाणून रे खोडी

माझ्या मामाच्या रे गावी
वाहे गोदामाय सुखी
तिच्या निर्मळ झऱ्यात
नाही मुळी कोणी दु:खी

माझ्या मामाच्या रे गावा
सुख अखंड नांदावे
टेकवून माथा तिच्या
तिला पुजावे वंदावे

माती मुठीत घेताच
होई कृत्यकृत्य जो-तो
माना अथवा नका मानू
तिथे भगवंत नांदतो 

 - इंदुरवार बि. आर .
           गोकुंदा , किनवट.
 © सदस्य , मराठीचे शिलेदार समूह

🚂🌳🚂🌳🚂🌳🚂🌳🚂🌳🚂

सुट्टी लागली की भुर्रकन्
मन घेतं धाव..
डोळ्यापुढे उभा राहतो
माझ्या मामाचा गाव..
यंदा मात्र भलतंच घडलं
भली मोठी सुट्टी मिळाली
बघता बघता सगळी सुट्टी
लाॅकडाऊननेच गिळाली..
खेळताना आम्ही म्हणायचो
मामाचा पत्र हरवलं 
यंदा गावच हरवून जाईल
असं कसं देवा ठरवलं..
वाट पहाणारी आजी
लाड करणारे आजोबा
मामा मामीचा मी तर
पुरता आहे लाडोबा
सगळयांना मोबाईलवरच
दुरून दुरून पाहतोय
मामाच्या गावाला जायला
जीव माझा झुरतोय..
तुम्ही तरी मामा आता
माझ्याकडे येऊन जा
लाडक्या तुमच्या भाच्याला
गोड पापी देऊन जा..
गाव तुमचा आता
स्वप्नात दिसतोय मला
लवकरच मी ही येईन
माझ्या मामाच्या गावाला..!

स्वाती मराडे, पुणे
©सहप्रशासक, मराठीचे शिलेदार समूह

🚂🌳🚂🌳🚂🌳🚂🌳🚂🌳🚂

माझ्या मामचे
गाव लय भारी 
दर दिवाळीला 
असे माझी स्वारी 

चकल्या लाडुंची
मजाच लय न्यारी 
मुले जमतात  
खेळायला सारी 

घेऊ फराळाचा तडका 
दिवाळी आली उरका 
न्हाऊन ऊटण्याची आंगोळी 
करितो सजावट व रांगोळी 

दिवाळीची स्वच्छता 
सर्वस्व आनंद देता 
आकाशकंदील करुया 
आनंदी क्षण स्मरुया 

पाडवा दिपावली
सर्वांची मने उत्सुकतेने भरली 
स्मरुया धनोत्रयोदशी 
पल्याड झाली एकेदिवशी 

माझ्या मामाचा रूबाब 
आहेच गावात न्यारा 
सदासदाच फिरतो 
त्याच्या  गावावरा  

अथर्व दळवे वर्ग ७ वा
शेखराजूर तालुका पालम जिल्हा परभणी
© सदस्य मराठीचे शिलेदार समुह

🚂🌳🚂🌳🚂🌳🚂🌳🚂🌳🚂

गाव हे मामाचे, नद्या ओहळाचे
डोंगर दर्‍याचे, कड्याकपारीचे.... //

नागमोडी वाटं, अवघड घाटं
झाड झुडपाचे, रान घनदाटं.... //

सर्जा राजाची ही , खिल्लारी बैलांची
गाडी घुंगराची, माझ्या रे मामाची..//

उधळती खोंडं, देई मामा हाकं
शेपटीचा गोंडा , झुलतो हवेतं.. //

चार कोस दूर , मामाचे शिवारं
पिकाची बहरं , मळा गारेगारं. //

मामाच्या जोडीने, मामी हौशी फारं
खोचूनी पदरं, राबे दिनभरं.. //

दोघांनी कष्टाने, मोती पिकवले
धान्याचं रे धन, वाड्यात भरले.. //

दूध दूभत्याचा, रतीब सततं
मामी म्हणे कान्हा,  तुझे हे गोकुळ. //

राधा माझी पोरं, दिसे भारोभारं
मामा म्हणे भांजा,  उडवूया बारं//

मायेचे सोहळं, असं हे आजोळं
मामाचे रे गाव, माझ्या मामाचे गावं.. //

विष्णू संकपाळ बजाजनगर औरंगाबाद
©सदस्य मराठीचे शिलेदार समूह

🚂🌳🚂🌳🚂🌳🚂🌳🚂🌳🚂

नदी वाहते गात गाणी
सुमधुर गोड बोलानं
माझ्या मामाचं रे गाव
तिथं वसलं डौलानं

साधं कौलारू ते घर
बांधलं मामानं नेटानं
मामा जपतो माणसाला
काळजातल्या काळजीनं

खेळ उनाड रांगडे
किती खेळले तोऱ्यानं
जीव लावाया शिकवलं
लाल गावच्या मातीनं

रानी जम्मडी जम्मतं 
भिजू पाटाच्या पाण्यानं 
अन खेळता खेळता
जायचो वाळून उन्हानं

आजीची खरपुस भाकरी
चुलीवरचं भारी कालवणं
गप्पांच्या फडात  साऱ्या
पोटभर व्हायचं जेवणं

माझ्या मामाच्या गावात
येई आनंदाला उधाणं
लाख मोलाची माणसं
तिथं हृदयाच्या श्रीमंतीनं

सौ छाया जावळे
वाई,सातारा
सदस्या, मराठीचे शिलेदार समूह

🚂🌳🚂🌳🚂🌳🚂🌳🚂🌳🚂

आईचा एकुलता एक भाऊ
माझा मामा देखणा छान 
मायाळु,कर्तबगार,रुबाबदार,
ठेवतो तो सान थोरांचा मान 

कोकणच्या घाटमाथ्यावर 
फळा फुलांनी लगडलेले
माझ्या मामाचे गाव सुरेख
निसर्गाच्या कुशीत वसलेले 

गावच्या रानात रानमेवा खात
दंगामस्ती बेधुंद बालगोपाळांची
ओढयाजवळच्या प-हात पोहत
न्यारीच त-हा मामाच्या गावाची

परी मामाचे गाव आता
वाटे स्वप्नातले गाव मजला
आधुनिकता अन् शहरीकरणाने 
गावचा सारा नक्शाच बदलला

आयुष्याच्या या वळणावर 
वाटे मज अंतरातुन कधी कधी 
मामा जाता काळाच्या आड
मिळेल का मामाचे गाव पुन्हा कधी.....

सौ. सुनिता लकीर आंबेकर
   खानवेल
दादरा नगर हवेली
©️सदस्या मराठीचे शिलेदार समूह

🚂🌳🚂🌳🚂🌳🚂🌳🚂🌳🚂

"जिथं प्रेमाचा,मायेचा झरा,
     खळखळ निर्मळ वाहतो"
"तिथं माझ्या मामाचं गाव
    हक्काने आम्ही नेहमी जातो"
   
"आजी भरवते प्रेमाचा घास
      नातवांचा भरतो प्रेमाचा मळा"
"छान छान गोष्टी आजी सांगते
       आठवते मग बाई अन शाळा"

"नवनवीन पदार्थ खायला
     आजीचा असतो अट्टाहास"
"आई वडिलांचा आजोळी
       कधीच होत नाही भास"

"उन्हाळा ,पावसाळा ,हिवाळा
   विहरीवर पाण्याची मोट चालते"
"नारळ,आंब्याची बाग  सदा
     गोड फळांनी भरगच्च दिसते"

"माझ्या मामाचं गाव हे
     माझ्यासाठी स्वर्गच भासते
"झाडा झुडपाचं नंदनवन
   स्वागतासाठी उभे असते"

✍️श्री हणमंत गोरे
मुपो:घेरडी,ता:सांगोला,जि:सोलापूर
(©सदस्य मराठीचे शिलेदार समूह)

🚂🌳🚂🌳🚂🌳🚂🌳🚂🌳🚂
           
माझ्या गावाच्या शेजारी
       माझ्या मामाचे गाव आहे
माझं गाव हे कुमठा (बु.)
       ज्ञानगंगा मस्त इथं रे  वाहे

माझ्या गावाच्या शेजारी
     शिवणखेड (खु.) आजोळी
पैशाचा पडतोय पाऊस
     ऊस रसदार तोडताच टोळी

माझ्या मामाचे गाव भारी
      दुभती जनावरं रे दारोदारी
शुद्ध गूळाची मिळतेय ढेप
     अपुरी पडे लालपरीची खेप

माझ्या मामाच्या गावामंदी
      काविळीवर उपाय रामबाण
राज्य-परराज्यातून जन येती
     रांगेत रे औषध गोळ्या घेती

माझ्या मामाचे गाव उशाला 
      कोरड माझ्याच रे घशाला
माय संसारगाढा हाकण्यात
      अश्रू साठवते रे पापण्यात

माझ्या मामाचे गाव शेजारी
    मामा निर्वतले पडून आजारी
ताटातूट ही बहिण-भावाची
    स्नेहवेल सुकली त्या गावाची
    
    स्नेहवेल सुकली त्या गावाची

       श्री.संग्राम कुमठेकर
           मु.पो.कुमठा (बु.)
   ता.अहमदपूर जि.लातूर
सहप्रशासक/परीक्षक/संकलक
©️मराठीचे शिलेदार समूह

🚂🌳🚂🌳🚂🌳🚂🌳🚂🌳🚂


माझ्या मामाचे गाव
पिंपळकोठे आहे नाव
पिंपळवृक्ष डेरेदार
गाव समृद्ध बहारदार.

मळ्यात बंगले बांधून
सकल गाव उभारला 
शुद्ध  हिरव्या वनराईत
समृद्ध पिकांनी बहरला.

माझ्या आजोळाची
ऐटच खूप न्यारी
नात्यांची स्नेहवेल
बहरलीय गुंफण भारी.

घरोघरी गाई म्हशी
धष्टपुष्ट सारेजण
दूध दुभते अहोरात
कष्टाची नाही वाण.

स्नेहबंधन प्रेमभाव अन्
भाचे भाचींना  लई मान
मामामामी आजीआजांच्या
छायेखाली शिकले  छान.

आंबे चिंचा बोरं खायची
मामाच्या गावी मजा यायची
मैफिल गप्पा गोष्टींची 
दिवस रात्र रंगून जायची 

✍️ श्रीमती सुजाता पाटील.
सिलवासा दादरा नगर हवेली.
सदस्या मराठीचे शिलेदार समूह.

🌸💐🌸💐🌸💐🌸💐🌸🌸💐

डोंगर कपारींतून
वळणावळणाच घाट
आजूबाजूला सज्ज वृक्ष सांभार
दिसे सर्वत्र हिरवळीचा थाट.

पावसाळा ऋतू बरवा
पसरला सर्वत्र रंग हिरवा
डोंगरांतून वाहती दुधाळ झरे
दिसे सर्वत्र रानमेवाचा ताटवा.

झुळझुळ वाहणार सरीता
पाहण्याचा आनंद देई सदा
थंडी येथे आल्हाददायक
धुक्याची चादर पसरते अनेकदा.

परसात आंब्या पोफळीच्या बागा
फळे गोमटी मिळती खाया
तळ्यातील चविष्ट मासे, खेकडी
माळ्याच्या भाज्या असती ताज्या.

गाई, म्हशींचे धारोष्ण दूध
जिव्हाळ्याचा सदा वर्षाव
स्वर्गातून सुंदर भासे मज
माझ्या मामाचे कोकणातील गाव.

सौ वंदना बिरवटकर , मुंबई
सदस्या मराठीचे शिलेदार समुह


➖➖➖➖🌾🍃🌾➖➖➖➖
विजेत्यांनी संस्थेच्या सभासद नोंदणीसाठी व सन्मानपत्रासाठी मुख्य प्रशासकांशी संपर्क साधावा

➖➖➖➖🌾🍃🌾➖➖➖➖

🔶🔴🔶🔴🔶🔴🔶🔴🔶🔴🔶🔴🔶🔴🔶

Comments

Popular posts from this blog

◾संघर्ष कथा :- एका आदिवासी जमातीतील कलेक्टर डॉ. राजेंद्र भारूडची ही संघर्ष कथा एकदा नक्की वाचा,खरचं प्रेरणा मिळेल ...

देतो तो देव - बोधकथा

हिरव्या हिरव्या श्रावणात ... | मराठी कविता | संजय धनगव्हळ

कविता :- 📝 पत्र शेवटचं लिहितो आहे ...

◼️हास्य कविता :- दारूड्याची नशा ...

◾ललित लेख :- स्ञी

◾विशेष लेख :- विक्रम साराभाई यांचा एक सत्य किस्सा अवश्य वाचा !

◼️ बोधकथा :- अति तेथे माती

◼️ ललित लेख :- शेवटी काय सोबत घेऊन गेला तो भिकारी ...