◼️ बोधकथा :- उकराल माती तर पिकतील मोती
एक गाव होतं.कामेगाव त्याच नाव .गाव कसं ? खेडेगावच म्हणा ना ! इनमिन तीस - चाळीस घरे असतील तिथे . सगळ्यांना शेतीवाडी भरपूर.किसन नावाचा शेतकरी तिथेच रहायला होता.चांगली चाळीस एकर शेती होती त्याला.राधा त्याची बायको.दोघेही घाम गाळून शेतीत राबायचे.देवानं चारं लेकरं दिली पदरात त्यांच्या.पोरांवर त्यांचा खूप जीव.राधा तर पोरच आहेत म्हणून लाड करायची. किसन म्हणायचा ,"अगं राधे,लै लाडकोड नगं करू .जरा त्यांना बी कष्टाची जाणीव व्हवू दे ." पण आईचा जीव कुठं ऐकतय ? ती आपली दुर्लक्ष करायची . पोरं शिकतील,मोठी सायब , नोकरदार होतील , असे स्वप्न ती बघायची.दिवसामागून दिवस चालले.पोरं लाडानं शेफारली.वयानं मोठी झाली पण कामं करायची त्यांना माहीत नव्हती.आळशी बनले सारेच.
किसनच्या हातात आता काठी आली.राधेच्या पण डोळ्यांवर चष्मा आला.लेकरांच्या काळजीने ,विचाराने तिला बेचैन व्हायचे.ती किसनकडे तिच्या भावनांचा निचरा करायची.एके दिवशी अचानक किसनची तब्येत बिघडली.त्याने पोरा़ंना जवळ बोलावले आणि म्हणाला,"बाबांनो , मला आता बोलावणं आलंय , माझ्या माघारी आईला सांभाळा, तुम्हाला कुणालाच राधीलाबी नाय सांगितलं मी,तुमाला कुणालाच तरास नगं म्हणून मी पैशाचा हंडा शेतात गाडून ठिवलाय,तेवढा काडा हुडकून अन् खुशाल मजेत राव्हा.आईलाबी सांभाळा तुमच्या."एवढे बोलून किसनने मान टाकली.सगळ्यांची रडारड झाली.आलेले पावणे रावळे हळूहळू गेले.
राधाला काळजी वाटू लागली, पोरांचं कसं होणार.गावात किसनचा जिगरी दोस्त रामराव होता.किसनच्या चारही मुलांना त्याने सांगितले की वडील तुम्हाला जे बोलले ते अगदी खरे आहे.आता तो पैशाचा हंडा हुडकायचं काम तुमचं आहे.
दुसऱ्या दिवशी चारी पोरं लागली कामाला.कुदळ खो-या घेऊन लागले शेत खणायला .दिवसभर खोदूनही त्यांना हंडा काही मिळाला नाही.रामरावांनी सांगितले,"आरं पोरांनू ,उद्या मिळलं ,". दुसऱ्या दिवशी परत त्यांनी खोदायला सुरूवात केली.त्याही दिवशी काही नाही हाती लागले.असे करत करत संपूर्ण शेत त्यांनी खणून काढले.रामरावांनी त्यांना जवळ बोलावले,"पोरांनू शेत तर खणलावं तुम्ही,आता मिरगाचं नक्षत्र निघतयं ,पाऊस बी येणार ,तवा पेरणी करतावं का बगा ". मुलांना त्यांचे विचार पटले.सगळ्यांनी मिळून पेरणी केली.रामराव म्हणाले तशी वरूणराजाची कृपा झाली.पाऊस पडला तशी थोड्याच दिवसात शेती हिरवीगार दिसू लागली. पीक जोमात वाढू लागले.पोरं बी मन लावून शेतीकाम करू लागली .राधा आनंदात होती,तिची पोरं आता काम करू लागले,आळस झटकून टाकला होता त्यांनी.बघता बघता चार महिन्यांत पाचशे पोती धान्य निघाले शेतातून.सगळ्यांनी मिळून रामरावांच्या मार्गदर्शनाखाली बाजारात विकले धान्य ,उरलेले घरात ठेवले त्यांच्यासाठी.धान्य विकून आलेले पैसे आईच्या ओटीत दिले. राधाबाई चा ऊर भरून आला.रामराव तिथे होतेच.म्हणाले,"पोरांनो ,कष्ट केल्याबिगर दाम मिळत न्हाय.किसन नी तुमाला पैसे शेतात गाडल्याच खोटंच सांगितलं होतं.तुमी कष्ट करावं,स्वत:च्या पायावर उभं रहावं म्हणून त्यान असं केलं.आता झालेलं सारं विसरा,आळस न करता असंच एकोप्याने काम करा , आईला सांभाळा,तुमची एकाची दोन केल्यावर सगळे गुण्यागोविंदाने एकत्र नांदा." एवढं ऐकल्यावर पोरं म्हणाली ,"व्हयं काका !आमची चूक आमाला कळली,आमी आता कष्ट करणार ,राबणार शेतीत , खरंच हाय बाबा बोलायचे पण आम्ही नव्हतो ऐकत ,ते म्हणायचं उकराल माती तर पिकतील मोती ,खरंच कष्टाची किंमत आता आमाला कळली.आमी आता खूप खूप कष्ट करणार ,आईला सुखात ठेवणार ,"असे बोलून त्यांनी रामरावांचे पाय धरले.रामरावांनी पण त्यांना आशीर्वाद दिला.पोर आईशी नतमस्तक झाली ,तशी राधाबाई नी सा-यांना कवटाळले . तिच्या डोळ्यांत आनंदाश्रू येत होते.तिने आकाशाकडे बघत हात जोडले व मनोमन देवाचे आभार मानले.सगळे आनंदाने राहू लागले.
तात्पर्य : आळसाने काही ही साध्य होत नाही.कष्टाचे फळ नेहमी मधूर असते.मेहनत केल्यावर त्याचा मोबदला मिळतोच.
लेखिका :- सौ.रझिया इस्माईल जमादार अक्कलकोट जिल्हा-सोलापूर
______________________________
Comments
Post a Comment
Did you like this blog