देवाचा जन्म कसा झाला.


देव - 

देवाचा जन्म कसा झाला. देवानी माणसाला जन्माला घातला कि माणसानं देवाला जन्माला 
घातलं. फार पूर्वी जेव्हा माणूस इतर प्राण्यांसारखा जंगलात राहत होता तेव्हा त्याला भूकंप, 
विजांचा कडकडाट, ढगांचा गडगडाट ह्याची अनामिक भीती वाटायची. ह्या गोष्टी कशामुळे होतात जे 
त्याला माहित नव्हतं. त्याच्या मनात अनेक प्रश्न होते आणि त्यांना उत्तरं नव्हती. मग त्याने त्या 
नैसर्गिक शक्तींना देव बनवलं. सुर्य, वारा , पाऊस ह्यांना प्रसन्न करण्यासाठी तो त्यांची प्रार्थना करू लागला  
नंतर जेव्हा तो शेती करू लागला तेव्हा तो जमिनीलाच आपली आई समजू लागला. चांगला पिक हे 
सुपीक जमीन, पाऊस आणि सूर्यावर अवलंबून आहे हे कळल्यावर तो त्याची पूजा करू लागला. 
सध्या आपण ज्याला देव - धर्म म्हणतो ह्या पाच दहा हजार वर्षात निर्माण झालेल्या घटना आहेत. 
देवाची कल्पना माणसानं निर्माण केली आहे. आणि माणसानं निर्माण केलेल्या देवाला कसं मान्य करणार. 
माणसांनी त्याच्या कल्पना शक्ती आणि प्रतिभेतून देवाला जन्माला घातले. सगळ्या देवांची, देव कल्पनांची 
उपज माणसाच्या मेंदूतून झालेली आहे. आणि त्यांचे व्यवहार कसे असावेत, नसावेत यांची आखणीही 
माणसानंच केलेली आहे. या देव कल्पना आणि धर्म कल्पनेमुळे आज जगाची खूप मोठी शक्ती आणि 
खूप मोठा वेळ वाया जात आहे. देव कल्पना आणि धर्म कल्पना या आज समस्या आणि अडचनीन्सारख्याच 
झाल्या आहेत आणि घातकही झाल्या आहेत. एकूण मानवजातीत या कल्पनांनी दुफळ्या माजवल्या आहेत. 
त्या कल्पनांचा अतिरेक झाला आहे आणि माणूस ज्या सुखासाठी जीवन जगतो ते सुखच त्याच्या पासून 
हिरावून घेण्या इतपत  त्याची शांती, स्थैर्य धोक्यात आणण्या इतपत त्या माजलेल्या आहेत. देवावरची श्रद्धा 
माणसाचा माणूसपण मारून टाकू शकते, देवाची भीती हि भक्तीचीच दुसरी बाजू आहे. ह्या भीती आणि 
हव्यासापोटी माणूस नको नको ते अत्याचार करीत आला आहे. छोट्या मोठ्या देवांना पशु पक्ष्यांचे नव्हे
तर माणसांचे, लहान मुलांचे देखील बळी दिले जातात. देवाच्या नावानं भोळ्या भाबड्या लोकांची अमाप 
लूट चालते. हि लूट आर्थिक असते, भावनिक असते आणि लैगिकहि असते. श्रद्धेच्या नावाखाली लूट करणारे 
तर दोषी आहेतच, पण ज्यांची लूट होते त्यांना ती लूट आहे असं वाटतच नाही. त्यांच्या दृष्टीने तो श्रद्धेचाच 
भाग असतो. त्यामुळे या देव धर्म कल्पना आता कायमच्या बासनात गुंडाळून ठेवायची आणि प्रसंगी नष्ट 
करण्याची वेळ आलेली आहे. या कल्पना विकृतीच्या अंतिम टोकाला येउन पोहोचल्या आहेत. त्यामुळे त्या 
थांबवणे किंवा त्यांचा लय करणे हे गरजेचे होऊन बसले आहे. तरच जग खऱ्या अर्थाने सुखी होऊ शकेल.  

गेल्या शतकात दोनशे कोटी लोकांची हत्या धर्म, वंश, पंथ, राष्ट्र यावरून होणाऱ्या संघर्षा मुळे झाली आहे. 
हि एक भयानक शोकांतिका आहे. कोणत्याही संवेदनशील माणसाला विशन्न करणारी अशी हि वस्तु स्थिती आहे. 
वंशाच्या नावाखाली युरोप मध्ये साठ वर्षापूर्वी लक्षावधी निरपराध मानसं क्रूरपणे मारली गेली. 

परमेश्वराची आठवण आपल्याला होते ती संकटाच्या वेळी आणि भीतीपोटी, आयुष्यात काही कमतरता भासली 
म्हणजेच केवळ नाहीतर एरवी आपल्याला परमेश्वरी शक्तीशी काहीच देणं घेणं नसतं. देवळात जातो तेही काहीतरी 
मागण्यासाठीच, आपण खरे भिकारीच आहोत. पण भक्त म्हणवून घेतो इतकंच. 

परमेश्वराची तर कमालच आहे त्याने तरी आस्तीकांची जमात आणि विरोधी नास्तीकांची जमात का उत्पन्न होऊ द्यावी ? 
उलट नास्तिकापैकी प्रत्येकाच्या श्रीमुखात देऊन त्यानं म्हणावं " हा बघ, मी परमेश्वर समजल ? या पुढे नास्तीक्पणा 
सांभाळण्याचा मूर्खपणा करशील तर आणखी एक ठेऊन देईन" पण परमेश्वर असा काही करताना दिसत नाही. 
तो आपलं अस्तित्व सिद्ध करण्याचा प्रयत्नच करत नाही. काहीच्या मते "देव" नाहीच या परिस्थितीचा त्याला 
विषादही वाटत नाही. आपण मानसं संकटात आहोत म्हणून त्यानं कशासाठी मदतीला धावायचं ? तो काय 
आपला नोकर आहे ? एक नारळ आणि फुलाची पुडी त्याच्या समोर ठेऊन नमस्कार केला कि सर्व काही झालं ? 
त्याच्या बदल्यात आम्ही हजारो गोष्टींची मागणी करायची ?  देवधर्मा मुळे माणूस सज्जन, सत्यव्रत होतो 
हे देखील अर्ध्य सत्य आहे. दुष्ट प्रवृतीची मानसं हि मुळातच दुष्ट असतात तशीच सुष्ट प्रवृतीची मानसं 
मुळातच सज्जन असतात. अशी मानसं नास्तिक असली तरी चांगलीच वागतात . 

देवाचं अस्तित्व कोणत्याही तार्किक पद्धतीने, बुद्धीला पटेल अशा प्रकारे सिद्ध होऊ शकत नाही. 
बरेचजण देव का मानतात - सृष्टीचे संचालन इतक्या नियमबद्ध सुरळीतपणे चालत असल्याची प्रचीती 
आल्यामुळे या मागे कुणी सर्व शक्तिमान सूत्रधार असावा, साध्य साध्य वस्तूही अपोआप तयार होत नाहीत, 
त्यामागे कुणा तरी कुशल निर्मात्याची प्रतिभा व परिश्रम असतात, हा आपला नित्याचा अनुभव आहे, त्यावरून 
विश्व निर्मितीच्या एवढ्या मोठा प्रचंड व्यापामागे अशीच अज्ञात शक्ती असली पाहिजे असा स्वाभाविकच निष्कर्ष 
निघतो. त्या शकतीलच ईश्वर हि संज्ञा  देऊन माणूस मोकळा होतो. पण तेवढ्या साठी ईश्वर मानण्याची गरज नाही. 

देव सर्वत्र आहे असं मानणारे आस्तिक हिंदू ' कणाकणात परमेश्वर आहे ' असं घोकतात. पण भक्ती फक्त देवळात 
जाऊन करतात. मशिदी समोर किंवा चर्च समोर त्यांचे हात जोडले जात नाहीत. का ? तिथल्या कणाकणात 
परमेश्वर नाही ? मुसलमान म्हणणार माशितीतच अल्ला आहे, त्या वरून युद्ध होणार, रक्तपात होणार. 
खरं तर माणसानं माणसा सारखं वागण्या साठी कुठल्या देवाची किंवा धर्माची आवश्यकता नाही. 

गरजूंना मदतीचा हात पुढं करणं, चारित्र संपन्न, सदाचारी असणं, कुणाचंही वाईट न करणं, पैशाचा  
गर्व न बाळगणं यालाच आपण पूजा समजायला हवं, आणि बुद्धिवादी , विज्ञाननिष्ट भूमिका घेऊन आपण जास्तीत जास्त लवकर देवधर्माला सोडचिठ्ठी दिली पाहिजे. 

Comments

Popular posts from this blog

◾संघर्ष कथा :- एका आदिवासी जमातीतील कलेक्टर डॉ. राजेंद्र भारूडची ही संघर्ष कथा एकदा नक्की वाचा,खरचं प्रेरणा मिळेल ...

◼️ बोधकथा :- पाण्यामध्ये मासा झोप घेतो कसा जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे...

कविता :- 📝 पत्र शेवटचं लिहितो आहे ...

◼️हास्य कविता :- दारूड्याची नशा ...

◼️ ललित लेख :- शेवटी काय सोबत घेऊन गेला तो भिकारी ...

◼️ हास्य कविता :- म्हातारा चाललंय लंडनला ...

◼️ कृषी :- शेतकऱ्यांच्या माहितीसाठी विविध लेख...

◼️ बोधकथा :- अति तेथे माती

त्रासाचे झाड - बोधकथा