भूतलावरची येती पन्नास वर्षे



५० वर्षांनी काय घडेल, असा प्रश्न विचारला असता अनेकांचे अनेक उत्तरे येतील. सत्ताधारी स्वतःच्या सत्तेवरच्या पुढच्या पिढीबद्दल बोलेल, ज्योतिषी ग्रहांच्या युत्यांची गणिते मांडेल, शेतकरी कमी पडणाऱ्या पाण्याची चिंता करेल, तर सामान्य वाचक नातवाच्या अॅडमिशनची चिंता व्यक्त करेल ! 

कोणताही शास्त्रज्ञ मात्र या प्रश्नाकडे अत्यंत गंभीरपणे बघून नक्कीच विचारात गढून जाईल. त्याची कारणे तशीच आहेत. औद्योगिक प्रगतीचा वेग, त्यातून निर्माण होणारे रासायनिक प्रदूषणाचे प्रश्न, शहरातील बदलती राहणीची पद्धती, शेती, पाणीपुरवठा या विविध बाबींनी या प्रश्नाला इतके गंभीर स्वरूप आले आहे की कोणीही शास्त्रज्ञ या प्रश्नाला लगेच काहीच उत्तर देऊ शकणार नाही. एकमेकांत विचित्रपणे गुंतलेले असंख्य प्रश्न या पन्नास वर्षात काय काय घडणार आहे, याचे ठोक स्वरूप समोर येऊ देत नाहीत. 

प्रथम सध्याचे भीषण स्वरूपाचे प्रश्न कोणते, याची केवळ यादी बघू या - 

१. पृथ्वीवरील कार्बन डायऑक्साईडचे वाढते प्रमाण. 
१८५० साली हे प्रमाण २६५ पार्टस पर मिलियन किंवा पीपीएम होते, तर १९८८ साली नासाने केलेल्या मोजणीत ते ३५० पीपीएम इतके वाढले आहे. यामुळे पृथ्वीवरील तापमान १ अंश फॅरनहाइटने वाढ झाली आहे. असेच प्रमाण वाढत गेले, तर ५० वर्षांनी ४ अंश फॅरनहाइटने तापमान वाढेल, असा प्राथमिक अंदाज आहे. 

२. सीएफसी किंवा क्लोरोफ्लोरोकार्बनमुळे ओझोनचा थर कमी होत आहे. सूर्याच्या अतिनील किरणांना पृथ्वीवर प्रवेश करायला त्यामुळे जास्त संधी मिळणार आहे. ओझोनच्या थराने या किरणांपासून आपल्याला संरक्षण मिळत असते. याखेरीज पृथ्वीवरील तापमान वाढण्यास कार्बन डायऑक्साइडच्या प्रमाणाच्या जोडीला ही बाब मदतच करेल, असे वाटते. 

३. एकूण तापमान वाढ झाल्यास ध्रुवीय बर्फसाठा वितळून समुद्र पातळी किमान पाच फुटांनी वाढण्याची शक्यता उद्भवते. मुळात जगातील सर्व बंदरे समुद्रपातळीलाच असल्याने पाच फुटांनी वाढलेली पातळी अनेक मोठ्या औद्योगिक शहरात हलकल्लोळ माजवेल. तसेच जगातील अनेक बेटे व बेटसदृश देश नष्टच होण्याची शक्यता आहे. उदारणार्थ आपल्या जवळची मालदीव बेटे. 

४. लोकसंख्यावाढीने सध्याच जगाला हैराण केले आहे. पण हा प्रश्न ५० वर्षांनी वेगळ्या पद्धतीने सुटेल, असा विश्वास शास्त्रज्ञांना वाटतो. एका ठरावीक काळाने म्हणजे अजून चाळीसएक वर्षांनी जगाची लोकसंख्या स्थिरावेल. 

५. अन्नधान्य, रोगराई प्रश्न दुय्यम राहून एड्सचा प्रसार हा प्रश्न मात्र भयानकरित्या समोर उभा ठाकणार आहे. अॅक्वायर्ड इम्यूनो डेफिशियन्सी सिंड्रोम हा प्रकार नवनवीन विषाणूंच्या स्वरुपात पृथ्वीवर ठाण मांडून राहणार आहे, असे दिसते. 

या प्रश्नांच्या अनुषंगाने व सध्याची आपली संशोधनातील गती बघता काय घडेल, याचा एक ओझरता आराखडा समोर येतो. त्यानुसार ५० वर्षांनी : 
जेनेटिक्समधील संशोधन खूपच प्रगत होत जाईल. सर्व प्रकारची बियाणे ही रोगराईला तोंड देण्यास समर्थ असतील, त्यामुळे रासायनिक औषधे फवारे मारणे बंद होईल. धान्योत्पादन दरवर्षी गरजेप्रमाणे केले जाऊ शकेल. पेट्रोलऐवजी अनेक ठिकाणी अल्कोहोलचा वापर सुरू झालेला असेल. आफ्रिका खंडात दुष्काळ जरी वाढला असला, तरी लोकसंख्यानियंत्रणाने व तेथील पाळीव जनावरांच्या मांसामुळे खाण्याची व अन्नाची टंचाई भासणार नाही. दुष्काळाने मृत्यू बंद झालेले असतील. पाण्याची पातळी वाढल्याने बांगलादेश, गंगेच्या तोंडाजवळील त्रिभुज प्रदेश, कच्छचे रण, केरळ व ओरिसाचा बराच भाग हा कायमचा पाण्याखाली गेलेला असेल. उन्हाळ्यामध्ये गंगेचा पूर हा स्थायी स्वरूपाची गोष्ट होऊ लागेल. वयाची नव्वदी गाठणे ही नित्याची बाब असल्याने हा मजकूर वाचलेले अनेकजण सत्तरी ओलांडलेली असूनही कामामध्ये व्यग्र असतील व त्यांच्या ताब्येतीही अगदी उत्तम असतील. निवृत्तीचे वय त्या वेळी बहुधा पंचाहत्तर असेल. विविध शहरांमध्ये शंभरमजली इमारतीवजा छोटी गावेच उभी असून तेथे राहणाऱ्यांचा 'दुसऱ्या अशाच गावांशी', क्वचित प्रत्यक्ष संबंध येत असेल; तर घर, शाळा, दुकान, पार्क, थिएटर, ऑफिस सर्व काही एकाच 'गावा'त असल्याने फक्त मजले बदलण्याचाच प्रश्न दिवसाकाठी वरचेवर येत राहील. या बहुउद्देशीय प्रचंड इमारतींचा विजेचा पुरवठा सर्वस्वी सूर्यऊर्जेपासून होत असल्याने भल्यामोठय़ा तारांचे जाळे सार्‍या शहरभर पसरवण्याची गरजच राहणार नाही. त्याचप्रमाणे दळणवळणासाठी थेट उपग्रहाद्वारेच दळणवळण साधने जात असल्याने टेलिफोन, टीव्ही केबल टीव्ही इत्यादींच्याही तारांचे जंजाळ कुठे आढळणार नाही. कागदी वृत्तपत्र हा प्रकार बंद झालेला असून आवडीचे वृत्तपत्र आयपॅडच्या पडद्यावरच वाचले जाईल. 

५० वर्षांचा काळ मानवी जीवनात फार मोठा आहे. पण शास्त्राच्या प्रगतीच्या दृष्टीने तो अगदीच थोडा कालावधी आहे. त्यातूनही विसाव्या शतकातील प्रगतीचा वेग सर्वांनाच भोवंड आणणारा आहे. ५० वर्षांपूर्वीचा काळ आठवा. त्या काळी आजच्या घडणाऱ्या अनेक गोष्टींची शक्यता तर सोडाच, पण स्वप्नेही कोणी पाहिली नव्हती. मग अजून ५० वर्षांनी होणारी प्रगती कशी असेल, याचा अंदाज बांधायला तर काहीच हरकत नसावी, नाही काय ? 

*'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून*

Comments

Popular posts from this blog

◾संघर्ष कथा :- एका आदिवासी जमातीतील कलेक्टर डॉ. राजेंद्र भारूडची ही संघर्ष कथा एकदा नक्की वाचा,खरचं प्रेरणा मिळेल ...

◼️प्रेरणा :- 🧐 जसा विचार कराल तसेच घडत जाईल | Law of attraction ...

देतो तो देव - बोधकथा

कविता :- 📝 पत्र शेवटचं लिहितो आहे ...

हिरव्या हिरव्या श्रावणात ... | मराठी कविता | संजय धनगव्हळ

◼️ ललित लेख :- शेवटी काय सोबत घेऊन गेला तो भिकारी ...

◼️ कृषी :- शेतकऱ्यांच्या माहितीसाठी विविध लेख...

◾कविता :- नवरा माझा

◾ललित लेख :- स्ञी

◾विशेष लेख :- विक्रम साराभाई यांचा एक सत्य किस्सा अवश्य वाचा !