◾विशेष लेख :- प्रतिसृष्टी निर्माण करणारे दोन देवदुत पती पत्नी !

आपल्या अवतीभवती वाटोळं झालेला निसर्ग, दुषित झालेलं पर्यावरण, प्रदुषित हवा-पाणी-जमिन ह्या सगळ्यांकडे बघुन आपण सर्वजण अस्वस्थ होतो. हळहळतो, सुस्कारे सोडतो, आणि नजर फिरवुन आपल्या कामाकडे वळतो.

एकीकडे शहरी भागात कोरडं, नीरस आणि शुष्क जीवन तर दुसरीकडे जंगल आणि वनांच्या वेगळ्याच समस्या आहेत, तुफान वेगाने होणारी भरमसाठ वृक्षतोड, कोवळ्या, निष्पाप वन्यप्राण्यांच्या हक्काच्या घरांचा नाश, हत्ती असो वा वाघ सिंह, शिकाऱ्यांनी क्रुरपणे केलेल्या प्राण्यांच्या कत्तली, कुठल्याही संवेदनशील माणसाला अवस्थ करतात.

पण ह्या जगात काहीकाही लोक खरोखर अदभुत आणि असामान्य असतात, आपल्या कर्तुत्वाने ते आपल्यासमोर का जगावं आणि कसं जगावं? ह्याचा धडा घालुन देतात. 

 जेव्हा कोट्यावधी आणि अब्जावधी जनता मी आणि माझं बघण्यात धन्यता मानते, तेव्हा काही दैवी व्यक्तीमत्व मात्र स्वार्थानं लडबडलेलं तुच्छ जीवन त्यागुन एक भव्य आणि उदात्त संकल्प घेऊन आपले अख्खे आयुष्य त्या ध्येयासाठी वाहुन घेतात, हे आजकाल तसं विरळच! 

आणि पायाशी सगळ्या सुखसुविधा लोळण घेत असताना, त्यांचा त्याग करुन एक अनिवासी भारतीय जोडपं मागच्या पंचवीस वर्षांपासुन निसर्गाच्या संरक्षणासाठी अविरत झटत असेल तर,

तर मृतप्राय झालेल्या वनाचं हिरव्यागार गर्द वनराईमध्ये रुपांतर करणाऱ्या ह्या जोडप्याला आपण आधुनिक काळातले ऋषीचं म्हण्टलं पाहिजे.

अनिल मल्होत्रा हे तसे मुळचे भारतीय, पण शिक्षण झाल्यावर ते अमेरीकेला गेले, तिथे त्यांचा बांधकामाचा आणि रेस्टॉरंटचा व्यवसाय होता, न्यु जर्सीमधल्या वास्तव्यात त्यांची पामेला नावाच्या मुलीशी भेट झाली, त्यांचं प्रेम जुळलं आणि त्यांनी लग्न केलं.

त्या दोघांनाही निसर्गाचं प्रचंड आकर्षण होतं, ते आपल्या हनिमुनला अमेरीकेतल्याच हवाई बेटांवर फिरायला गेले, आणि तिथल्या निसर्गाच्या प्रेमातच पडले, आणि शेवटी तिथेच स्थाईक झाले. 

१९८६ मध्ये अनिलच्या वडीलांच निधन झालं, जेव्हा वडीलांच्या अंत्यविधीला ते दोघे भारतात आले तेव्हा हरीद्वार आणि आसपासचा प्रदेश पाहुन त्यांना अतीव दुःख झालं, 

प्रचंड प्रमाणात होणारी वृक्षतोड, प्रदुषित नद्या, आणि संवेदना हरवलेलं समाजमन, त्यांना स्वस्थ बसु देत नव्हतं,

भारतातील निसर्गाच्या संवर्धनासाठी काहीतरी करायचं त्यांनी ठरवलं.
पण हे काहीतरी करणं म्हणजे साधं काहीतरी नव्हतं, तर ते त्यांच्या जीवनाचं सर्वस्व अर्पण केल्यासारखंच होतं,

भारतात येऊन निसर्ग संवर्धन करायचं म्हणुन चक्क त्यांनी त्यांची हवाईमधली प्रॉपर्टी विकली, 

पैसे जमवले आणि एका मित्राकरवी त्यांनी कर्नाटकातील कोडागु जिल्ह्यामध्ये, ब्रम्हगिरी भागात, पंचावन्न एकरचं एक ओसाड माळरान विकत घेतलं.

तिथं प्राणी-पक्ष्यांसाठी एक कृत्रिम अभयारण्य बनवण्याचं एक आगळंवेगळं स्वप्न त्यांनी पाहिलं,

त्या माळरानावर झाडं, वेली लावण्यात, प्राण्यांना, पक्ष्यांना हक्काचा निवारा देण्याच्या कामात त्यां दोघांनी स्वतःला दिवसरात्र झोकुन दिलं.

हे इतकं सोपं नाही, थोड्याच दिवसात त्यांच्या लक्षात आलं, आजुबाजुच्या शेतीमध्ये अजुनही घातक पेस्टीसाईड वापरले जात होते.

 त्यांनी जमेल तशी आजुबाजुची शेती विकत घेऊन तिचे गर्द वनराईत रुपांतर करायचा चंग बांधला.

असंख्य अडचणी आल्या, अनेकांनी अनेक प्रकारे त्रास दिला.

पण मल्होत्रा दांपत्य अविचलपणे, खंबीरपणे अडचणींना तोंड देत राहीले,
आज पंचवीस वर्षांच्या अथक परिश्रमाचं फळ की काय, आज त्या ओसाड माळरानाचं स्वर्गालाही हेवा वाटावा, अशा प्रतिसृष्टीचं रुपांतर झालं आहे. 

तीनशे एकरवर पसरलेल्या ह्या भारतातल्या पहिल्या कृत्रिम अभयारण्याचं नाव साई – सेव्ह एनिमल इनिशिएटीव्ह असं आहे.

आज ह्या अभयारण्यात हत्ती, बिबटे, चितळ, सांबर, हरणं मुक्त संचार करतात. रंगबेरंगी देखणे पक्षी आणि फुलांची झाडे किती आहेत ह्याची तर गणतीच नाही.

प्राण्यांची तहान भागवण्यासाठी त्यांनी ह्या अभयारण्यात एका सुंदर नदीसुद्धा बनवली आहे.

अष्ट्याहत्तर वर्षांचे अनिल आणि सदुसष्ट वर्षांच्या पामेला आजही जेव्हा आपल्या ह्या नंदनवनात फेरफटका मारतात, आणि निसर्गाच्या अदभुत आनंदात हरवुन जातात, तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर एक विलक्षण, लोभसवाणा आनंद पहायचा असेल तर एकदा हा व्हिडीओ पहाच.

वृक्षवल्ली आम्हा सोयरी आणि भुतदया हीच ईश्वरसेवा असे सांगणारी संतमंडळी यांच्यापेक्षा वेगळी असतील काय?

निसर्ग जगावा, प्राणीपक्ष्यांना हक्काचं घर मिळावं, जैवविविधता वाढावी, अशा संकल्पामध्ये आपल्या आयुष्याच्या समिधा अर्पण करणाऱ्या ह्या आधुनिक ऋषींचं जीवन जगणारे जगावेगळे लोक पाहुन आपण आपोआप नतमस्तक होतो. 

निसर्गाची ही ओढ आपल्या प्रत्येकाच्या मनात निर्माण व्हावी, ह्या एकाच मनःपुर्वक प्रार्थनेसह,

आभार आणि शुभेच्छा!

Comments

Popular posts from this blog

◾संघर्ष कथा :- एका आदिवासी जमातीतील कलेक्टर डॉ. राजेंद्र भारूडची ही संघर्ष कथा एकदा नक्की वाचा,खरचं प्रेरणा मिळेल ...

देतो तो देव - बोधकथा

हिरव्या हिरव्या श्रावणात ... | मराठी कविता | संजय धनगव्हळ

कविता :- 📝 पत्र शेवटचं लिहितो आहे ...

◼️हास्य कविता :- दारूड्याची नशा ...

◾ललित लेख :- स्ञी

◾विशेष लेख :- विक्रम साराभाई यांचा एक सत्य किस्सा अवश्य वाचा !

◼️ बोधकथा :- अति तेथे माती

◼️ ललित लेख :- शेवटी काय सोबत घेऊन गेला तो भिकारी ...