परोपकार - बोधकथा
एका गावात एक निर्धन मनुष्य राहत होता. परिस्थिती गरीबीची असूनही तो मनाने उदार होता. आपल्या घासातील घास देण्यासही तो कमी पडत नसे. एकदा एका शेठजीकडे तो जेवावयास गेला असताना त्या शेठजीने त्याला पंचपक्वान्नाचे ताट वाढून दिले. ती भरगच्च पदार्थांनी भरलेली थाळी बघून त्या गरीबाला वाटले की यातून किमान तीन माणसांची भूक भागू शकेल. त्याने शेठजीची परवानगी मागितली व त्यातील अन्न त्याने बरोबर घेतले व घराकडे जाण्यास निघाला. रस्त्यात त्याला एक भिकारी भेटला त्याला त्याने खायला दिले. त्यातून उरलेले अन्न घेऊन तो घरी आला, तो जेवायला बसणार इतक्यात एक भिक्षुक या माणसाच्या घरी आला व त्याने त्याला अन्नदान करण्याची विनंती केली. गरीबाने त्याच्यासमोरील ताट त्या भिक्षुकाच्या स्वाधीन केले.
त्यानंतर अजून एक अपंग व्यक्ती दाराशी आली त्यानेही या गरीबाकडे अन्न मागितले त्यालाही याने आपल्या थाळीतील अन्न खायला दिले. आता याच्याकडे देण्यासारखे काहीच शिल्लक राहिले नाही तेव्हा याने स्वत:ची भूक भागविण्यासाठी एक भांडेभर पाणी घेतले तर समोरून एक वृद्ध व्यक्ती आली व तिने ते पाणी पिण्यासाठी मागितले. याला आता खाण्यापिण्यासारखे काहीच उरले नाही तरीही ही व्यक्ती समाधानात होती आजचा दिवस आपल्यामुळे किमान चार लोकांना तरी खाण्यापिण्यास मिळाले. तो ह्याच विचारात असताना तेथे देव प्रगटले व म्हणाले,'मी तुझी परीक्षा घेण्यासाठीच भिकारी, भिक्षुक, अपंग आणि वृद्ध व्यक्तिचे रूप घेतले होते व तुझ्याकडून काही ना काही मिळते का नाही हे पाहिले आणि तु स्वत:चा विचार न करता दुस-याचा जीव जाणून घेतलास व देत राहिलास. आता या पुढे तुला काहीच कमी पडणार नाही असा मी तुला वर देतो.'' इतके बोलून देव अंतर्धान पावले.
तात्पर्य: देण्यातच खरे सुख लपलेले आहे. कुणाचाही घास हिरावून घेण्यापेक्षा कुणाला तरी एखादा घास देता कसा येईल याचा विचार करणे यातच खरे सुख लपलेले आहे.
Comments
Post a Comment
Did you like this blog