◾विशेष लेख :- रियुनियन ... एक उत्कृष्ट लेख | prayerna Blog


रियुनियन
------------------------------------------------
 
मेलबॉक्स उघडल्यावर रागिणीला सगळ्यात पहिले शाळेच्या रियुनियन ची ई-मेल दिसली. गेली अनेक वर्षं रागिणी नं चुकता शाळेच्या रियुनियन्सना जात होती. अमोल ने पुढाकार घेऊन ते सुरु केलं होतं. १०वी झाल्यावर सगळ्यांचीच पांगापांग झाली होती. कॉलेज संपवून नोकरी लागेपर्यंतचे दिवस कुठे गेलेत कोणालाच कळलं नव्हतं. नोकरीत स्थिरस्थावर होऊ लागल्यावर जसजसे एकेकांचे लग्न होऊ लागले, तश्या लग्नांच्या निमित्ताने आमंत्रणं आणि मग भेटी होऊ लागल्या. अमोलने सगळ्यांचे नवीन पत्ते आणि फोन नंबर जमा करायला सुरुवात केली. जे चेहरे लग्नांना दिसत नव्हते त्यांना त्याने शोधून काढले. तोपर्यंत मोबाइल फोन आजच्या एवढे कॉमन झाले नव्हते. मग शाळेतून सगळ्यांचे पत्ते घेऊन त्यांच्या घराच्या पत्त्यांवर पत्रं पाठव, डिरेक्टरीमधून नंबर शोधून फोन करून बघ. असं करत त्याने एकेकाला संपर्क करायला सुरुवात केली. मग पुढे त्यानेच पुढाकार घेऊन रियुनियन्स करायला सुरुवात केली. सुरुवातीला ५-७ लोकच जमायचे, पण मजा यायची. जुन्या आठवणींना उजाळा, आणि नवीन आठवणींची त्यात भर. मग हळू हळू डोकी वाढत गेलीत. गेल्या वर्षी तर ३०-३५ लोक आले होते. रागिणी दर वर्षी उत्सुकतेने जायची आणि त्या वाढत जाणाऱ्या गर्दीत एक चेहरा शोधायची. रियुनियन संपल्यावर मग तो चेहरा दिसला नाही म्हणून नाराज होऊन परत यायची.

ई-मेल बघून रागिणीने एक दीर्घ सुस्कारा सोडला. आणि सवयीने तिने गुगल, फेसबुक आणि बाकीच्या वेबसाइट्स वर ते नाव पुन्हा एकदा शोधलं. आत्तापर्यंत अनेकदा तिने तो प्रयत्न करून बघितला होता. एकदोनदा ते नाव सापडलंही, पण फोटो बघितल्यावर किव्वा मेसेज पाठवल्यावर, ती व्यक्ती भलतीच कोणीतरी निघाली. आजही तिच्या शोधाला यश आलं नाही. तेवढ्यात तिचा फोन वाजला. " रागिणी, ई-मेल मिळाली? येते आहेस ना?"  पलीकडून अमोलचा आवाज आला. रागिणी आताशा दर वर्षी पदरात पडणाऱ्या निराशेला कंटाळली होती. "मिताली शी काही कॉन्टॅक्ट झाला का रे?". "नाही गं. दर वर्षीप्रमाणे मी तिच्या जुन्या पत्त्यावर आमंत्रण पाठवलंय, पण आता तिथे कोणी रहात नाही, गेली कित्येक वर्षं त्यांचं घर रिकामं पडलंय. तिचं लग्नानंतरचं आडनाव कळलं असतं तर कदाचित शोधणं सोपं झालं असतं. "येण्याचा प्रयत्न करते" असं सांगून तिने फोन ठेवला.

पुढचे काही दिवस नोकरी, घर आणि मुलांच्या शाळेच्या धावपळीत गेले आणि बघता बघता रियुनियन चा दिवस उजाडला. जावं की नाही या विचारात रेंगाळत तिने हळू हळू तयारी करायला घेतली. मन सारखं भूतकाळाकडे पळत होतं. "कुठे असेल मिताली? काय करत असेल? लग्नं झालं असेल का? किती मुलं असतील? अजून तशीच दिसत असेल का? नोकरी करत असेल की घर सांभाळत असेल?" मितालीच्या आत्ताच्या आयुष्याबद्दल स्वप्नरंजन करणे हा तिच्या मनाचा फावल्या वेळेचा खेळच झाला होता. कधीतरी तिच्या कल्पनेत मिताली कधी त्या प्रसंगातून सावरलेलीच नसायची. उध्वस्त झालेली मिताली बघून तिच्या पोटात कससंच व्हायचं, पण मनातल्या एका कोपऱ्यात आनंद पण व्हायचा. कधी बाजारात एका मुलाचं बोट धरून भाजीवाल्याशी घासाघीस करणारी एखादी बाई तिला मिताली भासायची.

तिने अनेक वेळा मितालीच्या घरच्या जुन्या नंबर ला फोन करून बघितला होता. कधीतरी ती वाट वाकडी करून तिच्या घरासमोरून जायची. नं जाणो, कोणीतरी घरात दिसायचं. खूप वर्षांपूर्वी एकदा तिला मितालीची आई दिसलीही होती. पण मितालीचा नंबर मागितल्यावर तिने "डायरी सापडत नाहीये, सापडली की देईन. पुन्हा कधीतरी ये" असं सांगून तिची बोळवण केली होती. पुढच्या वेळेस पुन्हा तिकडे गेल्यावर तिचं स्वागत पुन्हा एकदा घराला लागलेल्या कुलूपाने आणि त्यावर साचलेल्या धुळीने केलं.

अमोल ने रियुनियन साठी रेस्टॉरंट ची टेरेस बुक केली होती. रागिणीला पोहोचायला जरा उशिराच झाला होता. टेरेस माणसांनी फुलून गेली होती. ५० च्या आत बाहेर लोक होते. त्यातले काही चेहरे तर तिला अगदीच अनोळखी वाटले. स्टार्टर्स संपून बुफ्फे ची अनाउन्समेंट झाली आणि गर्दी जेवणाच्या च्या टेबल कडे वळली.

मागे राहिलेल्या मोजक्या चेहऱ्यात रागिणीला मिताली दिसली आणि ती जागच्या जागी थिजली. चेहरा खूपच बदलला होता पण चेहऱ्यावरचं हास्य अजून तेच, सहज आणि मनापासून. गेली अनेक वर्षं तिला शोधतांना रागिणीने कधी हा विचारच केला नाही की ती भेटल्यावर काय बोलायचं. मिताली जेवणाच्या टेबलकडे जाईपर्यंत ती उगाचच मागे रेंगाळली. एवढे दिवस शोधत असलेल्या मितालीला आता ती टाळायला लागली. जेवतांना ती काळजीपूर्वक तिच्या नजरेआड बसली. पण एका बेसावध क्षणी, अमोलने मागून आवाज दिला, "रागिणी, अगं हे बघ कोण, मिताली", तो मितालीला सोबत घेऊन आला होता. "अगं, किती वर्ष शोधतेय ही तुला", तो मितालीकडे वळत म्हणाला.

रागिणीला काहीच सुचेना, ती कसंनुसं हसली. पण तिने काही बोलायच्या आधी मितालीनेच बोलायला सुरुवात केली.

समोरची मिताली रागिणीच्या मनातल्या आत्तापर्यंतच्या कुठल्याच चित्राशी सुसंगत नव्हती. फिजिक्स मध्ये मास्टर्स करून मिताली PhD करायला ऑस्ट्रेलिया ला गेली. तिथेच तिला तिचा नवरा भेटला. गेले अनेक वर्षं दोघं मिळून तिथे रिसर्च लॅब चालवत होते. अनेक रिसर्च पेपर्स लिहिले होते, काही संशोधनही प्रसिद्ध झाले होते. गेल्या महिन्यात सायन्स काँग्रेससाठी ती भारतात आली आणि त्यावेळेस तिला रियुनियन ची माहिती आणि अमोल चा नंबर मिळाला. ऑस्ट्रेलिया मध्ये बऱ्याच ऍक्टिव्हिटीज मध्ये मग्न होती. तिथे तिने हौशी कलाकारांचा एक नाटकाचा ग्रुप बनवला होता. गाण्याचे बरेच कार्यक्रम केले होते. जगभर फिरत होती. रागिणीकडे मात्रं तिची नोकरी, मुलं आणि नवरा या पलीकडे बोलायला काहीच नव्हतं. रागिणीशी बोलतांना मितालीच्या बोलण्यात कुठे मैत्रीचा ओलावा नव्हता, पण कुठे तिरस्कारही नव्हता. 

रागिणीला कळत नव्हतं की आजपर्यंतच्या रियुनियन्स मध्ये मिताली भेटली नाही म्हणून होणारी निराशा जास्त मोठी होती की आज मिताली भेटल्यानंतरची. रियुनियन संपवून ती घराकडे निघाली तेव्हा तिची मनःस्थिती तिलाच कळत नव्हती. कुठेतरी खंत होती,  राग होता, अपराधीपणाची भावना होती, एका कोपऱ्यात मत्सर नव्याने डोकं काढत होता. गेली अनेक वर्षं मितालीला शोधतांना तिने कधी या  शक्यतेचा विचारच केला नव्हता. 

शाळेची दहा वर्षं त्या दोघी एका वर्गात होत्या. सुरुवातीला मिताली शाळेत सगळ्यात हुशार म्हणून प्रसिद्ध होती. रागिणीला तिचा हेवा वाटायचा. ती स्वतःला मितालीच्या जागी बघायची, बक्षीस घेतांना, कौतुक करून घेतांना, सहज मनमोकळं हसतांना. कधी कोण जाणे, पण त्यांच्यात एक अनामिक स्पर्धा सुरु झाली. सुरुवातीला रागिणीला त्यात गम्मत वाटायची. मिताली जे करेल ते तिने पण करायचं, ती भाग घेईल त्या प्रत्येक स्पर्धेत भाग घ्यायचा, त्यात मितालीच्या तोडीस तोड स्पर्धा द्यायची. भाषणाची स्पर्धा, गाणं, नाटक... एक ना अनेक. कधी हि जिंकायची तर कधी ती. पण प्रत्येक स्पर्धा चुरशीची असायची. पण बघता बघता ती स्पर्धा जीवघेणी बनत गेली. मितालीला प्रत्येक गोष्टीत हरवणं हेच तिच्या आयुष्याचं उद्दिष्ट बनत गेलं. 

सुरुवातीला रागिणी मितालीला संधी मिळेल तेव्हा कमी लेखायची. घालून पाडून बोलायची. कधी तिची होमवर्क केलेली वही लपवून ठेवायची तर कधी शिक्षकांकडे तिची खोटी तक्रार करायची. मितालीला शिक्षा झालेली बघतांना तिला मनस्वी आनंद व्हायचा. हळू हळू तिने मितालीच्या सगळ्या मैत्रिणी आपापसात गैरसमज करत तोडून टाकल्या. एके काळी हसत खेळत वर्गातल्या सगळ्यांमध्ये मिसळणारी मिताली एकलकोंडी होत गेली. रिकाम्या तासाला सगळा वर्ग गप्पा गोष्टींमध्ये हसत खिदळत असतांना मिताली एका कोपऱ्यात गप्प बसून राहायची किव्वा कुठल्या तरी पुस्तकात डोकं घालून बसलेली दिसायची. तिच्याबद्दल येणाऱ्या सततच्या तक्रारी आणि वर्गातला तिचा कमी झालेला सहभाग बघून ती आता पूर्वी इतकी शिक्षकांची लाडकी राहिली नव्हती. तिला असं बघून रागिणीला मनापासून समाधान मिळायचं. दहावीच्या सुरुवातीला तर तिने मितालीला वर्गातल्या एका मुलाच्या नावाने खोटं प्रेम पत्रं देखील पाठवलं. हेतू एकच, मितालीचं अभ्यासातून लक्ष उडवायचा.  

आणि मग तो दिवस उजाडला.

दहावीचं वर्ष, वर्षभर सतत डोक्यावर अभ्यासाचं टेन्शन. कोणी तसं बोलत नसलं तरी प्रत्येकाच्याच मनात उत्सुकता होती, की दहावीला वर्गात पहिलं कोण येणार, रागिणी की मिताली. जानेवारी उजाडला. परीक्षेला आता जेमतेम दोन महिने राहिले होते. अशात एक दिवस इतिहासाचा तास सुरु असतांना, दुसऱ्या मजल्यावर असलेल्या, त्यांच्या वर्गाच्या एका बाजूची भिंत खचली. सगळी मुलं घाबरून जिन्याकडे पळत सुटली. जिन्यावरून खाली जाण्यासाठी धक्काबुक्की सुरु झाली. आणि त्या गर्दीत रागिणीला तिच्या पुढे असलेली मिताली दिसली. काय घडतंय हे कळायच्या आत रागिणीने मितालीला पाठीमागून जोरात धक्का दिला. जिन्याच्या काठावर असलेल्या मितालीचा तोल सुटला आणि ती धडपडत जिन्याच्या काठाशी जाऊन पडली. जीव वाचवण्याच्या धावपळीत बाकीची मुलं तिच्या अंगावरून धावत गेली.

 पुढचे अनेक दिवस मिताली हॉस्पिटल मध्ये होती. खूप लागलं होतं, ५ फ्रॅक्चर्स होते हात पायात. चेहरा सुजला होता. वर्गातले काही मुलं मुली तिला बघायला हॉस्पिटल ला जाऊन आले, पण रागिणी ची हिम्मत झाली नाही. तिला फक्त मितालीला घाबरावयाचं होतं, जमलंच तर थोडं जखमी करायचं होतं. पण तिच्या क्षणाच्या वागण्याचा एवढा भयंकर परिणाम होईल असं तिला वाटलं नव्हतं. त्यानंतर मिताली कधीच शाळेत दिसली नाही. परिक्षेपर्यंतचे दिवस ती हॉस्पिटल मध्येच होती. परीक्षेला सुद्धा, उजवा हात फ्रॅक्चर असल्याने तिला एका वेगळ्या वर्गात बसवण्याची आणि रायटर देण्याची शाळेने व्यवस्था केली होती.

रागिणीच्या अपेक्षेप्रमाणेच दहावीचा निकाल लागला. ती वर्गात पहिली आली होती. मितालीला तिच्यापेक्षा ८.४% कमी मिळाले होते. शाळेत तिचा सत्कार झाला, घरी कोडकौतुकं झालीत. ती जिंकली होती. मिताली हरली होती.  मितालीचा रिझल्ट घ्यायला तिचे वडील आले होते, कारण मिताली परत हॉस्पिटल मध्ये होती, लवकरच  तिच्या पायावर ऑपरेशन होणार होतं. मिताली पुन्हा कधीच तिला दिसली नाही. 

पण रागिणीचा आनंद काही दिवसच टिकला. कॉलेज मध्ये गेल्यावर तिला लक्षात आलं की तिच्या पहिल्या नंबराची किव्वा दहावीतल्या मार्कांची बाहेरच्या जगात कोणाला काही किंमत नव्हती. कॉलेज मधल्या कुठल्याच ऍक्टिव्हिटीजमध्ये किव्वा स्पर्धांमध्ये तिला रस उरला नव्हता, कारण आता हरवायला मिताली तिथे नव्हती. तिने मिताली बद्दल माहिती काढण्याचा प्रयत्न केला. पण दहावीनंतर मितालीला शहरात, तिच्या मामाकडे पाठवलं याच्या पलीकडे तिला काहीच कळू शकलं नव्हतं. अनेक वर्षं जाऊनही रागिणी मितालीला विसरली नव्हती, उलट तिची उणीव तिला सतत बोचायची. दहावीनंतर मितालीचं काय झालं असेल याचा विचार करण्यात तिने दिवसचे दिवस घालवलेत. दहावीत मितालीला हरवल्यानंतरही तिच्या मनात सतत एकच विचार होता. मिताली सध्या काय करते? मी तिच्यापेक्षा चांगलं काहीतरी करतेय का? मला तिच्यापेक्षा जास्त पगाराची नोकरी आहे का? माझा नवरा तिच्या नवऱ्यापेक्षा चांगला आहे का?

तिकडे मिताली मात्र ती विषारी स्पर्धा मागे सोडून, आयुष्यात खूप दूर गेली. पुन्हा कधीही तिने मागे वळून बघितलं नाही. दहावीत कमी पडलेल्या ८.४% मार्कांनी किव्वा हातातून गेलेल्या पहिल्या नंबरने तिला कधीही जखडून ठेवलं नाही. हॉस्पिटल च्या वाऱ्यांतून सुटका झाल्यावर ती पुन्हा पहिल्यासारखी, हसरी, आनंदी मुलगी झाली. मनाप्रमाणे भरपूर शिकली. ज्या ज्या गोष्टींमधून आनंद मिळत होता, त्या सगळ्या गोष्टी केल्या, नाटक, गाणं, करिअर सगळं काही. तिला कोणालाच हरवायचं नव्हतं, तिची कोणाशीच स्पर्धा नव्हती. होता तो फक्त जे आवडतं ते करण्यातला निखळ आनंद. मनासारखा समजूतदार जोडीदार मिळाला तेव्हा लग्न केलं. कोणाशी तुलना करण्याचा प्रश्नच नव्हता. 

दहावीत रागिणीने मितालीला हरवून देखील तिच्या दृष्टीने ती आयुष्यात हरली होती आणि मिताली जिंकली होती कारण मितालीसाठी ती जीवघेणी स्पर्धा कधीच संपली होती.

------------------------------------------------
गायत्री गद्रे 


 

Comments

Popular posts from this blog

◾संघर्ष कथा :- एका आदिवासी जमातीतील कलेक्टर डॉ. राजेंद्र भारूडची ही संघर्ष कथा एकदा नक्की वाचा,खरचं प्रेरणा मिळेल ...

देतो तो देव - बोधकथा

हिरव्या हिरव्या श्रावणात ... | मराठी कविता | संजय धनगव्हळ

कविता :- 📝 पत्र शेवटचं लिहितो आहे ...

◼️हास्य कविता :- दारूड्याची नशा ...

◾ललित लेख :- स्ञी

◾विशेष लेख :- विक्रम साराभाई यांचा एक सत्य किस्सा अवश्य वाचा !

◼️ बोधकथा :- अति तेथे माती

◼️ ललित लेख :- शेवटी काय सोबत घेऊन गेला तो भिकारी ...