नशीब म्हणजे काय असते ?
नशीब !
आपण आपला भार ईश्वरावर सोपवून, शांत बसून राहावे.’
आपल्या आयुष्यात काय घडणार वा काय घडणार नाही, हे आधी ठरविणारी कुठलीही गूढ शक्ती अस्तित्वात नाही. त्यामुळे ललाटलेख लिहिण्याचा, त्यात कुणी काही बदल करण्याच्या वगैरे काहीच शक्यता अस्तित्वात नाहीत.
दैव, ललाटलेख, विधिलिखित, नियती, प्रारब्ध, नशीब हे सगळे शब्द जे आपण दैनंदिन जीवनात वारंवार वापरतो ते सर्वसाधारण सारख्याच अर्थाचे शब्द आहेत; व त्यातील समान दैववादी वृत्ती अशी की ‘नशिबात जे असेल ते होईल. आपण आपला भार ईश्वरावर सोपवून, शांत बसून राहावे.’ ही दैववादी वृत्ती, प्रयत्नवादाच्या बरोबर विरुद्ध अशी, मानवी प्रगतीला हानिकारक वृत्ती आहे. यात असे मानतात की ब्रह्मदेवाने (किंवा अल्लाने किंवा सटवाईने) आपले नशीब आपला जन्म होतानाच ठरवून किंवा लिहून ठेवलेले आहे व आपल्या आयुष्यात सर्व काही त्याबरहुकूम घडणार आहे. नाहीतरी आजूबाजूच्या परिस्थितीवर आपले नियंत्रण नसतेच; आणि सर्व काही दैव-नियंत्रित मानल्यामुळे, मानवी प्रयत्नांना काही महत्त्वच उरत नाही. हे घातक नाही का?
तरीही जगभर सगळीकडेच, सर्व लोकांमध्ये, अशी दैवाधीनता कमी-अधिक प्रमाणात मानली जाते. त्याचप्रमाणे समाज दैववादी व परावलंबी राहण्यावर काही राजकारणी, काही धर्मवादी व काही गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांचे हितसंबंध अवलंबून असतात व ते लोक स्वहितासाठी, ‘दैववाद’ व ‘नियती निर्णायकतेच्या’ मताचा प्रसार करीत असतात. अशा कारणांमुळे मग लोकांना तेच खरे वाटू लागते.
मुळात कुणी ईश्वर, अल्ला अस्तित्वात असला तरी तो जगातील अब्जावधी माणसांचे भविष्य स्वत:च कशाला ठरवील? त्याला दुसरे काही काम नाही का? ज्या विश्वात अब्जावधी प्रचंड तारे, तारकामंडले, आणखी काय काय आहे, तसेच येथील ज्या सूक्ष्मातिसूक्ष्म अणूंमध्ये प्रचंड शक्ती सामावलेली आहे, अशा या, कल्पना करायलाही कठीण असलेल्या अतिप्रचंड नियमबद्ध विश्वातील, पृथ्वीनामक एका अतिक्षुद्र ग्रहावर निर्माण झालेल्या, विश्वाच्या तुलनेत किडय़ामुंगीसारख्या असलेल्या पण बुद्धी कमविलेल्या क्षुद्र मानवाची, त्याला काय एवढी चिंता पडली आहे की त्या मानव-समूहांचे, किंवा राष्ट्रांचे, किंवा प्रत्येक व्यक्तीचे भविष्य-नशीब त्याने स्वत:च ठरवून ठेवावे? कशाला करील तो असला उपद्व्याप?
आणि जरी समजा त्याने असला उपद्व्याप करायचा ठरविले तरी प्रत्येकाचे भविष्य केवळ त्याची जन्मतारीख व जन्मवेळ यांच्याशी जोडून तो ठेवील काय? का बरे? पण ‘फलज्योतिष शास्त्र आहे’ असे मानणाऱ्या लोकांना मात्र तसे वाटते खरे. तसे पाहता या ज्योतिषीबुवांनी या जगात एक मोठेच प्रस्थ निर्माण केलेले आहे. मानवी जीवनांतील असुरक्षितता, भय, चिंता वगैरेंमुळे सगळेच लोक, नेहमी कसल्या तरी आधाराच्या शोधात असतात. ज्योतिषी याचाच फायदा उठवितात. जन्मवेळेची ग्रहस्थिती, ग्रहांच्या चाली व नक्षत्रप्रवेश, ग्रहनक्षत्रांचे मानवी गुणांसारखे गुणावगुण, असले सगळे कुभांड जन्मपत्रिकेवर मांडून, व्यक्तीचे, समूहाचे वा राष्ट्राचे विधिलिखित ते वाचू शकतात, असा दावा ते करतात. आणि आपल्या देशात, असले हे मुहूर्त, तिथीनुसार शुभाशुभ कल्पना, लग्नासाठी कुंडल्या जुळविणे, ग्रहांचे मानवासारखे स्वभाव इत्यादी सर्व कल्पनारंजन, धर्माबरोबर जोडले गेल्यामुळे, बहुतेक लोकांना हे सर्व खरेच आहे असे वाटते व त्यामुळे त्यावर कुणी विचारही करीत नाही. सज्जनहो, याबाबत क्षणभर विचार तर करा.
(१) एकाच हॉस्पिटलात एकाच क्षणी जन्मलेल्या दोन बालकांच्या पत्रिका सारख्याच असतात. त्यातील एक गरीब स्त्रीचे व दुसरे श्रीमंत स्त्रीचे असेल तर त्या दोन बालकांचे भवितव्य सारखे घडेल का? त्यांचे भविष्य, जीवनांतील चढउतार सारखे असतील का
(२) जन्मपत्रिकेवरून तो मनुष्य जिवंत आहे की मृत, हे कुणाही ज्योतिषाला सांगता येत नाही. हे सप्रयोग सिद्ध झालेले आहे.
(३) एकाच पत्रिकेवरून, एकाच व्यक्तीबाबत, वेगवेगळे ज्योतिषी, वेगवेगळी भाकिते करतात. हे तर रोजच घडते.
(४) आज एकही सच्चा वैज्ञानिक, ज्योतिषशास्त्राला, शास्त्र किंवा विज्ञान म्हणत नाही. कारण ते अवास्तव व अफाट अशा गृहीतांवर रचलेले असून, त्यात वस्तुनिष्ठ, वैज्ञानिक पद्धत आणि विश्वासार्ह सिद्धान्त यांचा पूर्ण अभाव दिसून येतो.
व म्हणून तर सगळे ज्योतिषी, जे जे भविष्य सांगतात, ते ते अशा संदिग्ध भाषेत सांगतात की त्यातून उलटसुलट नाना अर्थ निघतात. शेवटी प्रत्यक्षात काहीही घडले तरी ज्योतिषाने तीही शक्यता सुचविली होती असे आपल्याला वाटते आणि भविष्य अगदीच खोटे ठरले तर ते विसरले जाते व आपल्या गूढ नशिबाला दोष देऊन आपण गप्प बसतो. ज्योतिषांची काही थोडी भविष्ये क्वचित् कधी ‘काकतालीय न्यायाने’ किंवा ‘संभवनीयतेच्या नियमाने’ खरीसुद्धा ठरतात.
उदाहरणार्थ १०० स्त्रियांना ‘मुलगा’ होईल असे भविष्य सांगितले तर त्यातील ५० जणींच्या बाबतीतले भविष्य खरे ठरण्याची शक्यता असतेच की; आणि मग खऱ्या ठरलेल्या त्या भाकितांची व त्या ज्योतिषांची दवंडी पिटली जाते. थोडक्यात असे की फलज्योतिष कितीही नावाजले किंवा कितीही बहुमान्य असले, तरी ते शास्त्र नसून, थोतांड आहे.
अशीही काही माणसे जगात असणे शक्य आहे की ते लोक ईश्वर मानीत नसूनही जन्मपत्रिका, ग्रहांचे सामथ्र्य व त्यावरून किंवा कशावरून तरी, ‘भविष्य’ वर्तविता येते असे ते मानत असतील. आम्हा विवेकवाद्यांना मात्र, ‘प्रत्येकाचे भविष्य जन्मत: ठरलेले आहे’ हेच मुळात मान्य नाही. त्यामुळे कुठल्याही पद्धतीने ते आधी समजण्याचा, आमच्यासाठी काही प्रश्नच उद्भवत नाही. प्राप्त परिस्थितीत आमचे बरेवाईट भविष्य, आमचे आम्हीच घडवतो (जे आधी ठरलेले नसते), असा आमचा विश्वास आहे. आम्हाला कधी यश मिळते, तर कधी धडधडीत अपयश (अगदी आपटी खावी लागते.) पण आमच्या यशापयशाची भौतिक कारणे आम्ही बुद्धीच्या साहाय्याने शोधतो. कारण आध्यात्मिक व ज्योतिषीय कारणे भोंगळ असतात व म्हणून आम्हाला ती मान्य नाहीत.
क्षणभर मानू या की कुणी ईश्वर अस्तित्वात आहे व त्याने आपला ललाटलेख लिहून ठेवलेला आहे.
जसे इस्लाममध्ये प्रत्येक माणसाचे भाग्य ईश्वर अल्ला स्वत: स्वत:च्या मर्जीनुसार ठरवितो व त्यात कुणीही कधीही बदल करू शकत नाही. हिंदू धर्मात आपले भाग्य हे आपलाच पूर्वजन्म आणि कर्मफलसिद्धान्ताशी जोडलेले आपलेच अपरिवर्तनीय कर्मफळ असते. सारांश, आपण ललाट लेख कधीही बदलत नाही. परंतु ईश्वर प्रेमळ व दयाळू असल्यामुळे व्यक्तीचे दैवपालट घडविण्याचे, म्हणजे न बदलणारा ललाटलेख बदलून देण्याचे काही उपाय (उदाहरणार्थ- पूजाप्रार्थना, कर्मकांड, प्रायश्चित्त, नमाज वगैरे) त्याने उपलब्ध करून ठेवलेले आहेत असे बहुतेक धार्मिक लोक मानतात.
आता असा विचार करा की, विश्वाचा खरेच जर कुणी ईश्वर असला तर त्याला आपल्यासारख्या क्षुद्र जीवांच्या स्तुती-प्रार्थनेची गरज कशाला असेल? कुणीही ‘माणूस’ जसा स्तुती-प्रार्थनेने खूश होतो तसा ‘ईश्वर’ कशाला आपल्या स्तुती-प्रार्थनेला भाळेल आणि त्याच्या बदल्यात, व्यापाऱ्यासारखा वागून आपला ललाटलेख बदलेल? शनी-मंगळासारख्या तथाकथित दुष्ट ग्रहांची शांती करणे हा तर चक्क मूर्खपणा आहे. ग्रह हे माती व वायूचे निर्जीव गोळे आहेत. ज्योतिषाने किंवा पुरोहिताने केलेल्या त्याच्या त्या शांतीमुळे, आपला ललाटलेख बदलता येईल अशी भन्नाट कल्पना लोकांना पटते तरी कशी, याचे मला फार आश्चर्य वाटते. पण या देशात तरी हे घडते खरे. म्हणजे अगणित लोक ज्योतिषांकडे व गुरुबाबांकडे अशा कामांसाठी जातात व त्यांना त्यासाठी पैसे देऊ करतात हे आपणा सर्वाना माहीत आहे. आम्हा विवेकवाद्यांच्या मते, आपल्या आयुष्यात काय घडणार वा काय घडणार नाही, हे आधी ठरविणारी कुठलीही गूढ शक्ती अस्तित्वात नाही व त्यामुळे ललाटलेख लिहिण्याचा, तो वाचण्याचा किंवा त्यात कुणी काही बदल करण्याच्या वगैरे काहीच शक्यता अस्तित्वात नाहीत. हे सर्व अशक्य आहे.
उत्क्रांतीने व स्वप्रयत्नाने मानव आज बुद्धिमान बनलेला आहे खरा! परंतु अजूनही तो अत्यंत अज्ञानी आहे. भित्रा आणि शरीराने व मनानेही दुर्बळ तर तो मुळातच आहे. नैसर्गिक संकटांनी व स्वत:च्या चुकांनी तो दु:खी आहे. आपल्या मृत्यूनंतर आपले काय होईल ही अज्ञानाची भीती तर कायमच त्याच्या पाठी लागलेली आहे. म्हणून तर माणसाच्या सर्वच धर्मामध्ये परलोकात सुख मिळविण्यासाठी इहलोकात करण्याचे नमाज, प्रार्थनादी अनेक विधी सांगितलेले आहेत. थोडक्यात असे की माणसाला ईश्वरासारख्या गूढ शक्तीच्या आधाराची सतत आवश्यकता भासते. अशा परिस्थितीत मनुष्य आधारासाठी चिंतनाद्वारे कल्पित ईश्वराचा ‘शोध लावील’ व त्यानंतर त्याच्या उपासनेचे मार्ग पक्के ठरवील, म्हणजेच ‘आपला धर्म, पंथ निर्माण करील’ हे सर्व स्वाभाविकच आहे, आणि माणसाने नेमके तेच केले. वेगवेगळे धर्म स्थापन केले, सुंदर सुंदर ईश्वर कल्पिले; हजारो वर्षे त्यांच्या उपासना केल्या आणि धर्माची, ईश्वरांची, स्वर्गनरक व पापपुण्यादी कल्पनांची ऐहिक उपयुक्तता व त्यांचे दुरुपयोग अनुभवले.
आपल्या जीवनात काही घडून दैनंदिन अनुभव येणे हे तर रोजच घडत असते. तसेच एखाद्यालाच अपघात होणे, मोठय़ा अपघातांतून अनेक जणांपैकी एखादाच वाचणे, बाकी सगळे मरणे, एखाद्यालाच लॉटरी लागणे अशा प्रासंगिक घटनांबाबत ती घटना घडून गेल्यावर आपण निष्कर्ष काढतो की ते त्याचे प्रारब्धच होते म्हणून ते तसे घडले. अनेक जणांच्या आयुष्यात, त्यांच्या संपत्तीत, कर्तृत्वात, सुखदु:खात कधी कधी कमालीची स्थित्यंतरे घडतात, पण त्याची नेमकी कारणे सुसंगतपणे कळू शकत नाहीत. हे असेच आहे. घटनांची कारणे भौतिकच पण गुंतागुंतीची असतात व ती नीट न उलगडण्यामुळे ती नियतीवर ढकलण्याचा आपल्याला मोह होतो. प्रत्यक्षात मात्र दैव, भाग्य, नशीब, नियती, प्रारब्ध असे काही नसते. म्हणजे घटना घडून गेल्यावर, केवळ आपल्या सोयीसमाधानासाठी काढण्याचे ते सुलभ निष्कर्ष काढले
नशीब , नशीब म्हणजे काय असत ? आपनच आपल्या कृतीने
लिहीलेल आपल्याच भविष्याच पुस्तक जी माणसे
विचारांनी तेजस्वि असतात त्यान खुप काही चांगल मीळत
सुद्दा विचार आणि कर्म वाईट त्याचे भविष्यही वाईटच
मार्ग पकडनार मग मनासारख घडल
नाही की पुन्हा नशीबाला दोष देनार पन एक गोष्ट लक्षात ठेवा हस्तरेषांहुन जास्त हस्तकर्तुत्वावर विश्वास ठेवा आयुष्य
खुपच सुंदर आहे भविष्य आपल्याच हातात आहे"
रस्त्याच्या कडेला एका फुलवाल्याने ताजी टवटवीत गुलबाची फुलं विक्रीसाठी ठेवली होती. त्यात काही तांबडे गुलाब होते, काही पिवळे आणि पांढरे होते. ती ताजी फुलं पाहताच कुणाचंही मन प्रसन्नतेन भरून जावं आणि त्या फुलांकडं त्यानं पुन्हा पुन्हा डोळे भरून पहावी इतकी ती फुलं टपोरी होती.
ही फुलं पाहिली म्हणजे जग सुंदर आहे याची साक्षा पटते. एक सुंदर तरुणी हसत हसत काही फुलं विकत घेते. त्यांची गुंफण करून तो गजरा तिला आपल्या केसात माळायचा असेल किंवा ती फुलं आपल्या प्रिय दैवताला – प्रियकराला सुगंधी भेट म्हणून द्यायची असेल. एखादा भक्त देवमूर्तीला वाहण्यासाठी काही फुलं घेऊन जातो. पण, “एखादे फुटके नशीब म्हणून प्रेतास शृंगारीते.” एखाद्या फुलाला मात्र प्रेताचा शृंगार साजरा करावा लागतो. एखाद्याच्या प्रारभ्धात असे विपरीत का घडते या प्रश्नाला तर्कशुद्ध उत्तर मिळत नाही. काही दिवसांपूर्वी एका मुलींच्या प्रशाळेला मे भेट दिली. तो खेळाचा तास होता. बहुतेक मुली क्रीडांगणावर तर्हेतर्हेचे खेळ उत्साहाने खेळत होत्या. कबड्डी, खो खो वगैरे सारखे खेळ जोरात चालू होते. खेळ पाहणार्या मुलीदेखील नाचत होत्या, ओरडत होत्या. त्यांच्या उत्साहाला उधाण आलं होतं. शाळेच्या मुख्याध्यापकासोबत त्या क्रीडांगणावर मे फेरफटका मारला. एका झाडाखाली बारातेरा वर्षांची एक मुलगी खाली मान घालून एकटीच बसली होती. तिच्याकडे कुणाचच लक्ष नव्हतं. मी त्या मुलीला विचारलं,
‘तुला या खेळात सामील व्हावसं वाटत नाही का ? माझा प्रश्न ऐकून त्या मुलींन वर पाहिलं. तिच्या डोळ्यात विलक्षण खिन्नता होती. पाहता पाहता ते डोळे अश्रुंनी भरले. मला माझी चूक समजून आली. हा प्रश्न विचारून मी तिच्या वर्मावरच कठोर प्रहार केला होता. काय बोलावं तेच मला कळेना. त्या मुलीचा एक पाय अधू होता. खेळण्याची उत्कट इच्छा असूनसुद्धा तिला खेळणं शक्य नव्हतं. कोणत्या नियमान त्या मुलीचं फुलत जीवन दैवानं कुस्करून टाकलं होतं? या प्रश्नांचं देखील उत्तर मिळण्यासारख नव्हतं. मनातल्या मनात मी त्या निरागस मुलीची क्षमा मागितली आणि त्या मुख्याध्यापकांशी इतर विषयावर बोलू लागलो. पण त्या झाडाखाली बसलेल्या एकाकी मुलीच्या डोळ्यांतले करून उदास भाव मला सारखे दिसत होते. अस्वस्थ करत होते.
गडकर्यांनी ‘एखाद्याचे नशीब’ नावाची अर्थपूर्ण कविता लिहिली आहे. त्यात ते म्हणतात,’ एखादा पर्वत आपल्या मस्तकावर शीतल चांदणं धारण करतो. चंद्रप्रकाशमुळे तो जणू न्हाऊन निघतो. एखाद्या पर्वताच्या उदरातून दुग्धधवल नद्या वाहत असतात. पण एखाद्या दुर्दैवी पर्वतातून मात्र जळती ज्वालानदी वाहताना आढळते. काही झाडांवर मेघांची वृष्टि होते. त्यांच्या हिरव्यागार पानांवर जलबिन्दू नाचतात. फुलांनी आणि फळांनी ती झाडे बहरून जातात. पण एखाद्या झाडावर मात्र आकाशातून वीज पडते आणि ते फुलते झाड पूर्णपणे काळवंडून जाते. जळून जाते.’ या कवितेतून गडकरी काहीच उत्तर देऊ शकले नाहीत. हे असे का घडते ? या प्रश्नाला त्यांचे उत्तर ‘ एखाद्याचे नशीब’ हेच आहे. ही कविता जीवनातल्या एका धगधगीत वास्तवावर प्रकाश टाकते. ती फक्त एका वस्तूस्थितीचे कथन करते. माझा प्रश्न असा आहे की नशीब म्हणजे नेमके काय? नियतीची इच्छा किंवा प्रारब्ध हे शब्द आपल्या कानावर नेहमी पडतात. एखाद्या फुलाच्या नशिबीच प्रेताचा शृंगार किंवा एखाद्या झाडावर कडकडती वीज पडावी या घटना कोणत्या नियमांनुसार घडतात ? हा प्रश्न अनुत्तरित राहतो. रामचंद्रसारख्या सज्जन राजपूत्राला वनवास का घडला? सीतेला कांचनमृगाचा मोह का पडला ? या प्रश्नांना उत्तर देताना एका तत्वचिंतकाने म्हटले आहे,
‘नियतीची इच्छा, प्रारब्ध किंवा प्राक्तन म्हणतात ते हेच. नियती नावाच्या एका विलक्षण शक्तीने मनुष्याच्या ललाटावर अदृश्य अक्षरांत एक लेख लिहिलेला असतो. प्रत्यक्ष परमेश्वर सुद्धा तो पुसू शकत नाही. दैवाची इच्छा असेल तर सुईच्या नेढयातून उंटसुद्धा जाऊ शकतो. पण नियती विरोधी असेल तर डिंडिदरवाज्यातून मुंगीलासुद्धा आत जाता येत नाही. मनुष्य प्रारब्धासमोर एखाद्या गोगलगाईसारखा दुबळा आहे. तो पुष्कळ मनोरथ करील, पण नियतीच्या मनात नसेल तर तुच्छ मनसाच्या मनोराज्याला कवडीतकीही किंमत नाही. देवापेक्षा दैव अधिक बलवान असते. ते एका मात्रेने अधिक आहे. दैवासमोर देवाची मात्र कमी पडते. एका प्रसिद्ध संस्कृत श्लोकाचा शेवटचा चरण तुम्हाला आठवतो का?‘ हा हन्त हन्त नलिनीम गज उज्जहार !’ संध्याकाळी एका कमलिनीचे रसपान करणारा भ्रमर ती कमलिनी मिटल्यामुळे तेथेच अडकून पडला. रात्र संपून सकाळ होईल आणि मग ही कमलिनी आपोआप पुन्हा उमलेल त्या वेळी आपण बाहेर पडू असे मनोरथ करीत तो भृंग तेथेच राहिला. पण प्रारब्ध असे की एका मत्त हत्तीने ती कमलिनी आपल्या सोंडेने उपटून फेकून दिली.’
नियतीची ही महती मी अनेक वेळा ऐकली आहे. दैव हेच जर सर्वसमर्थ असेल तर मग मानवी प्रयत्न निरर्थंक समजावे काय? जे ललाटी लिहिले असेल तेच घडणार असेल तर व्यर्थ धडपड तरी कशाला करायची ? हा प्रश्न मी एका धर्मपंडिताला विचारला होता. त्यानेही उत्तर देताना माणसाची असमर्थता अनेक उदाहरणे देऊन सांगितली होती. पेटलेल्या महायुद्धाचे शेवट केव्हा आणि कसे होणार हे नियतीने आधीच ठरवून टाकलेले असते. जपानच्या दोन शहरांवर अणुबॉम्ब टाकले जातील ही योजना अमेरिकेची होती यापेक्षा ती नियती नावाच्या दुर्दम शक्तीची होती हेच बरोबर आहे. येशू ख्रिस्त, अब्राहम लिंकन, महात्मा गांधी यांची हत्या होणार हे नियतीच बोलून चुकली होती. हत्या करणारे लोक निमित्तमात्र होते. आपण त्याबद्दल काही व्यक्तींना अपराधी ठरवतो हे चुकीचेच आहे. त्या धर्मपंडिताने एक दृष्टान्त देऊन आपले हे मत स्पष्ट केले. एखाद्या प्रचंड अजगराने क्षुद्र उंदीर तोंडात धरावा त्याप्रमाणे आपण सारी माणसे नियतीच्या विक्राळ जबड्यात सापडलेल्या केविलवाण्या उंदरासारखी आहोत. आपल्या हाती एवढेच आहे की ‘ठेविले अनंती तैसेची राहावे, चित्ती असो द्यावे समाधान.’
हा सरच युक्तिवाद मला हास्यास्पद वाटतो. आजपर्यंतच्या मानवी प्रगतिच्या इतिहासाकडे दृष्टी टाकली तर मला असे दिसते की निसर्गातल्या प्रचंड शक्तीबरोबर अखंड झगडा करत माणूस आज विकासाच्या अभिमानास्पद वाटेवर येऊन पोहचला आहे. इतके सारे पशुपक्षी दहा वीस हजार वर्षापूर्वी जेथे राहत होते तेथेच राहत आहेत. दहा हजार वर्षांपूर्वीची चिमणी आजच्यासारखे घरटे बांधत होती. पण दहा हजार वर्षांपूर्वीचा माणूस मात्र आता पार बदलून गेला आहे. तो एका रात्रीत कित्येक मजल्यांची इमारत उभी करू शकतो.
अतिप्राचीन काली गुहेत नागडाउघडा राहणारा हा जंगली माणूस आज आपल्या वातानुकूलित बंगल्यात तर्हेतर्हेची वस्त्रप्रावरणे परिधान करून सुखेनैव राहिला आहे. नाना प्रकारची शास्त्रे त्याने जोपासली. ज्ञान आणि संस्कृती यांची प्रचंड वाढ केली. या सार्या गोष्टीला तुम्ही केवळ प्रारब्ध , केवळ नियती असली ठरीव ठशाची उत्तरे देणार आहात काय? रामायणाच्या कालखंडात समुद्र ओलांडून लंकेत आपले सैन्य कसे न्यायचे? समुद्रावर सेतु कसं बांधायचा ? या प्रश्नाने रामचंद्रासारखा पराक्रमी पुरुष रात्रंदिवस बेचैन झाला असेल. आजच्या प्रगत मनुष्य पुढे हा क्षुल्लक प्रश्न उभा राहुच शकत नाही. वेगवान विमानांच्या सहाय्याने तो लंकेत सहजपणाने आकाशातून जमिनीवर उतरेल. हे सर्व नियतीच्या इच्छेने घडले आहे काय? यात प्रारब्धाचा काय संबंध आहे? मनुष्याचा प्रयत्नवादाचा हा विजय आहे. दुर्दम्य प्रयत्नवाद्यांसमोर नियती दासीसारखी हात जोडून उभी असते. नियतीचे तुणतुणे फक्त दुबळे लोकच वाजवित असतात. कारण त्यांना तेवढेच करण्यासारखे असते.
एका महाकाय बलाढ्य पुरुषाने वेगाने वाहणार्या नदीचा प्रवाह आपल्या बाहुबलाने वळवल्याची एक पुराणकथा आहे. सुरूवातीला तो प्रचंड प्रवाह पाहून तो गांगरला. मागे वळून चालू लागला. पण त्याची इच्छाशक्ती त्याला खेचू लागली. नियती आणि त्याची मन:शक्ति असे एक दंद्व आता उभे राहिले . ओसंडून वाहणार्या प्रबल प्रवाहात तो बेदरकारपने उभा राहिला आणि आपली सारी सामर्थ्ये जिवाच्या आकांताने त्याने एकवटली. आता तो उसळता गरजता प्रमत्त प्रवाह त्याला एखाद्या चिमुकल्या झर्यासारखा क्षुद्र वाटू लागला . त्याच्या अंगांगातून चैतन्याची वीज खेळू लागली. त्याने अशक्य ते शक्य करून दाखवले. प्रवाहाची दिशाच बदलण्यात तो यशस्वी झाला. ग्रीक पुराणातील ही एक मार्मिक रूपककथा आहे. नियतीचा प्रवाह कितीही बलोध्द्त असला तरी मनुष्य त्यावर स्वामित्व मिळवू शकतो हा आशय या प्रतिकात्मक कथेतून व्यक्त झाला आहे. इतिहासाचं प्रत्येक पान आपल्याला हीच कथा सांगेल. लोकमान्य टिळकांनी मंडालेच्या तुरुंगात अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आणि हवामानात ‘गीतारहस्य’ या सारखा एक महाग्रंथ कष्टपूर्वक लिहून काढावा हा टिळकांना कारागृहात कोंडणार्या नियतीचा पराभव नव्हे काय? स्वातंत्र्यवीर सावरकर विक्राळ अंधारकोठडीच्या कळवंडलेल्या दगडी भिंतीवर शृंगाराचे खंडकाव्य लिहितात, हा प्रारब्धावर त्यांनी मिळवलेला विजय नाही काय? डॉक्टर आंबेडकरांसारखा दलित समजातला एक गरीब विद्यार्थी आपल्या जिद्दीवर इंग्लंड-अमेरकेतल्या विद्यापीठांची डबल डॉक्टरेट मिळवतो आणि आपल्या भीमप्रयत्नांतून दलित समाजातला शतशतकांचा अंधार नाहीसा करतो ही घटना पुरुषार्थाची द्योतक नाही काय? ज्यांच्यापाशी कर्तुत्व नाही, इच्छाशक्ती नाही अशा शेंनामेणाच्या मुर्दाड माणसांनी नियतीचे आणि प्रारब्धाचे नगारे बडवावेत हे सयुक्तिकच आहे. टिळक तुरुंगात ग्रंथ लिहितात. वाचन चिंतन करतात. पुरेशी साधने नसताना आणि मधुमेहाने तब्येत पोखरली असतांनाही लिहिण्याची उर्मि त्यांना आवरत नाही . आम्हाला मात्र लिहिण्यासाठी “मूड” लागतो. गुळगुळीत कागद हवा असतो. डोक्यावर विजेचा पंखा फिरत असला पाहिजे. दोन ओळी लिहिल्या की चहा कॉफी सारखे उत्तेजक पेय आवश्यक असते आणि सारी सामग्री सिद्ध असूनही चार ओळींच्या पलीकडे काही सुचत नाही. झोप अनावर होते. वर्षे अशीच निघून जातात. क्षुद्र लेखकांची ठरीव कथा सर्वांनाच माहीत आहे. पण ज्याला आपल्या विचारातून समजजीवनात प्रचंड उलथापालथ घडवून आणायची असते असा क्रांतिकारक पोटात भुकेची आग पेटलेली असली तरी आपले विचार शक्य त्या सर्व माध्यमातून प्रकट करीत राहतो. ती नियती त्याला अडवू शकत नाही.
माझ्या या विचारांचा विरोध करणार्यांचा युक्तिवाद मला माहीत आहे. मी एखादी पुराणकथा सांगितली की तेही अशीच एखादी रूपकात्मक कथा माझ्यापुढे ठेवतील, ते म्हणतील,
‘अहो, महारथी कर्णाच चरित्र म्हणजे नियतीची एक लहरच आहे. त्यान जन्मभर आपल्या प्रतिकूल नियतीशी प्रचंड संघर्ष केला. पण या संघर्षात कर्णासारख्या महान विराचा सपशेल पराभव झालाच की नाही. कर्ण जाणूनबुजून प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जन्मभर पोहत होतं. तो संधि साधू नव्हता. दुर्योधंनाचा पक्ष सोडून पांडवांच्या गोटात सामील होण्याची संधि त्याने साधली असती तर हस्तींनापूरचा सम्राट महारथी कर्णच झाला असता. दुर्दैवा, दू:ख आणि नाना प्रकारची संकटे यांना स्वत: होऊन आमंत्रण देण्यासाठी माणसात एक प्रकारची विलक्षण जिद्द असावी लागते. माझ्या दृष्टीने कर्ण हे एक अदम्य पराक्रमाच एक प्रचंड वादळ आहे. महत्वाकांक्षेचा तो एक जोमदार प्रवाह आहे. दिलेल्या शब्दाला प्राण गेला तरी जागणारा तो एक जोमदार सत्यवचनी आहे. तो एक पराकोटीचा प्रवाह आहे. आपल्या बाहुवर विश्वास ठेवणारा हा बलदंड पुरुष. दुसर्या कोणत्याही क्षुद्र साधनांचा आपल्या लौकिकासाठी वापर करीत नाही. वारा वाहिल त्या प्रमाणे पाठ फिरवणारा तो मुत्सद्दी नव्हता. पण वाराच आपल्या दिशेने वाहावा म्हणून झंझावाताशी झगडणारा तो एक मनस्वी वीर होता. अशा माणसाचा लौकिक अर्थाने कदाचित नियतीने पराभव केला असेल. पण आपल्या पराभवाला नियतीपेक्षा स्वत: कर्णच अधिक करणीभूत होतं. ज्या वाटेने आपण चाललो आहोत ती वाट मूर्तीमंत पराभवाची आहे, काटयाकुटयांनी भरली आहे हे त्याला चांगले माहीत होते.. त्याला लव्हाळे होऊन जगाचे नव्हते. लव्हाळ्याच्या जगण्यापेक्षा महावृक्षाचे पतन अधिक लक्षणीय असते. क्षुद्र मेणबत्ती विझली तर तिची चर्चा होत नाही. पण आकाशातील तारका खाली कोसळू लागली की तो दू:खाचा आणि आश्चर्याचा विषय ठरतो.
कर्णाच्या बाणांनी कृष्णशिष्य अर्जुन हतबल झाला होतं. कर्णाच्या पराक्रमासमोर निस्तेज झालेला अर्जुन चिंतित झाला. हे युद्ध केवळ शौर्यावरच आधारलेले असते तर ते कर्णाने निश्चित जिंकेल असते. पण केव्हा तरी वीरपुरुषाला नियती आपली लहर दाखवून चकित करते असे म्हणावे लागेल. कर्णाच्या रथाचे चाक जमिनीत फसू लागले. रथावरून खाली उतरून ते चाक पुन्हा पुन्हा वर काढण्याचा प्रयत्न कर्ण आपल्या बलदंड हातांनी करीत होता तेथेच प्रारब्ध किंवा नियती आडवी उभी राहिली. अर्जुनाचे बाण सुसाट वेगाने सुटत होते आणि कर्ण मात्र रथचक्र जमिनीतून बाहेर काढीत होता. ही देखील माझ्यामते एक प्रतिकात्मक कथाच आहे. येते कदाचित काही जण म्हणतात त्या प्रमाणे प्राक्तनाचा भाग असेलही. कारण नेमक्या क्षणी, अटीतटीच्या वेळी रथचक्र गिळण्याची इच्छा जमिनीला का व्हावी ? या प्रश्नाचे उत्तर मिळू शकत नाही. ज्या प्रश्नाची उत्तरे देता येत नाहीत तेथे आपण कपाळावर हात ठेवून “ललाट्लेख” असे उत्तर देतो. पण याचा अर्थ हे लेख आधीच कुणीतरी लिहून ठेवला आहे व आपण त्यात कानामात्रेचाही बदल करू शकत नाही असे म्हणण्यात फारसा अर्थ नाही. गडकर्यांनी आपल्या ‘एखाद्याचे नशीब‘ या कवितेत असे म्हटले आहे,
चाले खेळ असा जगत, बहुधा सौख्यात सारे जरी,
एखादा पडतो तसाच चुकुनी दू:खार्णवी यापरी.
पाही कोण अशा हताश हृदया ? जो तो असे आपला,
देवा तू तरी टाकी अश्रु वारुनी , त्यासाठी तो तापला.
. सौजन्य :- उत्तर ॲप
अप्रतिम लेख तुम्ही तुमच्या ब्लॉग वर खूप चांगली माहिती टाकता आम्ही ती नेहमी आवर्जून वाचतो ������
ReplyDeleteसुंदरच अतिशय सुंदर " नशीबा वरील वैचारिक संकल्पना आपल्या ब्लागवर मिळाल्याबद्दल मनापासून आपले आभार.
ReplyDeleteसर्वप्रथम आपल्या मनातील भावना आमच्या ब्लॉगवर व्यक्त केल्याबद्दल धन्यवाद !
Delete