◼️ बोधकथा :- घरोघरी मातीच्याच चुली
प्रेरणा साहित्यिक परिवार तर्फे आयोजित म्हणीवर आधारित बोधकथा स्पर्धा
मीनलचे लग्न
(घरोघरी मातीच्या चुली)
घरोघरी मातीच्याच चुली
रामराव एकदाचा या गोष्टीचा सोक्षमोक्ष लावण्याच्या तयारीनेच शेतात आले होते. त्यांचे शेत गावा पासून थोडेसे दूर नदीच्या काठी होते. सुंदर वृक्षवेली, नदीचा खळखळता प्रवाह, दाट झाडी यामुळे तो परिसर एकांतप्रिय लोकांसाठी अतिशय आवडता होता. प्रेमी युगुले त्या ठिकाणी प्रेमाराधना करण्यासाठी हमखास तेथे यायचे. कधी तरी ते रामरावांच्या नजरेलाही पडायचे.
गणपतरावांची मुलगी पळून गेल्यापासून रोज पारावर याबद्धल चर्चा व्हायची. प्रत्येकजण एक दुसऱ्याला दोषी ठरवायचा. मुलांवर चांगले संस्कार करता येत नाही का? आई वडील झोपा काढतात का? असे सवाल चर्चेमध्ये असायचे. ज्याच्या मुलीचे किंवा मुलाचे प्रकरण पुढे येईल त्याला मेल्याहून मेल्या सारखे व्हायचे. जो जास्त साव होऊन बोलायचा त्याचेच एखादे प्रकरण दुसऱ्या आठवड्यात समोर यायचे. रामरावचे शेत जवळ असल्यामुळे त्यांना बऱ्याच प्रकरणांची माहिती सगळ्यात अगोदर मिळायची, तसेच ती सखोलही असायची.
बड्या असामीच्या घरच्या प्रकरणात त्यांना भलताच रस असायचा. आजसुद्धा अशाच एका प्रकरणाचा छडा त्यांना लावायचा होता. पोलीस पाटलाच्या मुलाला त्यांनी ओळखले होते. असे प्रकरण चघळायला घ्यायचे म्हणजे पुराव्यानिशी रणात उतरायला पाहिजे म्हणून आज ते तयारीने शेतात आले होते. पुराव्याची कुठलीही कमतरता राहू नये म्हणून त्यांनी सरपंचालाच बरोबर आणले होते. परंतु त्यांना काय माहीत की, हे प्रकरण सारं त्यांच्या वरच उलटणार म्हणून.
रामराव आणि सरपंच दोघेही रामरावांच्या शेतात येऊन थांबले होते. उगाच या टोकाचे त्या टोकाला फिरून शेतातील पिकांची पाहणी करत होते. लक्ष मात्र त्या दाट झाडीकडेच लागून राहिलेले होते. पारधी जसे शिकारीसाठी जाळे लावून दबा धरून बसतो तसेच हे दोघे बसले होते. पण शिकाऱ्यांचीच शिकार होणार हे येणाऱ्या काळालाच ठाऊक होते. दोघे आपसात बोलायचे असले तरी अगदी हळू आवाजात बोलत होते.
बऱ्याच वेळेनंतर त्यांच्या चेहऱ्यावर जाळ्यात शिकार सापडलेल्या पारध्याच्या चेहऱ्या वरील आनंद दिसायला लागला. नदीच्या काठाने कुणी तरी येतांना त्यांना दिसले. दोघेही लपून छपून त्या जोडप्या कडे पाहत होते.
त्या जोडप्याच्या मस्त गप्पा सुरु होत्या. पाटलाच्या मुलाचे तोंड ओळखू येण्या इतपत दिसत होते, मात्र मुलीचा चेहरा दिसत नव्हता. पाटलाच्या मुलाबद्धल त्यांची खात्री पटली परंतु मुलीचा चेहरा दिसेपर्यंत त्यांच्या मनाला चैन पडणार नव्हते. आणाभाका होऊन प्रेमीयुगुल चुंबनापर्यंत आले. चुंबन घेण्यासाठी जेव्हा मुलीचा चेहरा उघडा झाला. सरपंच आश्चर्याने उद्गारले,
"रामराव, ही तर तुमच्या मीनल सारखीच दिसत्येय. बघा बरं जरा न्याहाळून."
एव्हाना रामरावांचेही लक्ष तिकडेच होते. 'मिनल सारखी कशाला ही तर मिनलच आहे.' त्यांच्या चेहऱ्यावर हावभाव भराभर बदलत गेले. त्यांनी एकदा तिकडे आणि एकदा सरपंचाकडे बघितले. सरपंचांनी ते भाव ओळखले, रामरावांना आणखी खजील झालेले बघितले. आणि बाजू सावरण्या साठी रामरावांना हळूच सांगितले.
"रामराव, घरोघरी मातीच्याच चुली असत्यात बरं का. आता बोभाटा करण्याच्या भानगडीत पडू नका. चला आपण दोघेही पाटलाच्या घरी जायला निघाले.
पाटील सोफ्यावर बसलेले होते. या दोघांना पाहिल्यावर या दोघांचे स्वागत करत म्हणाले,
"या सरपंच. आज इकडं कशी काय वाट चुकलात?"
"अवं पाटील, सहजच. आठवण झाली म्हणून आलो." सरपंच म्हणाले.
चहापाण्याचा कार्यक्रम झाला. सरपंचांनी हळूच पाटलां जवळ मुलाच्या लग्नाचा विषय काढला. रामरावांची मुलगी त्याला कशी योग्य, अनुरूप आहे. हे समजावले. थोडेसे आढेवेढे घेत पाटील तयार झाले.
रामरावांच्या घरासमोर मोठा मंडप टाकला गेला. मीनल आणि पाटलाचा राजू लग्नाच्या बोहल्यावर चढले. संपूर्ण गावाच्या साक्षीने पती पत्नी झाले. गावाला गोड धोड खायला घातले. सरपंच आणि रामराव फक्त गालातल्या गालात हसत होते.
तात्पर्य:- 'घरोघरी मातीच्या चुली' उगाच कुणाच्या घरात कशाचा धूर दिसतो म्हणू नये त्याआधी आपल्या घरात काय जळतं ते पाहिलं पाहिजे.
पंडित वराडे, औरंगाबाद
२२.११.२०२०
Comments
Post a Comment
Did you like this blog