◼️ शेअर बाजार :- स्टॉक मार्केटमध्ये टिकून राहण्याचे चार नियम!..


---------------------------------------------
थेट पंकज कोटलवारच्या लेखणीतून – स्टॉक मार्केटमध्ये टिकून राहण्याचे चार नियम!..
-----------------------------------------------
अमेरीकेत डेमोक्रॅटीक पक्षाला बहुमत मिळाले आणि जो बिडेन राष्ट्राध्यक्ष बनणार हे निश्चित झाल्यामूळे सगळेच शेअर बाजार एकदम जबरदस्त उसळले.
संध्याकाळी ग्रुपमधल्या एका सदस्याचा मॅसेज आला.
“सर, तुम्ही सांगितल्याप्रमाणे आय टी सी चा शेअर एकशे त्रेसष्ट रुपयांना घेतला होता, आज त्याची किंमत एकशे चौऱ्याहत्तर झाली आहे.”
“चांगले प्रॉफिट होत आहे, सेल करू का थांबू”?
हे वाचून मला एकदम एक वाक्य आठवले.
वॉरेन बफेचे भागीदार चार्ल्स मुंगर एकदा म्हणाले होते,
“अनेक लोकांना कंपाऊंडींग म्हणजे चक्रवाढाची जादू माहित असते, पण चक्रवाढाची जादू अनूभवण्यासाठी जो वेळ द्यावा लागतो, तो त्यांच्याकडे नसतो, म्हणून ते कंपाऊंडींगचे सुत्र अंमलात० आणून ते श्रीमंत होऊ शकत नाहीत.”
शेअर खरेदी केला की लगेच तो भरभर वाढावा आणि पटकन विकून कधी एकदा आपण भरभक्कम प्रॉफिट कमवून खिशात टाकतो, अशी प्रत्येकालाच गडबड असते.  
आणि ह्या झटपट कमाईच्या नादातच लोक मोठे नुकसान करून बसतात.
आजच्या लेखात मी तुम्हाला स्टॉक मार्केटमध्ये वर्षानुवर्ष चिवटपणे टिकून राहण्याच्या आणि आपली संपत्ती कित्येक पटींने वाढवण्याच्या साध्या सोप्या युक्त्या सांगणार आहे.
------------------------------------
१) जो डर गया, वो मर गया!.. - 
 
लोक उतावीळ बनून स्टॉक विकतात याचे सर्वात मोठे कारण म्हणजे त्यांना भीती वाटते.
उद्या शेअरचे भाव पडले तर?
आज मिळत असलेला चांगला भाव उद्या नाही मिळाला तर?
उद्या माझा लॉस झाला तर?
ही भीतीच गुंतवणूकदाराला शेअरची विक्री करायला भाग पाडते.
तुम्हाला जर विश्वास असेल की तुम्ही निवडलेला शेअर चांगला आहे, तर तुम्ही कधीही मंदीला घाबरणार नाही.
तुम्ही स्वतः थोडा रिसर्च केला असेल, तर तुम्ही आपल्या निवडीबद्द्ल निश्चिंत असाल,
मार्केटमध्ये मोठा फॉल आला म्हणून लगेच पॅनिक होवुन तुम्ही शेअर कमी भावात विकणार नाही, उलट शेअरचे भाव खुपच पडले तर ती सुवर्णसंधी समजून कमी किंमतीत आणखी थोडे शेअर्स खरेदी कराल.
पण याउलट तुम्ही कोणाच्या तरी टिपवरून, टि. व्ही बघून, ब्रोकरने सुचवले म्हणून किंवा कुठल्यातरी अनोळखी व्यक्तीच्या सल्ल्यावरून शेअर खरेदी केला असेल, आणि तो गडगडला, तर मात्र तुम्ही नक्कीच चिंताग्रस्त व्हाल.
ताणतणावामध्ये आणि दडपणाखाली नेहमीच आपल्याकडून चुकीचे निर्णयच घेतले जातात.
जेव्हा तुम्ही आपल्याकडे असलेली सगळीच्या सगळी रक्कम एकाच ठिकाणी गुंतवलेली असते, तेव्हा जोखिम वाढते.
म्हणून आपली सगळी पुंजी एकाच शेअर्समध्ये टाकू नका.
काही पैसे शेअर्समध्ये, काही रक्कम सोन्यामध्ये आणि काही भांडवल प्रॉपर्टीमध्ये असे गुंतवले तर चांगले संतुलन साधता येते.  
लोक आणखी एक चुक करतात ती म्हणजे आपले सगळे भांडवल एकाच वेळी शेअर्समध्ये टाकतात, आणि मार्केट पडले की शेअर्स विकून मार्केटला कायमचे तौबा तौबा करतात.
आपली संपुर्ण रक्कम कधीही एका झटक्यात शेअर्समध्ये टाकायची नसते.
जो टप्प्याटप्प्याने पैसे गुंतवतो, तोच शेअर बाजारात दिर्घकाळ टिकून राहू शकतो.
तुमची क्षमता जर एक लाखाची आहे, आणि इकडून तिकडून पैसे आणून किंवा ब्रोकरने दिलेले मार्जिन वापरून तुम्ही पाच लाखांच्या शेअर्सचा व्यवहार केला तर कपाळमोक्ष ठरलेला असतो.
इंट्राडे ट्रेडिंग, फ्युचर किंवा ऑप्शनचे व्यवहार करणाऱ्यांना नफा कमी आणि तोटा जास्त होतो, याचे कारणही हेच आहे.
तुम्हाला जर दिर्घकाळ काम करायचे आहे, तर तुमची जितकी क्षमता आहे, तितकेच खेळा!..
मला ह्या पैशाची गरज नाही, माझे पैसे पडून आहेत असे विचार करणारा माणूस बऱ्या वाईट दिवसात शेअर्स सांभाळू शकतो. असा माणुस कधीही, घाबरून, घाईगडबडीने चुकीचे निर्णय घेत नाही.
------------------------------------
२) योग्य शेअर्सची निवड; लागेल गुंतवणूकीची आवड - 
    
दिर्घकाळ शेअरबाजारात टिकून रहायचे असेल तर ब्लु चिप कंपन्यांना प्राधान्य द्या.
अशा कंपन्या ज्या वांद्यात नाहीत, अशा कंपन्या ज्यांच्यावर कर्ज नाही, अशा कंपन्या जिथे प्रमोटर्सची होल्डींग तगडी आहे, अशा कंपन्या ज्या वर्षागणिक चांगला नफा कमवत आहेत, अशा कंपन्या ज्या पुढच्या पंचवीस वर्षांनंतर सुद्धा टिकून रहायची हमी असेल, त्यांचीच भागीदारी विकत घ्या.

------------------------------------
३) एक बार मैने कमीटमेंट कर दी, फिर मै अपनी भी नही सुनता! –

तुम्ही जर खुप एफर्ट्स घेऊन एक चांगला स्टॉक शोधुन काढला, त्या स्टॉकचा अभ्यास केला, भरपुर रिसर्च केला, आकडेवारी पाहिली, आर्थिक ताळेबंद पाहिला, कंपनीचे बिजनेस मॉडेल तुम्हाला पटले, आणि पुर्ण विचाराअंती तुम्ही कंपनीचे शेअर खरेदी केले.
आता तुम्ही तुमच्या रिसर्चवर ठाम राहीले पाहिजे. मार्केटमध्ये मोठी पडझड झाली, आणि तुम्ही घेतलेल्या शेअरलाही त्याचा फटका बसला म्हणून लगेच निराश न होता तुम्ही आपल्या निवडीवर ठाम राहीले पाहिजे.
आता तुम्ही टी.व्ही वरच्या सल्ल्याने किंवा कुण्या व्यक्तीच्या सांगण्यामुळे अजिबात प्रभावित होवु नका.
अनेकदा तुम्ही घेतलेला स्टॉक चांगला नाही, तो अजुन खाली जाणार आहे, असे कोणी सांगितले की माणसं भीतीने गर्भगळित होतात, आणि मिळेल त्या भावात तो स्टॉक विकून टाकतात.
पुन्हा काही दिवसांनी त्या शेअर्सचे भाव वाढले की अजुन पस्तावतात,
ज्यांच्या स्वतःवर विश्वास नसतो, असेच लोक इतर शंभर जणांना सल्ले विचारतात आणि अल्टीमेटली लॉस करून घेतात.
अशी धरसोड वृत्ती असणारे किंवा इतरांमूळे चटकन प्रभावित होणारे लोक कधीही चांगले अभ्यासू आणि दिर्घकालीन गुंतवणूदार होवु शकत नाहीत. 
रात्रीनंतर दिवस येतो आणि दिवसानंतर रात्र येते, 
तसे तेजीनंतर मंदी येते आणि मंदीनंतर पुन्हा तेजी येते.
हा निसर्गाचा नियमच आहे, आणि या दोन्ही वेळी आपण स्वतःला नियंत्रणात ठेवायला शिकलं पाहिजे
------------------------------------
४)  रोगाचे निदान; देईल जीवनदान!..

 शेअर बाजारात योग्य वेळी योग्य टुल वापरता आला पाहिजे.
एक लहान तान्हुले बाळ बोलु शकत नाही, आपल्या संवेदना व्यक्त करू शकत नाही.
ते फक्त रडते.
भुक लागली तरी रडते, तहान लागली तरी रडते आणि झोप आली तरी रडते, 
त्याला पाणी प्यायचे असेल आणि आपण त्याला जबरदस्तीने झोपवायचा प्रयत्न केला, तर ते अजूनच भोकाड पसरते. 
पण एका आईला आपलं बाळ का रडतंय, हे लगेच कळते.
अगदी तसंच तुमचा शेअर खाली का पडतोय, ते तुम्हाला लगेच कळालं पाहिजे.
अनेकदा लोक झटपट पैसे कमवण्याच्या मोहापायी फसव्या आणि भुरट्या कंपन्यांमध्ये पैसे गुंतवतात, त्या कंपन्यांच्या व्यवसायाची कसलीही माहिती त्यांना नसते. आर्थिक बाजू माहित नसते, 
कंपनीवर किती कर्ज आहे, याची कल्पना नसते, 
प्रमोटर शेअर गहाण टाकतोय, हे माहीत नसते, 
तरीही शेअरचे भाव पडायला लागले की ते स्टॉप लॉस लावण्याऐवजी एव्हरेजिंग करत बसतात.
अशा कंपन्यांचा शेवट डि एच एफ एल, व्होडाफोन-आयडिया किंवा यस बॅंक सारखा होतो.
कोणत्या कंपनीत लॉस बुक करून बाहेर पडायचं आणि कोणत्या कंपनीत एव्हरेज करायचं, हे चाणाक्ष गुंतवणुकदाराला तात्काळ समजतं. 
म्हणुणच माझा आग्रह असतो, की तुम्ही ब्लु चिप कंपन्यांमध्येच व्यवहार करा.
कमीत कमी त्या तुम्हाला कधी कंगाल बनवणार नाहीत.
पेनी स्टॉक्स मात्र तुम्हाला कुठे नेतील सांगता येत नाही.
त्यामूळे जरा जपुन!..

आभार आणि शुभेच्छा!..

Comments

Popular posts from this blog

◾संघर्ष कथा :- एका आदिवासी जमातीतील कलेक्टर डॉ. राजेंद्र भारूडची ही संघर्ष कथा एकदा नक्की वाचा,खरचं प्रेरणा मिळेल ...

देतो तो देव - बोधकथा

हिरव्या हिरव्या श्रावणात ... | मराठी कविता | संजय धनगव्हळ

कविता :- 📝 पत्र शेवटचं लिहितो आहे ...

◼️हास्य कविता :- दारूड्याची नशा ...

◾ललित लेख :- स्ञी

◼️ बोधकथा :- अति तेथे माती

◼️ ललित लेख :- शेवटी काय सोबत घेऊन गेला तो भिकारी ...

◾विशेष लेख :- विक्रम साराभाई यांचा एक सत्य किस्सा अवश्य वाचा !