◼️ बोधकथा :- देव तारी त्याला कोण मारी...


चिन्मयने " श्रीमानयोगी " चे शेवटचे पान वाचून पुस्तक बंद केले. त्याचे मन छत्रपति शिवाजी महाराजांचा काळात रमून गेले होते. काही केल्या त्याचे मन इतिहासातून बाहेर यायला तयार नव्हते. पाठीत एक धपाटा पडल्यावर तो धाडकन वर्तमानात आला आणि त्याने वळून बघितले तर त्याची आई हातात पैसे आणि पिशवी घेऊन उभी होती.


"अरे किती हाका मारायच्या. काय झोपला होतास का काय. ह्या चार वस्तू बाजारातून घेऊन ये. आत्ता पाहुणे घरात येतील. जा पटकन."


"जशी आज्ञा आईसाहेब." असे म्हणून चिन्मयने आईला त्रिवार मुजरा केला आणि बाजारात गेला.


चिन्मय पुण्यात आबासाहेब गरवारे महाविद्यालयात अकरावीच्या वर्गात होता. लहानपणापासून त्याला ऐतिहासिक कादंबऱ्या वाचायची फार आवड. इतिहासात तो इतका रमून जायचा की त्याला जगाचा पूर्ण विसर पडायचा. छत्रपति शिवाजी महाराज म्हणजे त्याचे आराध्य दैवत. लहानपणापासून तो ऐतिहासिक नाटकात काम करायचा. अगदी मनापासून आणि भूमिकेत समरसून. त्याच्या प्रत्येक भूमिकेला प्रेक्षकांकडून चांगली दाद मिळायची.


त्याचे नशिब एवढे बलवत्तर की ह्या वर्षी त्याची फिरोदिया करंडकच्या चमूमधे निवड झाली आणि नाटक होते "शाहिस्तेखानाचा वध". चिन्मयला तर आभाळच ठेंगणे झाले. त्यात तो अंगापिंडाने मजबूत होता. त्याची हिंदी व उर्दू भाषेवर चांगली हुकूमत होती. त्यामुळे त्याची शाहिस्तेखानाच्या भूमिकेसाठी निवड झाली. छत्रपति शिवाजी महाराजांची भुमिका मिळाली नाही म्हणून तो मनातून थोडासा नाराज झाला पण त्याने नाराजी दूर सारून जोमाने तालमी सुरु केल्या. 


लाल महालाचा सुंदर देखावा उभारला होता. त्यांच्या शिक्षकांनी सर्वांचे सुंदर संवाद लिहीले होते. एक तासाचा प्रयोग होता. त्यात पडद्यावर शाहिस्तेखानाने पुण्यनगरीवर केलेला जुलूम चित्र रुपाने दाखवला होता. लाल महालातले वातावरण हुबेहुब उभे केले होते. शिवाजी महाराजांचा लाल महालात प्रवेश, सगळ्यांची पळापळ, शाहिस्तेखानावरचा हल्ला ह्यावर सगळ्यांनी खूप मेहनत घेतली होती. महाराजांचा वार आणि खानाची उडी हा महत्वाचा प्रसंग होता आणि जर ह्यात थोडीसुद्धा गफलत झाली तर एखादी वाईट घटना घडू शकली असती. म्हणून दिग्दर्शकाने त्यावर खूप जास्त मेहनत घेतली होती. खानाचा महाराजांनी केलेला पाठलाग, ज्या ठिकाणी ते खानावर तलवार चालवणार ती जागा, वार करतांना हात कुठून कसा फिरणार व वार कुठे होणार ह्या सगळ्या गोष्टींची त्यांनी व्यवस्थित तालीम घेतली कारण महाराज वापरणारी तलवार ही खरी तलवार होती. त्यामुळे प्रयोगाच्या वेळी काही अनर्थ होऊ नये यासाठी त्यांनी खूप काळजी घेतली होती.


होता होता प्रयोगाचा दिवस उजाडला. नेमके आदल्या दिवशी चिन्मय त्याच्या गाडीवरून पडला आणि त्याच्या पायाला बराच मुका मार लागला. पण ही गोष्ट त्याने सर्वांपासून लपवून ठेवली कारण नाटक व्यवस्थित पार पडावे अशी त्याची इच्छा होती. त्याला चालतांना जास्त त्रास होत नव्हता पण पळतांना मात्र पाय दुखत होता व नीट पळता येत नव्हते. तरीदेखील त्याने तसेच नाटकात भाग घ्यायचे ठरवले.


नाटक सुरु झाले व शेवटी तो प्रसंग आला. खानाची पळापळ सुरु झाली. चिन्मयला तर नीट पळता येत नव्हते. महाराज खानापाशी आले आणि त्यांनी वार केला. पण त्याचवेळी चिन्मयच्या पायात कळ आली आणि तो खाली वाकला त्यामुळे वार चुकला. महाराज दुसरा वार करणार एवढ्यात चिन्मय पडला ती सेटची फळी त्याच्या वजनाने तुटली आणि चिन्मय पहिल्या मजल्यावरून खाली पडला. पण खाली महालातील आसन व्यवस्था होती त्यावर चिन्मय पडला त्यामुळे त्याला फार लागले नाही. त्याच्या अंगावर फळी पडली. सेट तुटल्यामुळे महाराजही खाली पडले आणि तलवारीचा वार चिन्मयवर झाला. पण त्याच्या अंगावर फळी असल्यामुळे वार फळीवर झाला व त्याला काही लागले नाही.


ही पडझड झाल्यामुळे नाटक थांबवले आणि सगळ्यांनी चिन्मयला उचलले व डॉक्टरकडे नेण्यासाठी गाडीत बसवले. जात असतांना त्यांच्या गाडीचे चाक पंक्चर झाले आणि चालकाचा गाडीवरचा ताबा सुटला व ती झाडाला धडकली. पण गाडी हळू असल्यामुळे गाडीतल्या कोणाला जास्त लागले नाही. शेवटी दुसरी गाडी करून सर्वजण डॉक्टरकडे गेले व त्यांनी औषध घेतले.


तात्पर्य: जर तुम्हांला दैवाची साथ मिळाली आणि तुमच्यावर देवाची कृपादृष्टी असेल तर तुम्ही कठीण प्रसंगामधून सहीसलामत बाहेर पडता.


लेखक :- अतुल दिवाकर

Comments

Popular posts from this blog

◾संघर्ष कथा :- एका आदिवासी जमातीतील कलेक्टर डॉ. राजेंद्र भारूडची ही संघर्ष कथा एकदा नक्की वाचा,खरचं प्रेरणा मिळेल ...

देतो तो देव - बोधकथा

हिरव्या हिरव्या श्रावणात ... | मराठी कविता | संजय धनगव्हळ

कविता :- 📝 पत्र शेवटचं लिहितो आहे ...

◼️हास्य कविता :- दारूड्याची नशा ...

◾ललित लेख :- स्ञी

◼️ बोधकथा :- अति तेथे माती

◼️ ललित लेख :- शेवटी काय सोबत घेऊन गेला तो भिकारी ...

◾विशेष लेख :- विक्रम साराभाई यांचा एक सत्य किस्सा अवश्य वाचा !