◼️ बोधकथा :- टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण येत नाही

 पुरुषोत्तम आज चार वाजताच उठला. तसाही तो रोज साडेपाचला उठतच असे.अचानक वडील गेल्याने दोन बहिणी आणि एका भावाची जबाबदारी अंगावर येऊन पडली. वडीलाःचे वयही फार नव्हते. शेतातून परत येताना उसाच्या ट्रकने त्यांना उडवले आणि जागच्याजागीच मृत्यू आला. 

     घरातले सर्च हबकले. सुमित्रा तर अचानक बसलेल्या धक्क्याने थिजूनच गेली. डोळ्यात टिपूस येईना. शेवटी पोरे जवळ गेल्यावर एकच कल्लोळ उठला.लहान कच्ची बच्ची शाळा शिकणारी.सुमित्रा कधीतरी शेतावर जाऊन नव-याला कामात मदत करायची .पण संपूर्ण शेती सांभाळण्याचे ज्ञान तिला नव्हते. मोठा मुलगा पुरुषोत्तम ह्याला  घरची जबाबदारी येऊन पडल्याने शेती करणे भागच होते.

     पुरुषोत्तम व इतरही भावंडे अभ्यासाला हुशार!!पुरुषोत्तम आईला म्हणाला " आई मी बघेन शेतीचे सर्व. तू नको काळजी करु. मला माहिती करुन दे म्हणजे जमून जाईल.  बन्या आणि शकू शिकतायंत ,शिकू देत."

पुरुषोत्तम वर्गातला हुशार विद्यार्थी . त्याला शाळा सोडावीलागल्यावर , गुरुजींनाच खूप वाईट वाटले.

" तू रात्री येत जा.मी शिकवत जाईन तुला.शनिवार , रविवार दुपारी शिकवत जाईन.तू शिक्षण अजिबात सोडू नकोस"गुरुजींच्या बोलण्याने पुरुषोत्तमला खूप धीर आला.

रोज सकाळी लवकर शेताला जाऊन कामाला सुरवात करत असे.ज्वारी आणि गहू करायचे ठरवले म्हणजे घरी धान्य मिळेल.गहू ज्वारीला भावही चांगला होता.

      आज पाटलांच्या वाड्यावर धारा काढायला बोलावले होते. त्यांचा गडी गाव सोडून गेला. पुरुषोत्तमला धारा काढायच्या बदल्यात रोज दीड लिटर दूध आणि महिन्याला दहा किलो तांदूळ द्यायचे ठरले.

     लवकर उठले तरच हे जमणार होते. घरचा दूध ,तांदळाचा खर्च भागतोय म्हटल्यावर पुरुषोत्तम काम करु लागला.नंतर शेतावरची कामे आणि नःतर सरांकडे शिकवणीला जायची त्याला ओढ असायची. कधी शरीर थकायचे. मग आई म्हणायची

"पुरुबाळा तूप , मेतकूट भात खा. तुला तरतरीत वाटेल. कधी शिरा कढी मसालेभात असे काही देऊन त्याला शिकवणीला पाठवी.

     एकदा तर अंगात तापाची कसकस असूनही पुरुषोत्तम आलेला बघून गुरुजी म्हणाले

" अशी शिक्षणाची आस पाहिजे." 

    दिवस काय कोणासाठी थांबतात का?एकेक शिक्षणाचे वर्ष पुढे सरत होते. पुरुषोत्तमचे दहावीचे वर्ष आले. बन्या आणि शकू लहान असल्याने शेतावर त्यांचा उपयोग नव्हता.

      त्याचे शेजारी रहाणारे दोन मित्र आई त्याच्या मदतीला यायचे.सरांनीही त्याला रोज मनापासून शिकवले.वेळेला उपयोगी पडतात तेच खरे मित्र असतात.पुरुषोत्तम शेतात , घरी वेळ मिळेल तसा अभ्यास करी.एकदा गुरुजी त्याची पाठ थोपटून म्हणाले " पुरुषोत्तम किती कष्टाने विद्या शिकतोस. तुझ्या कष्टांचे चीज होवो."पुरुषोत्तमला खूप समाधान वाटायचे.परीक्षा जवळ आली तरी त्याची तिहेरी कसरत चालूच होती. पहाटे चारला उठायचे , आठला शेताला जायचे. सातला परत यायचे .जेवण करुन, सरांकडे आठला शिकवणीला हजर!! सरही दिवसभर शाळेत शिकवून दमले तरी , त्याला तळमळीने शिकवत. कधी दहा वाजायचे तर कधी अकरा.

     पुरुषोत्तमने कसून आभ्यास केला. त्याला 80% मार्क्स मिळाल्यावर सर्वांचाच आनंद गगनात मावला नाही. शाळेने त्याचा गुणवंत विद्यार्थी म्हणून सत्कार केला. त्यावेळी तो सरांना घेऊनच पुढे गेला.भाषण करताना म्हणाला

" मला इतके तळमळीने शिकवणारे गुरुजी मिळाले , म्हणूनच मी शिकू शकलो. आज एवढे मार्क्स मिळवू शकलो."

   सरांनीही त्याचे खूप कौतुक केले."एवढी जिद्द बाळगणारा , कष्टाने शिक्षण घेणारा , पुरुषोत्तम आदर्श विद्यार्थी आहे.त्याने खूप कष्ट सोसून शिक्षण घेतले आहे.आपण सर्व त्याच्या पाठी उभे राहू.अजूनही तो खूप शिकेल.नाव कमवेल."

सर्वांनी भरभरुन टाळ्या वाजवल्या.

     शेती करुन , भावंडांच्या , घरच्या गरजा भागवून , बाहेरुन कलाशाखेचा अभ्यास करणे सोपे नव्हते.पण त्याने जिद्द सोडली नाही. भाषा विषय त्याचे मुळातच चांगले असल्याने , त्याने शहरातील मित्रांकडून नोटस मिळवून , पुस्तके बारकाईने वाचून मराठी विषयात पदवी मिळवली.

      सरांच्या ओळखीने एक पी एच डी करणा-याःना मदतनीस हवा होता. सुमित्रा म्हणाली " शेती आपण करायला देऊ. तू चांगला शीक. तुला छोटीशी नोकरी मिळाली आहे ती कर.

खूप मोठा हो राजा"

    पुरुषोत्तम पुण्यात आला. सरांच्या मित्राचे घर मोठे होते. एक खोली मिळाली.घरचे व त्याचे शिक्षणाचे खर्च भागण्यासाठी त्याने काही ठिकाणी दूध आणि पेपर टाकायला सुरवात केली.कोणतेच काम कमी दर्जाचे मानू नये.

   अशी लढत देत देत , कधी लायब्ररीच्या पुस्तकावर भागवून ,तर कधी पोटाला चिमटा घेऊन त्याने M. A ची पदवी सन्मानासह मिळवली.

गावाने त्याचा मोठा सत्कार आयोजित केला.ज्यांच्याकडे तो मदतनीस म्हणून काम करत होता , त्यांनी चांगली नोकरी मिळवून दिली आणि पी एच डी करायचा सल्लाही दिला.

    अजूनही कसरत चालू होतीच. नोकरी करुन पी एच डी करायला सांगितले .पुरुषोत्तमने आपले दूध आणि पेपर टाकणे चालूच ठेवले. उत्पन्नाचा काही भाग घरी ,काही भावंडांसाठी शिल्लक व अगदी थोडा स्वतःसाठी वापरे.त्याची धडपड भावंडांना उच्च शिक्षण द्यायचेआणि आईला आरामात ठेवायचे असल्याने थोडे थोडे पैसे साठवून वबेडरुम फ्लॅट घेतला.

    त्याचवेळी पी एच डी पूर्ण झाले. गावी येऊन आई आणि सरांच्या पायावर डोके ठेवले.शाळेने मोठा सत्कार केला.त्याने आई , गुरुजी , त्यांचे मित्र आणि साथ देणारे मित्र , गावकरी सगळ्यांनाच धन्यवाद दिले.

   आता सर बोलायला उठले

" अत्यंत कष्टाने ,परिस्थितीशी लढून झगडून पुरुषोत्तमने हे उज्वल यश मिळवले आहे. त्याने शहरात जाऊन आपल्यापुरते बघितले नाही. दूध आणि वर्तमानपत्रे घरोघरी टाकण्यात कमीपणा मानला नाही. लहान असताना पहाटे चारपासून रात्री अकरा वाजेपर्यंत कष्टाने शिक्षण घेतले , म्हणून आज हे दिवस दिसतायंत.टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण येत नाही"

   सर्वांनी टाळ्यांचा  कडकडाट

केला.त्याने आणि गुरुजींनी घेतलेल्या कष्टाचे चीज झाले .आई ,भावंडे ,पुरुषोत्तम 

गुरुजी आणि मंचावरील सर्वांच्याच डोळ्यांत आनंदाश्रु 

दाटले.


तात्पर्य :-   टाकीचे घाव सोसल्याशिवाय मोठेपणा मिळत नाही


सौ मनीषा आवेकर 

पुणे

फोन   9763706200

Comments

Popular posts from this blog

◾संघर्ष कथा :- एका आदिवासी जमातीतील कलेक्टर डॉ. राजेंद्र भारूडची ही संघर्ष कथा एकदा नक्की वाचा,खरचं प्रेरणा मिळेल ...

देतो तो देव - बोधकथा

हिरव्या हिरव्या श्रावणात ... | मराठी कविता | संजय धनगव्हळ

कविता :- 📝 पत्र शेवटचं लिहितो आहे ...

◼️हास्य कविता :- दारूड्याची नशा ...

◾ललित लेख :- स्ञी

◼️ बोधकथा :- अति तेथे माती

◼️ ललित लेख :- शेवटी काय सोबत घेऊन गेला तो भिकारी ...

◾विशेष लेख :- विक्रम साराभाई यांचा एक सत्य किस्सा अवश्य वाचा !