◼️ ललित लेख :- बटवा... | Prayerna


_लेखिका- मृणाल वझे._ 

      एखादी गोष्ट छोटी असते की मोठी असते ही बघणाऱ्याच्या नजरेवर अवलंबून असते, हो ना?                  

       माझे लग्न झाले मे महिन्यात. प्रचंड उकाडा … उन, … घामाच्या धारा … . ! 

       लग्न झाल्यानंतर तिसऱ्याच दिवशी आम्ही दोघे कोकणात जायला निघलो. कोकणात माझे सासर. हे जवळजवळ ३० वर्षापूर्वी, त्यावेळी रेल्वे सुरु झाली नव्हती. सगळीकडे सरकारी बस, म्हणजे एस.टी. नेच प्रवास करायला लागायचा. आराम गाड्या सुद्धा फार नव्हत्या. तरी पण मी नवी नवरी म्हणून एका आराम गाडीचे आरक्षण करून आम्ही निघालो.

       लग्न ठरल्यानंतर सहा महिन्याने झाले असल्याने माझ्या नवऱ्याने थोडीफार माहिती दिली होती मला कोकणाची. माणसांची पण थोडीफार तोंडओळख झाली होती पण शेवटी अनुभव तो अनुभवच ….!

       त्यामुळे कोकणात घरी गेल्यावर माझे नक्की काय होणार आहे या चिंतेतच आम्ही सकाळी जवळजवळ १५ तासाचा प्रवास करून घरी पोहोचलो.

     रात्रभर बस मध्ये झोप झालीच नव्हती. असे वाटत होते की घरी गेल्याबरोबर आंघोळ करून मस्त ताणून द्यावी. पण सासुरवाशीण होते न…!

     पण तिथे पहिला अनुभव मिळाला सासूबाईकडून, खूप चांगला होता तो. जसे काही त्यांना माझ्या मनातले कळलेच होते.

      त्या म्हणाल्या, "दमली असशील ना, अंग धुवून घे , खा काहीतरी आणि पड जरा त्या खोलीत. जेवायचे झाले की मी तुला उठवते." मी पडत्या फळाची आज्ञा घेऊन सटकले. धाकटी नणंद आलीच माझ्या मदतीला. 

      दिवस जरा इथे बस तिथे बस करत रेंगाळण्यात गेला. माझी नजर सासुबाईंना बघत होती. त्यांचे सर्वांवर लक्ष होते. आवाजात जरब होती. गडी माणसाकडून त्या कामे करून घेत होत्या.

      संध्याकाळी मला येउन म्हणाल्या, "जरा तयार हो गं. गावातल्याच चार बायका येतील माझी सून बघायला. थोडावेळ बस, मग कंटाळलीस तर आत निघून जा. चालेल मला." दुसरा अनुभव.

        नंतर आम्हाला दोघांना रात्री जवळ बोलावले नी म्हणाल्या, "परवा पूजा आहे, तेव्हा उद्या सगळ्या देवळात जाऊन देव धर्म आटपून घ्या म्हणजे तुम्ही पण फिरायला जायला मोकळे. मी माझ्या जबाबदारीतून मोकळी." स्पष्टपणाचा तिसरा अनुभव. आवडत होते मला हे. हळू हळू मी पण आकसलेली रुळायला लागले होते. 

       सगळे आटपेपर्यंत उशीरच झाला. त्यांचे फर्मान मला, "इथे काही आवरत बसू नकोस, लगेच झोपायला जा. काल ही जागरण झालंय. उद्या सकाळी लवकर उठायला हवे. पाच वाजता मी उठवते. आताच उद्याची तयारी करून ठेव नी ताबडतोब झोपायला जा."  मी जरा मागे पुढे करतच गेले.

      आमचे घर जुन्या पद्धतीचे. सोपा, पडवी माजघर. त्यातच एक छोटी लाकडाच्या भिंती घालून खोली केलेली. तिथे माझी रवानगी झाली.

       होता तो एकच टेबल फॅन तिथे ठेवला होता. ह्यातून त्यांचे मोठेपण दिसायला लागले होते. मी शहरात वाढलेले, पहिल्यांदाच कोकणात आलेले. मला खूप अडचणी येत असणार ह्याची पूर्ण जाणीव त्यांना होती. त्यामुळे छोट्या छोट्या गोष्टीत सुद्धा त्या माझी काळजी घेत होत्या. 

        "उठा पाच वाजले. उशीर होईल. उठा लवकर,  बस निघून जाईल." या आवाजाने मी खडबडून जागी झाले. धडपडतच उठले. 

      "अंथरूण आवरण्यात वेळ घालवू नका, मी आवरेन नंतर." पांघरायच्या चादरीची घडी उशीवर ठेवली आणि मी माझ्या तयारीला पळाले.

      तयारी करून आम्ही धावत पळत बस पकडली. एकदम मला सुटल्यासारखे झाले. मी श्वास सोडला … आणि तिथेच माझा श्वास अडकला… 

      गळ्याकडे हात जाताच लक्षात आले की लग्नात घातलेले माझे मोठे मंगळसूत्र गळ्यात नाही. फक्त मुहूर्तमणी गळ्यात.

      माझे तर धाबेच दणाणले. मी आठवायला लागले. मी तर कुठे काढून नव्हते ठेवले, मग ते गेले कुठे ??? माझा जीव थाऱ्यावर राहीना. बरं…  बस थांबवून परत पण जाणे शक्य नव्हते. 

       माझ्या नवऱ्याच्या हे लक्षात आले. त्याला हळूच काय घडले ते सांगितले. तो म्हणाला, "खोलीतच पडले असेल तर आई उचलून ठेवेल. न्हाणीघरात ठेवले असशील तर ते मिळेल कारण आपले कामगार सर्व जुने, प्रामाणिक आहेत. तेव्हा काळजी सोड. शांतपणे आपण देवाला जाऊन येवू. संध्याकाळी काय तो उलगडा होईल." 

      नवरा खूपच शांत होता. मला मात्र मेल्याहून मेल्या सारखे झाले होते. भरपूर उकाडा … घाम … त्यात मला मुंबईत गळ्यात घालायची सवयच नव्हती. त्यात सारख्या जरीच्या साड्या … जीव अगदी उबून गेला होता. त्यात आता हे !!! मी पार रडकुंडीला आले होते.

       तो दिवस कसा पार पडला ते माझे मलाच कळंले. इथे प्रत्येक देवाच्या ठिकाणी कोणी कोणी नातेवाईक भेटत होते. त्यांच्याशी खोटे खोटे हसून मी पुढे जात होते. कुणाला कळू नये म्हणून दोन्ही खांद्यांवर पदर घेतलेला. लोकांच्या डोळ्यात काय कौतुक…! शहरातली असून रीत आहे हो मुलीला !!!

       सगळी कसरत करत करत शेवटी संध्याकाळी घरी पोहोचलो. येताना बसमध्ये आता आपल्याला कशाला सामोरे जायला लागणार आहे, ह्यासाठीचे डोके शिणवून शिणवून माझे खरंच डोके दुखायला लागले होते. नवरा मला धीर देत होता पण त्याचा काही उपयोग होत नव्हता.

      आल्या आल्या मी सासूबाईच्या चेहेऱ्याकडे बघितले. त्या शांत होत्या. माझ्या मनात अनेक प्रश्न उभे राहिले. त्यांना काही माहितच नाही का? पण मग आता मी ते कुठे शोधणार? तेसुद्धा त्यांच्या नकळत? का ही वादळापूर्वीची शांतता आहे…?

     मला काहीच कळेना. मी हातपाय धुवून माजघरात आले. त्या माझ्याजवळ आल्या. मला हळूच म्हणाल्या, "जा देवघरात, कुंकू लाऊन घे, सांजवात कर आणि वरती एका डब्यात तुझे मंगळसूत्र ठेवलय ते घालून ये."

       चिडणे नाही, रागाने बोलणे नाही काहीच नाही. मला एकदम रडायलाच यायला लगले. माझ्या पाठीवर हात ठेऊन म्हणाल्या, "होते अगं असे कधीतरी, तुला हे सर्व नवीन आहे, त्यात पुन्हा उकाडा. रात्री गळ्यातून पडून उशीत अडकले होते. मला अंथरूण आवरताना सापडले.

      लग्न झालंय आता … मोठी हो अन् जबाबदारीने वाग. रडू नकोस. डोळे पुस. मी कोणालाही हे सांगितले नाही. त्यामुळे त्याची चर्चा नको." 

      मी पळतच न्हाणीघरात गेले आणि दिवसभर कोंडलेले सगळे डोळ्यातून पाझरू दिले. मनाने… अंगाने पूर्ण शांत होत गेले.

     दोन वाक्यात त्या जेव्हड्या मऊ होत्या तितक्याच कठोर होऊन गेल्या.

      ह्या गोष्टीचा त्यांना तमाशा ही करता आला असता… कारण ही माझ्यासाठी खूप मोठी चूक होती, पण ती एक छोटीशी चूक समजून मला त्याचा सल त्यांनी दिला नाही हा त्यांचा मोठेपणा !!!

म्हणूनच मी म्हणाले …

     एखादी गोष्ट छोटी की मोठी हे ज्याच्या त्याच्या नजरेत असते हेच खरे….!

_मृणाल वझे._



Comments

Popular posts from this blog

◾संघर्ष कथा :- एका आदिवासी जमातीतील कलेक्टर डॉ. राजेंद्र भारूडची ही संघर्ष कथा एकदा नक्की वाचा,खरचं प्रेरणा मिळेल ...

देतो तो देव - बोधकथा

हिरव्या हिरव्या श्रावणात ... | मराठी कविता | संजय धनगव्हळ

कविता :- 📝 पत्र शेवटचं लिहितो आहे ...

◼️हास्य कविता :- दारूड्याची नशा ...

◾ललित लेख :- स्ञी

◼️ बोधकथा :- अति तेथे माती

◼️ ललित लेख :- शेवटी काय सोबत घेऊन गेला तो भिकारी ...

◾विशेष लेख :- विक्रम साराभाई यांचा एक सत्य किस्सा अवश्य वाचा !