◼️ ललित लेख :- आनंदाच्या गावाला जाऊया .... | ✍️सुचित्रा पवार... | Prayerna


 आनंदाच्या गावाला जाऊया ....

         "आनंदी आनंद गडे ,

           इकडे तिकडे चोहीकडे "

बालकविंच्या या ओळीप्रमाणेच 'निसर्गातच भरुनी आहे आनंदी आनंद!'खरेच का आनंदाला शोधावे लागते ? क्वचित वेळा असेलही ,पण तरीही मला वाटते ,'नाही! 'तुझे आहे तुजपाशी परी जागा चुकलाशी 'अशीच काहीशी आपली वृत्ती असते .

     आनंद आपल्या मनात झिरपत असतो ,त्याचा ठेवा आपल्याच मनात असतो पण आपण कस्तुरी मृगासारखे पिसाट धावत सुटतो  त्याच्या मागे त्याला शोधायला .इकडे तिकडे वेड्यासारखे शोधतो त्याला पण तो असतो निनादत अंतर्मनातून आपल्याच मनात पण आपण शोधतो त्याला भौतिक गोष्टीत ,भौतिक सुखात ,आणि या भौतिकांचा कधीतरी कंटाळा येतोच आणि मग आपण दुःखी होतो .आपल्याला कुणीतरी आनंद द्यावा ,आनंदी करावे वाटते पण आनंद घेण्याने नाही तर देण्याने आपण आनंदी होतो हे विसरतो .

     मधमाशी कणाकणाने मध साठवते पण सुमधुर मधाचे पोळे केव्हढे  मोठे होते नाही ? असेच जीवनात आनंदाचे क्षण क्षण गोळा करावे लागतात मगच आनंदाचा ठेवा पोळ्यासारखा दिवसेंदिवस मोठाच होत राहतो .या सुमधुर आनंदी साठवणींचा आनंद काही औरच !

    रणरणत्या उन्हात गर्द सावली देणाऱ्या झाडाखाली विसावलाय कधी ? निष्पाप बालकाचे स्वतःशी स्मित पाहून हरखलाय कधी ? उन्हात मृगजळ कधी लहान मुलासारखे पकडण्याचा प्रयत्न केलाय ? शेतात डोलणाऱ्या सळसळत्या पिकात स्वतःला हरवून बसलाय कधी ? बघा ,आनंदाचे अक्खे गाव कसे वसलेय आपल्याभोवती . शेतात वाहणाऱ्या मधुर झऱ्याचे पाणी ओंजळीतून पिलाय कधी ? ओढ्यांचे खळखळणे ,वेलीवर फुलं उमलणे ,फुलपाखरांचे लयबद्ध भिरभिरणे अनुभवलंय कधी ? शेतातल्या वनराईतून कुहू s कुहू ss किंवा कु s क कु s क आवाजमागे धावलाय ? जमिनीवरची ,घरट्यातली वेगवेळ्या पक्षांची अंडी ,इवलीशी नाजूक पिल पाहिलीत कधी ? 

     तापलेल्या जमिनीवर पावसाने पसरणारा मृदगंध ,अवचित समोर येऊन नाचणारा मोर पाहून हरखलाय कधी ? संध्याकाळी सूर्यास्त होतानाचे लोभस बिंब ,चंद्रोदय होताना झाडा मागचा त्याचा लपंडाव ,रात्रीच्या निरव शांततेत लुकलुकणाऱ्या चांदण्यानी भरलेले निरभ्र आकाश ,रातव्याची किरकिर ,दुरून कुठून तरी येणारा रातराणीचा श्वास भरुन जाणारा सुगंध ,निष्पाप कोकरांचे बागडणे ,छोट्या वासराचे त्याच्या आईला लुचणे अन फेसाळते दूध त्याच्या ओठांवरून घरंगळणे ,भरलेल्या कणसांवर पिकांवर डोलतच सावधपणे दाणे टिपणारी पाखरे ! खरंच आनंदाचे कितीतरी झरे आपल्याभोवती झुळझुळत असतात की एक आयुष्यच कमी पडावे ! 

     आनंदी दृष्टी असणारी ,जिच्या मनात आनंदी आनंद भरून आहे ,जी आपल्या प्रेमळ वागण्याने दुसऱ्यांस आनंद देते ,तीच सर्वात आनंदी व्यक्ती ! 

    पुस्तकांच्या दुनियेत हरवणारी व्यक्तीही सर्वात आनंदी असते कारण पुस्तकात रमणारी व्यक्ती पुस्तकातील जगात वातावरणात एकरूप होते ,तादात्म्य पावते .आवडीच्या गाण्यांची धून कोणत्याही क्षणी आपल्याला आनंदीच करते .

     दिवाळीची चाहूल लागताच निरभ्र होणारे आकाश ,दूरवर पसरलेली उबदार थँडी ,तेला उटण्याने भावाला घातलेलं अभ्यंग ,नवीन कपड्यांचे नवे गन्ध ,एकत्र कुटुंबाचे हास्य विनोद ,चांदण्या रात्री शाल लपेटून मोकळ्या अंगणात मारलेल्या गप्पा अन गप्पातच हळूच मिटलेले डोळे ! हे सर्व माझ्यासाठी आनंदाचे ठेवे आहेत . 

    जिथं निरपेक्ष प्रेमानं नाती एकत्र येतात ,पुनः भेटीची ओढ लावतात ,तिथं आनंदाचे गोकुळ अन या गोकुळात आनंदी कृष्णही असणारच ना ??

©सुचित्रा पवार  तासगाव सांगली

🌻



     

(लेख आवडला तर नक्की शेअर करा...)

Comments

Popular posts from this blog

◾संघर्ष कथा :- एका आदिवासी जमातीतील कलेक्टर डॉ. राजेंद्र भारूडची ही संघर्ष कथा एकदा नक्की वाचा,खरचं प्रेरणा मिळेल ...

देतो तो देव - बोधकथा

हिरव्या हिरव्या श्रावणात ... | मराठी कविता | संजय धनगव्हळ

कविता :- 📝 पत्र शेवटचं लिहितो आहे ...

◼️हास्य कविता :- दारूड्याची नशा ...

◾ललित लेख :- स्ञी

◼️ बोधकथा :- अति तेथे माती

◼️ ललित लेख :- शेवटी काय सोबत घेऊन गेला तो भिकारी ...

◾विशेष लेख :- विक्रम साराभाई यांचा एक सत्य किस्सा अवश्य वाचा !