नजर
*नजर*
नजर, दिठी, दृष्टी ! मानवास परमेश्वराने दिलेली बहुमोल बाब! साऱ्या चराचर सृष्टीचं ज्ञान मानवास ज्ञानेंद्रियांद्वारे होत असतं. त्यात सर्वाधिक वाटा डोळे या ज्ञानेद्रियांचा आहे.
डोळयांना दिसणं म्हणजे दृष्टीस पडणं. त्याच अर्थानं नजरेस पडणं असं ही म्हटलं जातं. पण तरी बहुतेक नजर ही थोडी व्यापक संज्ञा असावी.
नजरेत दिसण्यासोबत भाव भावनाचं लेपणही जोडलं जातं. माणसाच्या नजरेत किती भाव- भावना दडलेल्या असतात. मानवी मेंदूत उठणारे तरंग, उमलणारे सारे भाव, मानव प्राणी नजरेनंच अधिक व्यक्त करतो. कदाचित मेंदूपासून डोळे जवळ असल्यानं ही असावं? मेंदूतील ,काळजातील भाव चेहऱ्यावरील इतर अवयवाच्या हालचालीनं व वाचीकतेनं व्यक्त होतात! पण आतल्या मनोव्यापाराचा पसारा, आवाका मांडला जातो तो खरा नजरेनंच! तोंडाद्वारे, बोलत असुनही आपण बोलकी नजर, बोलके डोळे असंच म्हणतो!
नजरेनंच आनंद, दु:खं, श्रृंगार, वेदना, कारुण्य, सल, ममत्व, लडिवाळपणा व्यक्त होतो. मनातले, काळजातले भाव आधी डोळ्यातच झरतात मग इतर अवयवातून! दु:ख, वेदना, यातना यात आधी डोळेच झरतात, आसवांनी डबडबतात! आईचं ममत्व लहान लेकरास आईच्या डोळ्यात व स्पर्शातच जाणवते. लहान मुलाला काहीच कळत नसलं तरी आईच्या नजरेचं व स्पर्शाचं विज्ञान सहज कळतं. आईही बाळाची नजर अलगद टिपते व त्याला हवं नको ते पुरवते. राधेच्या मनातला श्रृंगार, लाजणं नजरेतूनच उलघडतं. आतलं कारुण्य ही नजरेनंच कळते. मानेवर सुरी फिरल्यावर कंठशोष करणारा बळीचा बकरा पाय झटकत रक्ताच्या थारोळ्यात जीव सोडतांना त्याच्या नजरेतलं कारुण्य नजरेनच पाहतांना काळीज छिन्नविछिन्न होतं. मानवाचा अंतिम श्वासाचा शेर संपताच आप्तजण सर्वात आधी डोळ्यावर हात फिरवत डोळे बंद करतात. कारण सारं आयुष्य ज्यांच्यासाठी झटलो ती माझी माणसंही एक श्वास थांबवू शकले नाही नजरेतलं हे कारुण वा सारं आयुष्य मी मीपणाचा ताठा वावरत श जगत आलो पण एका श्वासानं दगा देताच माझं आयुष्य किती क्षणभंगुर होतं हे दुबळेपण नजरेत उमटतं व तेच दुबळेपण दिसू नये म्हणून आप्तजण जात्या चराचे आधी डोळे झाकतात.
नजरेच्या पाऱ्यात किती सामर्थ्य असतं! नारीची करपल्लवी बहुतेक नजरेस पडते पण नेत्रपल्लवी? या नेत्रपल्लवीने चांगली चांगली घरे क्षणात फुटतात. बयेनं नजर वटारताच मर्दाची नजर भुईसपाट होत चिरेबंदी वाड्याची तटबंदी, बुरुज क्षणात ढासळत अलग चुली होतात! तर कधी हीच नेत्रपल्लवी विधायक बदलही करते. नजरेत नजर अडकवत जुगलबंदी अडकली की क्षणात भावनांचं वादळ घोंगावतं. नजरेनेच भले भले सुरमा भोपाली गारद होतात. नजरेस नजर देतांना एक अजब स्वर्णिम विश्व फुलतं! तर कधी त्या नजरेत जरब, धाक, शिस्त ही दिसून येते. गुरुजनाची करडी शिस्त नजरेतच दिसून येई. चष्म्यातून डोळ्याची खडी वटारताच इरसाल पोरगंही शहाबादी फरशीवर पन्हाळ लावे! छडी हातात न घेता भल्या भल्यांना लाईनीवर आणावयाची ही ताकद गुरुजीच्या नजरेत होती.
आईच्या मायाळू नजरेत प्रेमाचा पाझर तर बापाच्या नजरेत जरब दिसते!
नजर......विठ्ठलाची प्रासादिक नजर! देवादिकांची कृपादृष्टी! चातकाची वाट पाहणारी नजर! पिल्लावर लक्ष ठेवणारी भिरभिरणारी नजर! स्त्रियांना लगेच कळणारी वासनांध नजर! सारा नजरेचा खेळ! नजर तीच पण कधी प्रासादिक तर कधी पापी! स्थळ वेळ काळानुरुप व व्यक्तीगणिक बदलणारी नजर!
जीव तोडून वाट पहावयास लावणारी गुंडूरलाव्याची नजर! आस उडालेली भेसूर नजर! रात्रंदिवस पोराबाळांची वाट पाहणारी सुरकतेल्या चेहऱ्याच्या खोबणीतली निझूर नजर! किती काळीज चिरणारी नजर? कधी वेधक नजर तर कधी भेदक नजर! चोर वाटणारी साव नजर ! तर कधी साव वाटणारी चोर नजर! सारा नजरेचा खेळ बाबा! त्याच घाऱ्या, काळ्या भुऱ्या नयनातील कालसापेक्ष, व्यक्तीसापेक्ष भाव, रुप बदलणारी नजर!
भूतकाळातील आठवांचा बाझार भरवणारी नजर! भविष्यातील स्वप्नांचा, लिप्साचा गाव जागवणारी नजर! हासरी, लाजरी, रडकी, लाडकी नजर! जीवघेणी जीव लावणारी नजर! लाघवी बोलघेवडी, माधवी गुलकंदी नजर! बाप रे बाप! अबब किती या नजरा? नजरबंद कराव्यात अशा नजरा की नजरेतल्या कोंदणात सामावणाऱ्या अलवार नजरा! नजरेचा ससेमिरा करणारी- पदराशी खेळणारी पाठशिवणीची नजर! अल्लड वयात घसरती नजर! लाजरी बुजरी वेडावणारी नजर! हे अलखा! हा नजरेचा सप्तरंगी भावस्पर्शी खेळ का उगा छेडावा!
नजरेचा हा सारा महिमा बुबुळं, पापण्या व भुवया यावर तर अवलंबून नसावा? या घटकांनी साधलेला लहान मोठा उन्नत अवनत कोनांनीच आतून उमडणारे भाव व्यक्त होत असावेत! पदराआडच्या चेहऱ्यात पापणकाठात बुबुळे वरखाली तिरपी फिरत राहतात, भुवया वक्रता, सरळता वाढवत राहतात मानेचा बाक धारदार होत राहतो नी मग सुरु होतो भावनेचा गुंधनकाला! अजबगजब खेळ ! कधी काजळकाठ भिजवत तर कधी सौदर्य सृष्टीचा बेनझीर आयाम!
बंद नजर देखील किती कमाल करते! सैलाब जलजला थांबवते! बंद नजरेत स्वर्ग साकारतो तर कधी रणधुमाळी! सुलतानढवा ! दग्धभू जाळकी बंदनजर!
देवा! नजरेत भरु दे! पण नजरेतून उतरु नको देऊस बाबा!
✒️ वा.....पा......
8275314774
Comments
Post a Comment
Did you like this blog