◼️ ललित लेख :- आनंदाच्या गावाला जाऊया .... | ✍️सुचित्रा पवार... | Prayerna
आनंदाच्या गावाला जाऊया .... "आनंदी आनंद गडे , इकडे तिकडे चोहीकडे " बालकविंच्या या ओळीप्रमाणेच 'निसर्गातच भरुनी आहे आनंदी आनंद!'खरेच का आनंदाला शोधावे लागते ? क्वचित वेळा असेलही ,पण तरीही मला वाटते ,'नाही! 'तुझे आहे तुजपाशी परी जागा चुकलाशी 'अशीच काहीशी आपली वृत्ती असते . आनंद आपल्या मनात झिरपत असतो ,त्याचा ठेवा आपल्याच मनात असतो पण आपण कस्तुरी मृगासारखे पिसाट धावत सुटतो त्याच्या मागे त्याला शोधायला .इकडे तिकडे वेड्यासारखे शोधतो त्याला पण तो असतो निनादत अंतर्मनातून आपल्याच मनात पण आपण शोधतो त्याला भौतिक गोष्टीत ,भौतिक सुखात ,आणि या भौतिकांचा कधीतरी कंटाळा येतोच आणि मग आपण दुःखी होतो .आपल्याला कुणीतरी आनंद द्यावा ,आनंदी करावे वाटते पण आनंद घेण्याने नाही तर देण्याने आपण आनंदी होतो हे विसरतो . मधमाशी कणाकणाने मध साठवते पण सुमधुर मधाचे पोळे केव्हढे मोठे होते नाही ? असेच जीवनात आनंदाचे क्षण क्षण गोळा करावे लागतात मगच आनंदाचा ठेवा पोळ्यासारखा दिवसेंदिवस मोठाच होत राहतो .या सुमधुर आनंदी साठवणींचा आनंद काही औरच ! रण